|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ..तर बाल रंगभूमी सक्षम होणे गरजेचे

..तर बाल रंगभूमी सक्षम होणे गरजेचे 

सुंदर पाटणकर/ राजापूर

जास्तीत-जास्त मराठी नाटके रंगभूमीवर येणे ही काळाची गरज आहे. अन्यथा पुढील 10 वर्षांनी मराठी प्रेक्षक मिळवणे कठीण जाईल. यासाठी आमचा मराठी नाटकांवर भर आहे. आज मराठी रंगभूमी सक्षम होणे गरजेचे असेल तर बाल रंगभूमी सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळेच ‘शिवबा’पाठोपाठ 5 ते 15 वर्षे वयोगटातील तब्बल 22 कलाकारांना घेऊन काढलेले ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे नाटक जनमानसात चांगले साहित्य पोहोचवेल, असा विश्वास प्रसिध्द दिग्दर्शक प्रा. मंदार टिल्लू यांनी व्यक्त केला.

राजापूर तालुक्यातील सरस्वती विद्यामंदिर पाचलच्या रंगमंचावर बालकलाकारांचा ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकावर आधारित बालरंगभूमीवर पु. लं. च्या नानाविध वल्ली बालकलाकारांनी ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटय़प्रयोगातून दाखवून दिल्या. या प्रयोगाच्या निमित्ताने ते पाचलमध्ये आले असता ‘तरूण भारत’शी बोलत होते. आजची मुलं ही डोरमॉन, पोकेमॉन, छोटा भीम आदींमध्ये मुरली जात आहेत. त्यामुळे या मुलांना वेळीच ट्रक बदलून दिला पाहिजे.

पु. ल. देशपांडे बालवाचकांना कळायला हवेत

पु. ल. देशपांडे आज बालवाचकांना कळले पाहिजेत. त्यांच्या साहित्याचे वाचन झाले पाहिजे. यामुळे एक चांगले साहित्य जनमानसात पोहोचेल, यासाठीच हा बाल नाटय़प्रयोग हाती घेतल्याचे टिल्लू यांनी सांगितले. या नाटकात 5 ते 15 वयोगटातील तब्बल 22 बालकलाकार काम करत आहेत. ही सर्व मूल शाळेमधील असल्याने याचे नाटय़प्रयोग करताना सुट्टीचा दिवस विचारात घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

या बालकलाकारांचे नाटक बसवताना तसे फारसे प्रयास घ्यावे लागले नाहीत. या नाटय़प्रयोगातील सर्वाधिक बालकलाकार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील असले तरी त्यांची मराठीवर चांगली कमांड आहे. शिवाय या नाटकातील वल्ली या काल्पनिक असल्याने वल्लीसाठी पात्र निवडताना तसे दडपण आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारची नाटके होणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने वा सांस्कृतिक मंडळाने अशा प्रकारच्या नाटकांचे वारंवार प्रयोगाचे आयोजन केले पाहिजे, अशी अपेक्षा प्रा. टिल्लू यांनी व्यक्त केली.

तब्बल 80 कलाकारांचा समावेश

यापूर्वी ‘शिवबा’ हे ऐतिहासिक नाटक निघाले. तब्बल 80 कलाकारांचा समावेश असलेले हे नाटक फारच चालले आहे. किंबहुना ‘जाणता राजा’ नंतर या नाटकाने उज्ज्वल यश मिळवले आहे. या नाटकाचे आतापर्यंत सुमारे पावणेदोनशे नाटय़प्रयोग सादर झाले आहेत. त्यामुळे शिवबाप्रमाणेच पु. ल. देशपांडेंचे बालकलाकारांच्या अभिनयातील ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाला रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

बालनाटय़ प्रयोगाने महाराष्ट्र दौऱयाची सुरूवात

पाचल येथे झालेल्या बालनाटय़ प्रयोगाने महाराष्ट्र दौऱयाची सुरूवात केली आहे. बालकलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या या नाटय़प्रयोगाला पाचलवासियांना उत्स्फूर्त दाद दिली. कोकणकला अकादमी प्रकाशित आणि अमृता प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचे प्रा. मंदार टिल्लू हे दिग्दर्शक आहेत. सुप्रसिध्द दिग्दर्शक विजू माने व अशोक नारकर हे या नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकासाठी नैपथ्य प्रसाद वालावलकर यांनी केले असून सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा राजू आठवले, प्रशांत विचारे यांनी सांभाळली आहे. शितल तळपदे यांची प्रकाशयोजना या नाटय़ प्रयोगाला लाभली असून वैभव पटवर्धन यांचे पार्श्वसंगीत, प्रकाश निमकर यांची वेशभूषा तर सखाराम सकपाळ यांची रंगभूषा लाभली आहे.

Related posts: