|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवरायांच्या तेजोमय इतिहासाचा अनुभव घडविण्याचा संकल्प

शिवरायांच्या तेजोमय इतिहासाचा अनुभव घडविण्याचा संकल्प 

बेळगाव :

तरुण भारत ट्रस्टने पुनश्च एकवार, छत्रपती शिवरायांच्या तेजोमय इतिहासाचा दिग्मूढ करणारा अनुभव बेळगावकरांना घडविण्याचा संकल्प सोडला आहे. बेळगावच्या भूमीत 12 वर्षांनी पुन्हा एकदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निर्मित ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे प्रयोग 9 डिसेंबरपासून होणार आहेत. 9 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजता या महानाटय़ाचा पहिला प्रयोग येथील सीपीएड् मैदानावर साकार होणार आहे.

बेळगावचा विक्रम

‘जाणता राजा’ हे लोकप्रिय महानाटय़ बेळगावनगरीत पाचव्यांदा येत आहे. पाचवेळा हे नाटक सादर होणारे बेळगाव शहर पहिले शहर आहे. त्यामुळे या नाटकाचे अधिकतम प्रयोग सादर करण्याचा मानही बेळगाव नगरीला प्राप्त होणार आहे. छत्रपतींच्या जीवनावर आणि आदर्शांवर निस्सिम प्रेम करणारे बेळगावचे नागरिक नाटय़क्षेत्रात चोखंदळ व रसिक आस्वादक म्हणून ओळखले जातात. म्हणूनच या नाटकात काम करणारे सर्व कलाकार ‘बेळगावकर रसिकांसमोर नाटक सादर करताना वेगळीच अनुभूती प्राप्त होते’ असे म्हणतात.

प्रथम क्रमांकाचे भव्य नाटक

हे महानाटय़ जगातील प्रथम क्रमांकाचे फिरते भव्य नाटक गणले जाते. भव्य रंगमंच, त्यावरील कलाकारांची मोठी संख्या, घोडे, उंट, बैलगाडी, पालखी यांचा समावेश, रंगमंचावर मध्यभागी 18 फूट उंचीची भव्य अशी देवीची मूर्ती, शोभिवंत सिंहासन, आतषबाजी पाहून डोळय़ांचे पारणे फिटते. क्वाड्राफोनिक डिजिटल साऊंड सिस्टीम, अत्याधुनिक प्रकाश योजना यामुळे प्रयोगाचे आकर्षण अधिकच वाढते. या नाटकाच्या माध्यमातून जुन्या व पारंपरिक लोककलांचे मनोज्ञ दर्शन घडते. एकावेळी 7000 हून अधिक प्रेक्षक या महानाटय़ाचा आस्वाद घेऊ शकतात. प्रशस्त अशा बाल्कनीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जगभरात या महानाटय़ाचे एक हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत.

 

Related posts: