|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सिद्धरामय्या सरकारला सत्तेवरून खाली खेचा!

सिद्धरामय्या सरकारला सत्तेवरून खाली खेचा! 

प्रतिनिधी/ संकेश्वर

 राज्यातील भ्रष्टाचारी काँग्रेस प्रणित सिद्धरामय्या सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन भाजप परिवर्तन रथाचे प्रमुख बी. एस. येडियुराप्पा यांनी केले. मंगळवारी परिवर्तन यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित संकेश्वर, निपाणी, चिकोडी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. या तिन्ही शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये चिकोडी, हुक्करी तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

 संकेश्वर येथील सभेत अध्यक्षस्थानी आमदार उमेश कत्ती हे होते. यावेळी येडियुराप्पा पुढे म्हणाले, राज्यातील भ्रष्ट काँग्रेस सरकारने राबविलेल्या योजनांना तातडीने निधी मंजूर केलेला नाही. योजनेतील लाभार्थींना निधी देत नाही, कर्मचारी बदल्याच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार केला आहे. शेतकरी हिताच्या दृष्टीने एकही योजना हाती घेतली नाही. नोटाबंदीच्या निर्णयाने बँकाबंद पडल्या, असे सांगणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या माथेफिरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 कळसा-भांडूरा प्रकरणी कोणतीच जबाबदारी राज्य सरकारने घेतलेली नाही. ही समस्या अधिक क्लिष्ट बनली असून आपले सरकार सत्तेवर येताच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या सहकार्याने आपण कळसा-भांडूराची समस्या निकालात काढणार आहोत. तसेच बेळगावच्या विमानस्थळाला कित्तूर राणी चन्नम्मा नामकरण देण्यासाठी मंजुरी दिली गेलेली नाही. याप्रश्नीही भाजप सरकार सत्तेवर येताच अवघ्या 24 तासात विमानस्थळाचे कित्तूर राणी चन्नम्मा असे नामकरण करणार. तसेच सबका साथ-सबका विकास हाच आपला संदेश या परिवर्तन रॅलीचा असून भाजप सत्तेवर येताच हे सत्यात उतरवणार असल्याचे यावेळी येडियुराप्पांनी स्पष्ट केले.

 प्रारंभी सभेच्या ठिकाणी आगमन झालेल्या परिवर्तन रथ यात्रेचे भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. रथयात्रेचे सभेत रुपांतर होताच बी. एस. येडियुराप्पांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्यासपीठावर केंद्रीय मंत्री अनंतकुमार, रमेश जिगजिनगी, खासदार प्रभाकर कोरे, आमदार शशिकला जोल्ले, मुरगेश निराणी, पी. राजू, दुर्योधन ऐहोळे, डॉ. वामनाचार्य, माजी खासदार रमेश कत्ती, नगराध्यक्षा धनश्री कोळेकर आदी उपस्थित होत्या.

रमेश कत्तींना दिली विराट कोहलीची उपमा

 उमेश व रमेश या कत्ती बंधूनी परिवर्तन रथ यात्रेच्या आगमनाप्रसंगी 10 हजार मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून केलेले उत्स्फूर्त स्वागत अद्भूत असेच आहे. अगामी काळात येडियुराप्पांचे सरकार अस्तित्वात येणार असून शेतकरी हिताला प्राधान्य देण्यात येणार आहे. यावेळी रमेश कत्तींच्या कामगिरीला विराट कोहलींची उपमा अनंतकुमार यांनी दिली.

भाजप राज्याचा समग्र विकास करणार

  काँग्रेसच्या सिद्धरामय्यांनी चालविलेले षड्यंत्र आम्ही खपवून घेणार नाही. दलित मित्रांनो अगामी निवडणुकीत काँग्रेसला मते देऊ नका, भाजपलाच मते द्या, असे स्पष्टमत केंद्रीय मंत्री रमेश जिगजिनगी यांनी क्यक्त केले.

53 कोटीची कामे

 गत आठ वर्षाच्या काळात हुक्केरी विधानसभा मतदार संघात 53 कोटीची विकासकामे हाती घेतली आहेत. सध्या सुरू असलेली सर्व कामे भाजपच्या सत्तेत मंजूर केली असल्याचे स्पष्ट करून अगामी काळात हिरण्यकेशीला आजरा तालुक्यातील कितवाडचे पाणी कायम स्वरूपात मिळवणार असल्याचे यावेळी आमदार उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले. यावेळी चिक्कोडी भाजप जिल्हा अध्यक्ष शशिकांत नाईक, खासदार शोभा करंदलाजे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाला हुक्केरी तालुक्यातून 30 हजार नागरिक उपस्थित होते.

Related posts: