|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » कर्णधार स्टीव्ह स्मिथचे संघर्षमय शतक

कर्णधार स्टीव्ह स्मिथचे संघर्षमय शतक 

वृत्तसंस्था /ब्रिस्बेन :

कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तमपैकी एक संघर्षमय डाव साकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडला किंचीत बॅकफूटवर ढकलले. पहिल्या डावात इंग्लंडला 302 धावांवर गुंडाळल्यानंतर डावाअखेर 20 धावांची आघाडी मिळवणाऱया ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या शतकाचा सिंहाचा वाटा राहिला. स्मिथने 326 चेंडूत 14 चौकारांसह 141 धावा जमवल्या व याच धावसंख्येवर तो नाबादही राहिला. नंतर जोश हॅझलवूडने दुहेरी झटके दिल्यानंतर दिवसअखेर इंग्लंडची 2 बाद 33 अशी पडझड झाली.

दिवसाच्या उत्तरार्धात हॅझलवूडने ऍलिस्टर कूक (7) व जेम्स व्हिन्स (2) यांना आपल्या पहिल्या दोनच षटकात बाद केले तर मिशेल स्टार्कच्या एका उसळत्या चेंडूने जो रुटच्या हेल्मेटचा थेट वेध घेतल्यानंतर आणखी धुमश्चक्री रंगणार, याचे संकेत मिळाले. या पहिल्या कसोटीत आणखी दोन दिवसांचा खेळ बाकी असताना इंग्लंडची 2 बाद 33 अशी पडझड झाली. यावेळी ते केवळ 7 धावांनी आघाडीवर होते. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 302 धावा जमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 328 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडची दुसऱया डावात पडझड झाली.  कर्णधार रुट 5 तर मार्क स्टोनमन 19 वर नाबाद राहिले.

तत्पूर्वी, इंग्लिश कर्णधार रुटने ऑस्ट्रेलियाचा शतकवीर स्टीव्ह स्मिथचा वारु रोखण्यासाठी आपल्या गोलंदाजांकडून अगदी बॉडीलाईन गोलंदाजी देखील करवून घेतली. पण, तरीही स्मिथचे इरादे बुलंद राहिले. ऑस्ट्रेलियाने येथे गब्बावर 1988 पासून एकही कसोटी गमावलेली नसून तीच मालिका कायम राखण्याचा त्यांचा सर्वतोपरी यंदाही प्रयत्न असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, स्मिथचे संघर्षमय शतक त्यांच्यासाठी लाख मोलाचे ठरले आहे. अर्थात, इंग्लिश जलद गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने चौथा दिवस आपला असेल, असे सांगत या लढतीला आणखी धार आणली आहे.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड पहिला डाव : सर्वबाद 302. ऑस्ट्रेलिया पहिला डाव : सर्वबाद 328. (स्टीव्ह स्मिथ 326 चेंडूत 14 चौकारांसह नाबाद 141, शॉन मार्श 141 चेंडूत 8 चौकारांसह 51, पॅट कमिन्स 120 चेंडूत 42. अवांतर 4. स्टुअर्ट ब्रॉड 3/49, अँडरसन व मोईन अली प्रत्येकी 2 बळी). इंग्लंड दुसरा डाव : 16 षटकात 2/33. (स्टोनमन नाबाद 19, जो रुट नाबाद 5. हॅझलवूड 11 धावात 2 बळी).

Related posts: