|Monday, September 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रूग्णवाहीकेचा चालक तपासतोय रूग्ण

रूग्णवाहीकेचा चालक तपासतोय रूग्ण 

राजापूर ग्रामीण रूग्णालयाचा अनागोंदी कारभार

 

वार्ताहर /राजापूर

असुविधांमुळे चर्चेत असलेल्या राजापूर ग्रामीण रूग्णालयाचा अनागोंदी व तेवढाच धक्कादायक कारभार चव्हाटय़ावर आला आहे. रूग्णवाहीकेवर चालक म्हणून कार्यरत असलेला कर्मचारी रूग्णाला तपासत असतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने ग्रामीण रूग्णालय टिकेचा धनी बनले आहे.

राजापूर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, परिचर असतानाही रूग्णालयाच्या रूग्णवाहीकेवर खासगी स्वरूपात कार्यरत असलेला कर्मचारी वैद्यकीय अधिकाऱयांचा स्टेथेस्कोप लावून रूग्णाचा रक्तदाब तपासत असतानाचे फोटो रविवारपासून सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंनी राजापुरात एकच खळबळ उडाली असून सोशल मिडीयावर राजापूर ग्रामीण रूग्णालयाच्या कारभाराचे लचके तोडले जात आहेत. जर चालक रूग्णांवर उपचार करत असेल तर रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी व परिचारीका काय करतात? असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.

सुविधांचा अभाव, धुळ खात पडलेली यंत्रसामग्री, अधिकारी कर्मचाऱयांची रिक्त पदे, तसेच रूग्णांची होत असली गैरवर्तणूक यामुळे राजापूर ग्रामीण रूग्णालय नेहमीच चर्चेत असते. त्यातच आता या प्रकारामुळे रूग्णालयाच्या कारभाराची लक्तरे सोशल मिडीयाद्वारे वेशीवर टांगली जात आहेत. रूग्णालयाच्या या बेजबाबदारपणामुळे एखाद्या रूग्णाचा बळी गेल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवालही आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.

चौकशी करून कारवाई ः डॉ. चव्हाण

याबाबत येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडलेला प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले. शनिवारी ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी आपण शिवणेखुर्द येथे अपघाती निधन झालेल्या बालिकेचे शवविच्छेदन करण्यात व्यस्त होतो.

एका महिला रूग्णाचे पल्स रेट आणि बीपी तपासताना दिसणारी व्यक्ती रूग्णालयाच्या 102 रूग्णवाहीकेवर पायलट आहे. त्यांनी रूग्ण तपासणे हे चुकीचे आहे. पायलट असल्याने आपणालाही रूग्णांचे पल्स रेट आणि बीपी कसे तपासतात याची माहिती असावी यासाठी आपणाला विचारून ते रूग्णाची तपासणी करत होते, अशी प्राथमिक माहिती डय़ुटीवरील परिचारिकेने दिली आहे. तरीही घडलेला प्रकार गंभीर आहे. संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

Related posts: