|Thursday, July 18, 2019
You are here: Home » विविधा » विजय शं. माळी, दयाराम पाडलोस्कर यांना ‘भि. ग. रोहमारे पुरस्कार’

विजय शं. माळी, दयाराम पाडलोस्कर यांना ‘भि. ग. रोहमारे पुरस्कार’ 

पुणे / प्रतिनिधी :

पोहेगाव, कोपरगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱया राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, पुरस्कारप्राप्त लेखकांमध्ये विजय शं. माळी (कराड, जि. सातारा), दयाराम पाडलोस्कर (पेडणे, गोवा), सुशीलकुमार शिंदे (ठाणे), डॉ. रामनाथ वाढे (पाटोदा, जि. बीड) आणि ऐश्वर्य पाटेकर (नाशिक) या लेखकांचा समावेश आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. गणेश देशमुख यांनी ही माहिती दिली.

ट्रस्टतर्फे 1989 पासून हे पुरस्कार दिले जातात. 2016 साठी माळी यांच्या ‘आर्त माझ्या बहु पोटी’, पाडलोस्कर यांच्या ‘खपली निघाल्यानंतर’, शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ डॉ. वाढे यांच्या ‘कहार आणि त्यांचे लोकसाहित्य’ आणि पाटकर यांच्या ‘जू’ या ग्रंथांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी पाच हजार एक आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय अवकळा (जयराम खेडेकर), बिजवाई (राहुल निकम), संत परंपरा आणि कृषी संस्कृती (प्रा. वामन जाधव), लोकसाहित्य आणि ग्रामीण साहित्य यांचे स्वरूप (डॉ. नलिनी महाडिक), काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान (गणेश मरकड) आणि शेतमळा ते विधानसभा (पांडुरंग अभंग) या ग्रंथांचा विशेष ग्रंथ म्हणून निर्देश करण्यात आला आहे. ट्रस्टकडे आलेल्या एकूण 62 साहित्यकृतींपैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्याचे काम प्राचार्य लक्ष्मण महाडिक, डॉ. सुधाकर शेलार, डॉ. शिरीष लांडगे, डॉ. गणेश देशमुख यांच्या निवड समितीने केले आहे.

येत्या 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कोपरगावातील के. जे. सोमय्या महाविद्यालय येथे ग्रामीण कवी आणि समीक्षक श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

खपलीतून कोकणी माणसाचे दर्शन

माळी यांची ‘आर्त माझ्या बहुपोटी’ ही कादंबरी समकालीन कौटुंबिक, सामजिक ग्रामीण वास्तवाचा व प्रश्नांचा चिंतनगर्भ वेध घेणारी आणि ग्रामीण शिक्षित माणसाची जरासंधाप्रमाणे झालेली अवस्था प्रकट करणारी कादंबरी आहे. ‘खपली निघाल्यानंतर’मधून गोवा, सावंतवाडी परिसरातील कोकणी माणसे, त्यांची  वृत्ती, प्रवृत्ती, व्यथा-वेदना, चित्रदर्शी निवेदनाद्वारे व कोकणी बोलीतून सशक्तपणे प्रकट झाली आहे. जूसह अन्य पुस्तकेही ग्रामीण वास्तव, जगणे याचा परिचय करून देतात.