|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मोजणी सुरू, विरोध कायम!

मोजणी सुरू, विरोध कायम! 

चोख पोलीस बंदोबस्तात कार्यवाही

तीन गावांत मोजणी बंद पाडली

नाणारमध्ये मोजणीला अंशतः सहकार्य

प्रकल्प विरोधकांची गांधीगिरी

सेनेच्या भुमिकेबाबत संताप

प्रतिनिधी /राजापूर

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी सोमवारी ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभुमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाणार, पाळेकर वाडी, कात्रादेवी वाडी व दत्तवाडी येथील जमीन मोजणीला प्रारंभ करण्यात आला. नाणारमधील काही खातेदारांनी मोजणीसाठी सहमती दर्शवल्याने याठिकाणी काही प्रमाणात मोजणीचे काम सुरू झाले. मात्र अन्यत्र प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र विरोधामुळे मोजणीचे काम बंद करण्यात आले. सर्वच ठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी राहण्याची भुमिका घेऊन नंतर वाऱयावर सोडणाऱया शिवसेना व त्यांच्या नेत्यांबाबत तीव्र संताप प्रकल्पग्रस्त व्यक्त करत होते.

राजापूर तालुक्यातील नाणार गावासह परिसरातील 14 गावांमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध आहे. काही दिवसापूर्वीच मुंबई येथे कोकण विनाशकारी रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत जमीन मोजणाला विरोध करण्याचे ठरविण्यात आले होते. तसेच यापुर्वी एकदा जमीनीची मोजणी हाणून पाडण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनाने सोमवारी चोख पोलीस बंदोबस्तामध्ये नाणारसह पाळेकरवाडी, डोंगर दत्तवाडी, कात्रादेवी येथे जमीन मोजणीचे काम हाती घेतले.

भूमी अभिलेख अधिक्षकांसह महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी अभय करगुटकर, जिल्हा पोलीस अप्पर अधिक्षक मिट्टे, राजापूरचे नायब तहसीलदार राजेंद्र बिर्जे व त्यांचे कर्मचारी यांच्या उपस्थितीती मोजणीला सुरूवात करण्यात आली. चोख बदोबस्तात मोजणीला प्रारंभ होताच प्राल्प विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य, प्रकल्पग्रस्त मोजणी स्थळावर जमा झाले. प्रकल्प विरोधकांनी गांधीगिरी मार्गाने विरोध दर्शवल्याने मोजणीच्या कामात वारंवार व्यत्यत येत होता.

प्रकल्प विरोधकांची गांधीगिरी

पाळेकरवाडी, कात्रादेवीवाडी व दत्तवाडी येथे जमीन मोजणीला सुरूवात झाल्याचे कळताच प्रकल्प विरोधक ते काम बंद पाडत होते. संबंधित ठिकाणी प्रकल्प विरोधक रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. यामध्ये पुरूषांसह महिलांचा देखील मोठय़ा प्रमाणात समावेश होता. दिवसभर या मंडळींनी रस्ता अडवुन ठेवला होता. हा विरोध शांततेच्या मार्गाने गांधीगिरी मार्गाने करण्यात येत होता. अखेर या ठिकाणी मोजणी बंद करण्यात आली.

जमीन मोजणीचे काम पाडले हाणून

मधल्या काळात एकाच ठिकाणी विरोधक बसलेले पाहुन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱयांनी दुसरीकडे जावून मोजणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकल्प विरोधकांनी तात्काळ त्यादिशेने धावून अधिकाऱयांना रोखले. दुपारनंतर पाळेकरवाडीत पुन्हा मोजणी सुरू होताच विरोधकांनी आपला मोर्चा पाळेकर वाडीकडे वळविला. त्यादरम्यान काही अधिकारी व प्रकल्प विरोधकांच्या काही प्रमुखांनी चर्चा केली. मात्र त्यानंतर सुरू केलेली मोजणी पुन्हा थांबविण्यात आली.

नाणारमध्ये अंशतः सहकार्य

प्रकल्प विरोधाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱया नाणारमध्ये मात्र मोजणी कामाला अंशतः सहकार्य मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्षांच्याच गावातील काही खातेदारांनी मोजणीला सहमती दर्शवल्याने काम सुरू करण्यात आले. यावेळी प्रकल्पविरोधी समितीने गांधिगिरीने विरोध करायचा प्रयत्न केला.

नोटीसीवर प्रशासनाचा अधिकृत शिक्काच नाही

यादरम्यान उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी व एम.आय.डी. सी. चे अधिकारी पाळेकरवाडीत आले. त्यावेळी प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष व नाणारचे सरपंच ओंकार प्रभुदेसाई व अन्य काहींनी पाठवण्यात आलेल्या नोटीसवर प्रशासनाचा अधिकृत शिक्का नसल्याचा मुद्दा उपस्थीत केला. त्यामुळे जमीन माजणीचे काम नये अशी मागणी केली त्यावेळी आपल्या नोटीसा अधिकृत असल्याचा दावा भुमी अभिलेखच्या अधिकाऱयांकडूक करण्यात आला. त्यावेळी प्रकल्प विरोधकांनी तसे आम्हाला लिहुन द्या आम्ही यावर कोर्टात दाद मागू असा पवित्रा घेतला. मात्र तसे लिहून द्यायला संबंधितांकडून टाळाटाळ करण्यात आली.

पालकमंत्र्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

काही दिवसापूर्वीच पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या दालनात रिफायनरी संदर्भात तिन्ही कंपन्यांचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ना.वायकर यांनी रिफायनरी साठी प्रकल्पग्रस्तांवर बळजबरी न करण्याबाबत अधिकाऱयांना सक्त ताकीद वजा सुचना केली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या या सुचनेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत प्रशासनाने मंगळवारी जमीन मोजणीच्या कामाला सुरूवात केलीच.

बैलाच्या धक्क्याने पोलीस कर्मचारी जखमी

रिफायनरी प्रकल्पाच्या मोजणीसाठी नाणार परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र प्रकल्प विरोधकांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन सुरू ठेवले होते. त्यामुळे बंदोबस्तासाठी आलेले पोलीसही काहीशे निश्चिंत होते. मात्र यादरम्यान दोन बैलांची झुंज लागली. बैलांची ही झुंज बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱयांच्या दिशेने आली. यातील एका पोलीस कर्मचाऱयाला एका बैलाचा जोरदार धक्का लागून तो जखमी झाला. तात्काळ त्या कर्मचाऱयाला राजापुरात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्याची तब्येत ठिक असल्याचे सूत्रांनी सांगीतले.

सेना पक्षप्रमुख व सेना उद्योगमंत्र्यांची दुटप्पी भूमिका?

शिवस्मारकाच्या निमित्ताने काही दिवसापूर्वीच राजापुरात आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विनाशकारी प्रकल्पांना विरोध करताना रिफायनरी संदर्भात आपण प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र मंगळवारी सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशाखाली नाणार, पाळेकरवाडी, दत्तवाडी, कात्रादेवीवाडी येथील जमीन मोजणीची कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व सेनेचेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यामधील दुटप्पी भूमिकेबाबत दस्तुरखुद्द प्रकल्पग्रस्तांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. अनेक शिवसैनिकांनीही पक्षनेत्यांच्या या दुटप्पी भुमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

 

Related posts: