|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गांधी उद्यानातील स्मारकाची फरशी पडण्याचा धोका

गांधी उद्यानातील स्मारकाची फरशी पडण्याचा धोका 

प्रतिनिधी/ बेळगाव

एसपीएम रोड येथील छत्रपती शिवाजी उद्यान व महात्मा गांधी उद्यानातील विकासकामे राबविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे उद्यानातील गांधी स्मारकाच्या फरशा निखळल्या असून या ठिकाणी खेळणाऱया मुलांना धोकादायक बनल्या आहेत. याबाबत तक्रार करूनही याकडे मनपाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे.

छत्रपती शिवाजी उद्यानाचा विकास अमृत योजनेंतर्गत करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. सदर कामाचा शुभारंभ महापौरांच्या हस्ते करण्यात आला. पण या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली नाही. यामुळे शिवाजी उद्यानाच्या विकासाला कधी प्रारंभ होणार, अशी विचारणा होत आहे. शिवाजी उद्यानातील पेव्हर्सची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य ठेवण्यात आले होते. सदर साहित्य खराब झाल्याने काढून टाकण्यात आले. पण त्यानंतर या ठिकाणी नव्याने साहित्य बसविण्यात आले नाही. तसेच शिवपुतळय़ाच्या चौथऱयाच्या फरशा निखळल्या असल्याने नव्याने बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी उद्यानाची निर्मिती, खेळाचे साहित्य आदींसह विविध विकासकामे राबविण्यासाठी अमृत योजनेंतर्गत 50 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमधून म. गांधी उद्यानातील विकासकामे राबविण्यात येणार आहेत. या कामाचा शुभारंभ महापौरांच्या हस्ते करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात यापैकी कोणत्याच कामाला अद्याप सुरुवात करण्यात आली नाही. यामुळे उद्यानाचा विकास केव्हा होणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.

म. गांधी उद्यानातील स्मारकाच्या फरशा निखळून पडण्याच्या स्थितीत आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. फरशी पडून अपघात घडल्यानंतरच महापालिकेच्या अधिकाऱयांना जाग येणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. येथील उद्यानाची देखभाल व्यवस्थित केली जात नसल्याने दुरवस्था झाली आहे. या उद्यानाचा विकास करण्याची गरज आहे. ही कामे तातडीने करण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

Related posts: