|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मोजणीविना अधिकारी फिरले माघारी

मोजणीविना अधिकारी फिरले माघारी 

प्रकल्प विरोधक बसले ठाण मांडून

तिसऱया दिवशीही मोजणीविरोधात आंदोलन सुरूच

जमीन मोजणीचे काम थांबेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

बुधवारी कोणाचीही धरपकड नाही

 

प्रतिनिधी /राजापूर

रिफायनरीसाठी लागणाऱया जागेची मोजणी करण्यासाठी जागेवर गेलेल्या अधिकाऱयांना येथील प्रकल्पविरोधकांनी तिसऱया दिवशीही कडाडून विरोध केला. त्यामुळे बुधवारी जमीन मोजणीची प्रक्रिया फारशी झालीच नाही. नाणारसह अन्य ठिकाणी मोजणीचे काम पूर्णपणे ठप्प होते. गेल्या 2 दिवसाप्रमाणेच बुधवारी तिसऱया दिवशीही पोलीस बंदोबस्त होता. मात्र कोणाचीही धरपकड करण्यात आली नाही. नाणार व पाळेकरवाडीत प्रत्येकी 22 टक्के, दत्तवाडीत 30 टक्के तर कात्रादेवीवाडी येथे सर्वाधिक 45 टक्के जमीन मोजणी झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान बुधवारी जमीन मोजणीची रेंगाळलेली प्रक्रिया हा येथील प्रकल्प विरोधकांचा विजय मानला जात असून जोपर्यंत मोजणीचे काम बंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान सायंकाळपर्यंत प्रकल्प विरोधक मोजणीच्या ठिकाणी ठाण मांडून बसल्याने अधिकारी मोजणी न करताच माघारी फिरले.

सडय़ावरच बसून जेवण करताना मोजणी अधिकारी व कर्मचारी.

राजापूर तालुक्यातील नाणार गावासह परिसरातील 14 गावामध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन मोजणीच्या कामाला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी प्रकल्प विरोधकांच्या आक्रमणासमोर नाणारवगळता अन्य भागात फारसे न चाललेल्या प्रशासनाने मंगळवारी काहीसे आक्रमक रूप घेतले. मंगळवारी प्रकल्प विरोधकांची धरपकड करून प्रकल्पग्रस्तांमधे भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या धरपकडीत महिलांची संख्या जास्त होती. मात्र याचा यत्कींचितही परिणाम प्रकल्पविरोधकांवर झाला नाही.

बुधवारी सकाळपासूनच प्रकल्प विरोधक जमीन मोजणी होत असलेल्या ठिकाणी हजर झाले. प्रशासकीय अधिकाऱयांसह मोजणी अधिकारीही अपेक्षित स्थळी पोहोचले होते. त्यामुळे गेल्या 2 दिवसाप्रमाणेच बुधवारी तिसऱया दिवशीही मोजणी होणार, असे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात प्रकल्प विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे बुधवारी फारशी मोजणी झालीच नाही. मात्र प्रकल्प विरोधकांसह अधिकारीही त्या- त्या ठिकाणी उपस्थित होते. सायंकाळपर्यंत प्रकल्प विरोधक मोजणीच्या ठिकाणी ठाण मांडून बसल्याने अधिकाऱयांना मोजणी न करताच परत फिरावे लागले.

प्रकल्प ग्रीन नसून महाविनाशकारी ः वालम

दरम्यान कोकण विनाशकारी रिफायनरीविरोधी संघर्ष संघटना मुंबईचे अध्यक्ष अशोक वालम यांनी बुधवारी मोजणीच्या ठिकाणी जाऊन प्रकल्पग्रस्त जनतेची भेट घेतली. यावेळी त्यांनी येथील जनता लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना प्रशासन या बाबत खोटे अहवाल शासनाला सादर करत आहे. त्यामुळे या शासन व प्रशासनाचा आपण धिक्कार करत असल्याचे म्हटले. येथील जनता आपली मायभूमी विकायला बसली नाही. न्यायहक्काने येथील जनता लढत असताना मंगळवारी पोलिसांनी आंदोलनातील महिलांचे अपहरण केल्याचा आरोप करताना या प्रकरणी आपण पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला. हा प्रकल्प ग्रीन नसून महाविनाशकारी असल्याचे ते म्हणाले. तसेच प्रकल्प विरोधी लढय़ात गांधीगिरी मार्गाने उतरलेल्या प्रकल्पग्रस्त जनतेने यापुढेही अशीच एकजूट दाखवून हा लढा यशस्वी करावा, असे आवाहन केले.

आपण प्रकल्प विरोधकांच्या बाजूने ः यशवंतराव

युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अजित यशवतंराव यांनीही बुधवारी आंदोलनकर्त्यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण प्रकल्प विरोधकांच्या बाजूने असल्याचे सांगितले. प्रशासन आपल्या सरकारने नवीन काय केले, हे सर्वांना दाखवण्यासाठी येथील जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहे. अशा कृतीचा आपण निषेध करतो. कोणताही विकासात्मक प्रकल्प आणताना तेथील स्थानिक जनतेचे म्हणणे ऐकूण घेणे गरजेचे आहे. 42 हजार प्रकल्पग्रस्त आहेत. मात्र येथील बहुतांश जनतेला या बाबत माहितीच नाही. ही शोकांतिका आहे. आता कुठल्याही परिस्थितीत येणाऱया भविष्य काळात प्रकल्पाला होणारा हा विरोध आणखी तीव्र होण्याची वाट प्रशासनाने पाहू नये. रिफायनरीबाबत प्रशासनाने आता थांबण्याचा निर्णय घेतला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अशा पध्दतीचे कृत्य करताना राजीनामा का देऊ नये, असा सवाल त्यांनी केला.

25 टक्के जमिनीची मोजणी पूर्ण

भूसंपादन समन्वय उपजिल्हाधिकाऱयांची माहिती

रत्नागिरी / प्रतिनिधी

सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणाऱया नाणार तालुका राजापूर परिसरातील प्रस्तावित रिफायनरीसाठी सुरु असलेल्या जमीन मोजणीच्या चौथ्या दिवशी चार गावात 25 टक्के जमिनीची मोजणी झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.

रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन समन्वय उपजिल्हाधिकारी अमित शेडगे यांनी सांगितले की, राजापूर तालुक्यातील नाणार, दत्तवाडी, पाळेकरवाडी, कात्रादेवी येथे जमीन मोजणीचे काम शासकीय यंत्रणेने हाती घेतले आहे. सोमवारपासून बुधवारपर्यंत 3 दिवसात प्रत्येक गावात जमीन मोजणीचे काम प्रगतीपथावर आहे. नाणार गावी 25 टक्के, दत्तवाडीत 11 टक्के, पालेकरवाडीत 30 टक्के, कात्रावाडीत 25 टक्के एवढी जमीन मोजणी पूर्ण झाली आहे. ठरवून दिलेले जमीन मोजणीचे काम पूर्ण होईस्तोवर हे काम सुरु राहील. चार गावातील जमीन मोजणीचे काम कर्मचारी पूर्ण करणार आहेत, असे शेडगे यांनी सांगितले. पोलीस दलाने जमीन मोजणीसाठी पुरेपूर बंदोबस्त दिला असून भूमी अभिलेख विभागाने आपले कर्मचारी या चार गावांमध्ये मोजणीच्या साधनसामुग्रीसह तैनात केले आहेत. अभिलेख कर्मचाऱयांनी देण्यात आलेले काम पूर्ण करण्याचा चंग बांधला आहे.

दृष्टीक्षेपात जमीन मोजणी काम पूर्ण

नाणार ः 25 टक्के

दत्तवाडी ः 11 टक्के

पाळेकरवाडी ः 30 टक्के

कात्रादेवी ः 25 टक्के

Related posts: