|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बिंदू चौकात मोबाईल शॉपी फोडली

बिंदू चौकात मोबाईल शॉपी फोडली 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

   बिंदू चौक येथील सॅमसंग प्लाझा ही मोबाईल शॉपीचे शटर उचकटून अज्ञात चोरटय़ांनी गुरूवारी पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान धाडसी चोरी केली. यामध्ये चोरटय़ांनी विविध प्रकाराचे सुमारे 100 मोबाईल, रोख 50 हजार असा सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल चोरटय़ांनी लंपास केला. याबाबतची फिर्याद दिपक कन्हैयालाल केशवाणी (वय 44 रा. ताराबाई) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.

            याबाबत अधिक माहिती अशी की, बिंदू चौक येथील भाकप कार्यालयाशेजारील इमारतीमध्ये दिपक केशवाणी यांच्या मालकीचे सॅमसंग प्लाझा नावाची मोबाईल शॉपी आहे. गेल्या 4 महिन्यापासून त्यांनी हे दुकान सुरू केले आहे. यामध्ये सॅमसंग कंपनीचे महागडे मोबाईल व इतर ऍक्सेसरीच विक्रीसाठी आहेत. बुधवारी रात्री 9 वाजून 45 मिनीटांच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले होते. यावेळी त्यांनी दुकानातील सर्व मोबाईल सेफ्टी बॉक्समध्ये लॉक करून ठेवले होते. गुरूवारी सकाळी दिपक केशवाणी 10 वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना दुकानाच्या शटरच्या उजव्या बाजूचा नॉब उचकटून शटर उघडल्याचे दिसले. यावरून त्यांना दुकानामध्ये चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी दुकानामध्ये जावून पाहिले असता त्यांना धक्का बसला. दुकानामधील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यांनी आतमध्ये जावून पाहिले असता त्यांना मोबाईल सेफ्टी बॉक्स मधील सुमारे 100 हून अधिक मोबाईल चोरटय़ांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. चोरटय़ांनी ड्रॉवरमधील किल्लीच्या सहाय्याने सेफ्टी बॉक्स उघडले होते. केशवाणी यांनी कॅशबॉक्समध्ये पाहिले असता कॅशबॉक्समधील 50 हजारांची रोकडही चोरटय़ांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर केशवाणी यांनी या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलीसांना दिली. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. यानंतर ठसेतज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

  दरम्यान दुकानाबाहेरन नागरीकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे शिवाजी रोड, बिंदू चौक, शिवाजी चौक परिसरातील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

Related posts: