|Thursday, October 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रोहिंग्या संकट संपुष्टात येण्याची चिन्हे

रोहिंग्या संकट संपुष्टात येण्याची चिन्हे 

यंगून / वृत्तसंस्था :

रोहिंग्या संकटाबद्दल जागतिक दबावादरम्यान अखेर म्यानमार आणि बांगलादेश यांयच्ता गुरुवारी करार झाला. करारावर स्वाक्षऱया होताच रोहिंग्या मुस्लिमांच्या स्वदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. म्यानमारच्या रकाईन प्रांतात हिंसाचार वाढल्यानंतर 6 लाखांहून अधिक मुस्लिमांनी बांगलादेशात पलायन केले. तर हजारो रोहिंग्यांनी मलेशियात धाव घेतली. भारतात देखील रोहिंग्ये दाखल झाले आहेत.

म्यानमारच्या सैन्याद्वारे करण्यात आलेल्या कारवाईला अमेरिकेने ‘वांशिक नरसंहार’ ठरविले होते. कित्येक महिने चाललेल्या संघर्षानंतर रोहिंग्यांच्या माघारीच्या अटींबद्दल म्यानमारच्या राजधानीत सहमती निर्माण झाली. गुरुवारी म्यानमारच्या प्रभावशाली नेत्या आंग सान सू की आणि बांगलादेशचे विदेशमंत्री ए.एच. महमूद अली यांच्यात या मुद्यावर विस्तृत चर्चा झाली. म्यानमार आणि बांगलादेशने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची पुष्टी म्यानमारच्या स्थलांतर मंत्रालयाचे स्थायी सचिव मिएंट क्यांग यांनी दिली.

म्यानमार सरकारच्या प्रवक्त्याने देखील ट्विट करत कराराची माहिती दिली. हे पहिले पाऊल असून म्यानमार रोहिंग्यांना परत स्वीकारणार आहे. आता आम्हाला काम सुरू करावे लागेल असे बांगलादेशचे विदेशमंत्री अली यांनी सांगितले. किती रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमार स्वीकारणार किंवा माघारीची कालमर्यादा निर्धारित करण्यात आली की नाही याची माहिती अजून मिळू शकलेली नाही. रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारने परतण्याची अनुमती दिली, तर त्यांना कोठे वसविले जाणार हा प्रश्न उभा ठाकणार आहे. रोहिंग्यांची घरे आणि गावे अगोदरच पेटवून देण्यात आली होती.

म्यानमारमध्ये मुस्लिमविरोधी भावना वाढत असल्याने त्यांची सुरक्षा हा चिंतेचा विषय ठरू शकतो. पोप फ्रान्सिस यांच्या दोन्ही देशांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला आहे. रोहिंग्यांच्या दुर्दशेवर पोप यांनी चिंता व्यक्त केली होती. म्यानमारमध्ये अनेक वर्षांपासून रोहिंग्यांना लक्ष्य केले जात आहे. तेथील सरकारने रोहिंग्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीच पावले उचलली नसल्याचा आरोप होतो.

Related posts: