|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्ग 15 दिवसात होणार खड्डेमुक्त!

महामार्ग 15 दिवसात होणार खड्डेमुक्त! 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट कंत्राटदाराशी बोलून काढला मार्ग

प्रतिनिधी / रत्नागिरी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर-बावनदी दरम्यान पडलेल्या प्रचंड खड्डय़ांची दखल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली. त्यांनी नियुक्त कंत्राटदाराला फोन करुन हे काम सत्वर मार्गी लावावे, असे सांगितल्याने खड्डे भरण्याचे काम सुरु झाले असून येत्या 15 दिवसात आरवली (संगमेश्वर) ते पात्रादेवी (सावंतवाडी) दरम्यानचा मार्ग खड्डेमुक्त होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आरवली ते वाकेड दरम्यानचे काम एमईपी नावाच्या कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. याच कंपनीने रस्त्यावरील खड्डे भरावेत, असे ठरवण्यात आले आहे. सरकारकडून झालेल्या कराराप्रमाणे काही बाबींची अंमलबजावणी होत नसल्याचा आक्षेप कंत्राटदाराने घेतला होता. त्यामुळे भर पावसाळ्यात आणि पावसाळा संपला तरी खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले नव्हते.

रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी याविषयी राज्याचे बांधकाम मंत्री चंदकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून खड्डे भरण्याची विनंती केली होती. खासदार विनायक राऊत यांनी पेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून रस्त्याच्या परिस्थितीची कल्पना दिली होती. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी आग्रह केला होता.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट नियुक्त कंत्राटदाराला दूरध्वनी करुन परिस्थितीविषयी विचारणा केली. कंत्राटदाराच्या सर्व अडचणी दूर केल्या जातील. तुम्ही त्यासाठी थांबू नका. ताबडतोब खड्डे भरण्याचे काम हाती घ्या, असे फर्मावल्यानंतर कंत्राटदाराने लगोलग खड्डे भरण्याचे काम सुरु केले. हे सर्व काम कमाल 15 दिवसात पूर्ण होईल आणि प्रवाशांना आरामाचा प्रवास उपलब्ध होईल, अशी ग्वाही कंत्राटदाराच्यावतीने देण्यात आली.

एखाद्या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष घालून काम मार्गी लावल्याच्या घटना विरळी मानण्यात येते. कोकणच्या रस्त्यासाठी विविध स्तरावरुन आलेल्या म्हणण्यावरुन गडकरींनी आपली प्रतिष्ठा लावल्याचे समाधान कोकणवासियांना मिळाले आहे. बाकीच्या मार्गाची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांनी घेतली आहे. राजापूर ते खारेपाटणपर्यंत स्वतः खाते रस्ते दुरुस्ती करणार आहे.

Related posts: