|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी पुढे या!

पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी पुढे या! 

26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना कुडाळात आदरांजली

वार्ताहर / कुडाळ:

 बॅ. नाथ पै शिक्षण संस्था (सिंधुदुर्ग), कुडाळ पोलीस ठाणे व कुडाळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 26/11 च्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच निष्पाप नागरिक या सर्वांना रविवारी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या पटांगणात शहीद स्तंभ उभारून त्यास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

 निवती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बाकारे यांच्या हस्ते शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी जि. प. माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, ध्येय
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित सामंत, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, सर्व अभ्यासक्रमांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, बॅ. नाथ पै बी. एड महाविद्यालय तसेच बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 बाकारे म्हणाले, 26/11 च्या मुंबई येथे झालेल्या हल्ल्याला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या जखमा अजूनही ओल्या आहेत. शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱयांच्या पत्नीने आपल्या निधनानंतर अवयवदान करून सामाजिक ऋण फेडण्याची परंपरा कायम ठेवली. हे आजच्या तरुण पिढीला समजणे गरजेचे आहे. परंतु अशाप्रकारच्या बातम्या सोशल मीडियाकडे का दाखविल्या जात नाहीत? असा प्रश्न त्यांनी केला. तसेच पोलीस दलाचे मनोबल वाढविण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

 मुंबईवरील अतिरेकी हल्ला आपल्या देशावरचा संघटित हल्ला होता आणि तो आपल्या देशातील पोलिसांनी यशस्वीपणे परतवून लावला. त्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणातून मलाही स्फूरण आले आणि आपणही एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व्हावे, असे मला वाटले आणि मी त्याप्रमाणे झालो.

  यावेळी बॅ. नाथ पै बी. एड. कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, बॅ. नाथ पै कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य श्वेता नाईक, बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य नागराज सूनगार, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या श्वेता खानोलकर उपस्थित होते. सूत्रसंचालन नम्रता मोरजकर यांनी केले. ‘भारत हमको जानसे प्यारा है’ हे देशभक्तीपर गीत सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून शहिदांना मानवंदना दिली. 26/11 च्या हल्ल्याची विद्यार्थ्यांनी लावलेली छायाचित्रे व वर्तमानपत्रातील विविध कात्रणेही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

Related posts: