|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बांद्याला गरज सुयोग्य नियोजनाची

बांद्याला गरज सुयोग्य नियोजनाची 

शहराचा वाढता विस्तार :  मात्र, पायाभूत सुविधांची कमतरता

मयुर चराटकर / बांदा:

 महाराष्ट्र गोवा राज्याच्या सीमेवरील बांदा शहराला पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक समस्यांनी विळखा घातला आहे. वाढती झोपडपट्टी, परप्रांतियांचे लोंढे, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी, उघडी गटारे, खड्डेमय रस्ते, मूलभूत सोयी-सुविधा असे अनेक प्रश्न शहराला भेडसावत आहेत. शहराच्या वाढत्या विस्ताराच्या तुलनेत सुविधांची वानवा असल्याने नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी साचलेला कचरा व घाणीच्या साम्राज्यामुळे शहर स्वच्छ भारत अभियानापासून दूर असल्याचे चित्र आहे. सध्या वेगाने फैलावणाऱया ताप साथीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला महत्व आले आहे.

 गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या बांदा शहराला विकासाची संधी आहे. मात्र, या तुलनेत मोठय़ा प्रमाणात सुविधांचा अभाव दिसून येतो. मोपा विमानतळ, महामार्ग चौपदरीकरण, आडाळी एमआयडीसी असे अनेक प्रकल्प शहराला लागून होत असल्याने मोठय़ा प्रमाणात विकास होऊ शकतो. मात्र, पायाभूत सुविधांकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे विकासाच्या दिशेने झेपावणाऱया बांदा शहराला खिळ बसली आहे.

   चांदा ते बांदा विकासाची वल्गना

 राजकीय पातळीवर चांदा ते बांदा विकासाच्या वल्गना सर्वच राजकीय नेते करतात. मात्र, राज्याच्या शेवटचे टोक असलेल्या बांदा शहराच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. परिसरातील 25 ते 30 गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी हजारोंच्या संख्येने बांदा शहरात येतात. या सर्व गावांच्या विकासात बांदा शहराची प्रमुख भूमिका आहे.

    शहरीकरणाच्या तुलनेत सुविधांचा अभाव

 झाराप-पत्रादेवी बायपास शहरातून जातो. तर गोव्यातील मोपा विमानतळ आणि आडाळी एमआयड़ीसी बांदा शहरापासून काही अंतरावर आहे. बांदा परिसरातील गावांना शैक्षणिक, आरोग्य आणि बाजारपेठेसाठी बांदा सोईचे आहे. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत येथे निवासी संकुलांची संख्या वाढत आहे. गोवा येथे नोकरीसाठी जाणाऱयांची कुटुंब शहरात भाडय़ाने राहतात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. सद्यस्थितीत पंधरा हजारांवर लोकसंख्या आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणाच्या तुलनेत सुविधा तोकडय़ा पडत आहेत. बसस्थानक वगळता एकही सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा शौचालय उभारण्यात आलेले नाही. बांदा
ग्रामपंचायतीमार्फत बसविलेली फायबरची शौचालयेही बिनकामाची ठरली आहेत. काही ठिकाणी ती सडून गेली आहेत. तर काही वापराविना धूळखात पडल्या आहेत. त्यावरील खर्च वाया गेला आहे. बाजारपेठ व शहरातील रस्ते खड्डेमय झाल्याने त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. पार्किंग व्यवस्था नसल्याने मोठय़ा गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. सणासुदीच्या दिवसांत पोलीस
प्रशासनाला पार्किंग आणि ट्राफिक नियंत्रणासाठी मोठी कसरत करावी लागते.

  झोपडपट्टय़ांचा विळखा

 शहरात गोवा तसेच इतर भागातील ठेकेदारांकडे काम करणाऱया परप्रांतीय कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व परप्रांतीय कामगारांची राहण्याची सोय ठेकेदारांनी खासगी जागेत झोपडय़ा थाटून केली आहे. शहराला झोपडपट्टीने विळखा घातल्यामुळे बकाल स्वरुप आले आहे. कट्टा कॉर्नर, आळवाडी, मच्छीमार्केट परिसर, गडगेवाडी आणि बसस्थानक परिसरात शेकडो झोपडय़ा
परप्रांतीय कामगांरांनी थाटल्या आहेत.

शहरातील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर

शहरात वाढत्या झोपडपट्टीमुळे कट्टा कॉर्नर ते स्मशानभूमी परिसरात घाणीचे
साम्राज्य आहे. महामार्गावरच लहान मुले शौचास बसत असल्याने या ठिकाणाहून पायी प्रवास करताना दुर्गंधीला सामोरे जावे लागते. शहरीकरणात निवासी संकुलांची संख्या वाढत आहे मात्र, तितक्या क्षमतेने सांडपाण्याचे व्यवस्थापन होत नाही. पावसाळय़ात ठिकठिकाणी गटार व्यवस्थेअभावी पाणी साचण्याचे प्रकार घडतात. काही ठिकाणी सांडपाणी उघडय़ा गटारात सोडल्यामुळे ते घाणीचे पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ओला-सुका कचरा टाकण्यासाठी अशी कोणतीच व्यवस्था नाही. महामार्गाशेजारी ओहोळात कचरा टाकल्याने साथीच्या रोगांचा प्रार्दुभाव होऊ शकतो. भविष्यात झोपड़पट्टी, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरुस्ती, सांडपाणी यासाठी योग्य त्या उपायोजना करणे गरजेचे आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे

 मोपा विमानतळ आणि शेजारी होणाऱया अनेक प्रकल्पांमुळे भविष्यात लोकसंख्या अधिकच वाढणार आहे. शहराचा विकास झपाटय़ाने होणार आहे. यादृष्टीने ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधांनी विचार करणे गरजेचे आहे. यासाठी पायाभूत सुविधांवर भर देणे गरजेचे असून तसे नियोजन करणे गरजेचे आहे.

Related posts: