|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चाय बेचा! देश नही!

चाय बेचा! देश नही! 

साऱया देशाचे लक्ष गुजरात विधानसभा निवडणुकीकडे लागलेले आहे. गेले काही दिवस राहुल गांधींनी गुजरातमध्ये ठाण मांडून मोदी विरोधात वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पटेल व सहकाऱयांनी काँग्रेस पक्षात जान आणण्याचा प्रयत्न केला आणि हे करताना साऱया नेत्यांचा तोल ढळलेला दिसत आहे. गेली काही वर्षे गुजरात हे संपूर्ण देशाचे एक सत्ता केंद्र बनलेले आहे. मोदी नावाचे वादळ गांधीनगरातून सुरू झाले व ते आज नवी दिल्लीत ठाण मांडून बसले आहे. मोदींच्या सोमवारच्या धडाकेबाज भाषणाने मरगळलेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये जान आणली. पंतप्रधानांवर शिंतोडे उडविताना काँग्रेसच्या नेत्यांनी कोणताही मुलाहिजा राखला नाही. प्रथमच गुजरातमध्ये विखारी प्रचार होतो आहे. भाजपला संपविण्याचा विडा उचललेल्या राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे तर सत्ताधारी भाजपसाठी निवडणूक ‘करो या मरो’ अशी स्थिती  आहे. साऱया देशाचे राजकारण हे गुजरात निवडणुकीवर अवलंबून आहे. राहुल गांधी यांनी गुजरातमधील अस्वस्थ नेत्यांना व जनतेला बरोबर घेऊन मोदींविरोधात जोरदार प्रचार सुरू केला आहे. पटेल समाजाचे प्राबल्य असलेल्या गुजरातमध्ये 30 टक्के मतदार हे त्या समाजाचे आहेत. या समाजाला राखीवतेची मागणी करीत हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये आंदोलन झाले व भाजप सरकारसमोर फार मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विद्यमान निवडणूक ही भाजपला जड जाईल, असे भाकित काही मीडिया हाऊसेसनी केल्याने भाजपच्या पोटात गोळा आला. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसबरोबर केलेल्या समझोत्यामुळे काँग्रेसला कधी नव्हे तेवढे बळ आलेले आहे. त्याच आधारे राहुल गांधींना हुरुप येऊन त्यांनी मोदींच्या विरोधात गुजरातमध्ये गरळ ओकण्यास प्रारंभ केला. या निवडणुकीत ‘जो जीता वही सिकंदर’ ठरणार आहे. गेली 22 वर्षे गुजरातमध्ये जनतेने भाजपशिवाय दुसऱया कोणाचा विचारच केलेला नाही. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनण्यास गुजराती जनतेने दिलेला नैतिक पाठिंबा व बळ हेच जास्त जबाबदार आहे. सारा देश मोदींनी 2014 मध्ये पिंजून काढला. आज पुन्हा एकदा मोदींवर सारा गुजरात पिंजून काढण्याची वेळ आली. वास्तविक ते आता पंतप्रधान झाल्याने त्यांनी थोडय़ा सभा घेतल्या असल्या तरी पुरेशा ठरल्या असत्या परंतु गेल्या अनेक वर्षात होती तशी परिस्थिती आज गुजरातमध्ये नाही. या निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच पुन्हा गुजरातचे अनभिषिक्त राजा ठरणार म्हणून छातीठोकपणे कोणी ग्वाही देत नाही. वाढती महागाई, नोटा बंदी व त्या अनुषंगाने लादलेले अनेक निर्बंध, जीएसटी या सर्वांमुळे गुजरातमध्ये जनता त्रस्त झालेली आहे. त्यातच भाजपच्या व्होट बँकेला हार्दिकने लावलेला सुरुंग. काँग्रेसने परिस्थितीचा लाभ उठवित पटेल समाजाला आरक्षणाचे गाजर दाखविले आहे. आरक्षणाचे प्रमाण 49 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचाच आदेश आहे. गुजरातमध्ये ज्या मागास जाती-जमातींना आरक्षण दिलेले आहे त्याचा लाभ पटेल समाजाला कसा देता येईल? हा खरे तर गंभीर प्रश्न आहे. नव्याने कोणाला राखीवता द्यावयाची असल्यास कोणाचीतरी राखीवता कमी करावी लागेल. तसे झाल्यास इतर समाज रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन सुरू करतील. भाजप सरकारने पटेल समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वी घेतलेला होता परंतु प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. काँग्रेसने परिस्थितीचा लाभ उठवित आम्ही राखीवता देतो, असे आश्वासन पटेल समाजाला दिलेले आहे. यामुळे पटेल समाजातील मोठय़ा प्रमाणात युवा मतदार सध्या काँग्रेसच्या सभांना गर्दी करतो आहे. यातून भाजपची झोप उडालेली आहे मात्र चार दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काही अतिउत्साही नेत्यांनी ‘चायवाला पंतप्रधान’ म्हणून जी काही टर उडविली ती गुजराती जनतेच्या जिव्हारी लागली आणि भाजपसाठी हा टर्निंग पॉईंट ठरला आणि भाजपने त्याचे भांडवल केले. साहजिकच मोदींना त्याची थोडीफार सहानुभूती मिळाली आहे. सोमवारी मोदींनी पुन्हा एकदा गुजरातच्या सभेत तुतारी फुंकताना ‘चाय बेचा है देश नही बेचा!’ असे निवेदन करून काँग्रेसची खिल्ली उडविली. मोदी हे वाप्प्रचुर आहेत. त्यांच्या वक्तृत्वाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. आपण चहा विकलेला आहे. तुमच्यासारखा देश विकण्याचा प्रयत्न कधी केला नाही, असे निवेदन करून मोदींनी गुजरातमध्ये काँग्रेससमोर अडचणी निर्माण केल्या. आपण मुख्यमंत्री असताना केंद्रात काँग्रेसच्या सरकारने गुजरातची चारही दिशांनी कोंडी कशी केली हे सोमवारी मोदींनी जाहीर केले आणि काँग्रेसला मत देणे म्हणजेच गुजरातच्या विरोधात मतदान होईल, असे निवेदन करून काँग्रेसला अडचणीत आणले. गुजरातची निवडणूक होईपर्यंत देशात कितीतरी राजकीय घटना घडतील हे कळणार नाही. सध्या मात्र गुजरातची निवडणूक हा जणू राष्ट्रीय प्रश्न असल्याप्रमाणे संपूर्ण देशात गाजतो आहे. गेले काही महिने मूग गिळून गप्प बसलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर एवढी गंमत केली आहे की त्यांनी गुजरातमध्ये आपल्या ‘आप’ पक्षातर्फे निवडणुकीत उमेदवार उतरविलेले आहेत, याचाही त्यांना विसर पडला. त्यांनी कोणलाही मतदान करा परंतु भाजपला हरवा असे आवाहन जनतेला केले. ऐन निवडणुकीत काँग्रेसच्या राजवटीतील काही प्रकरणे अचानक उकरून काढण्यात येऊन भाजपने काँग्रेसला अडचणीत आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. सोमवारी मोदींनी काँग्रेसच्या देशभक्तीवर संशय व्यक्त करून या पक्षाच्या नेत्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. चाय विक्रेता पंतप्रधान म्हणून खिल्ली उडविणाऱया काँग्रेसची गेम काँग्रेसवर उलटू लागली आहे. शेवटी लढा मोदींशी आहे! असा निवेदन वजा इशारा मोदींनी गुजरातच्या सभेत देऊन भाजपसाठी जान आणली असेलही परंतु हे निवेदन पंतप्रधान पदावर असलेल्या नेत्याकडून निश्चित अपेक्षित नव्हते. निवडणुकीत सारे क्षम्य असते?

Related posts: