|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जेएसडब्ल्यू विरोधात 5 डिसेंबरला उपोषण

जेएसडब्ल्यू विरोधात 5 डिसेंबरला उपोषण 

नांदीवडे ग्रा. प. पदाधिकारी, ग्रामस्थ आक्रमक

वार्ताहर /गणपतीपुळे

जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात विविध मागण्यांसाठी ग्रुप ग्रामपंचायत नांदीवडेचे पदाधिकारी व ग्रामस्थ 5 डिसेंबर 2017 रोजी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणास बसणार आहेत. तशा आशयाची पत्रे त्यांनी विविध खात्यांना दिली असल्याचे सरपंच दिक्षा हळदणकर यांनी पत्रकारांना सांगितले.

ग्रुप ग्रामपंचायत नांदीवडे यांच्यामार्फत उपोषणासंदर्भात विविध खात्यांना पत्र देण्यात आले असून यामध्ये त्यांनी आपल्या 7 मागण्या केल्या आहेत. यामध्ये जेएसडब्ल्यू एनर्जी कंपनीत कार्यरत असणारे विजय वाघमारे हे स्थानिकांना अपमानास्पद वागणूक देत असून त्यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाघमारे यांच्या बदली करण्यासंदर्भात ग्रा.पं. नांदीवडेमार्फत 3 सप्टेंबर 2016 तसेच 27 ऑक्टोबर 2016 या तारखांना कंपनीला पत्र देण्यात आले आहे तसेच दि. 26 डिसेंबर 2016 रोजी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे तसेच कंपनीमध्ये कार्यरत असणाऱया स्थानिकांना कंपनीमध्ये कायम करणे, ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील जमिनी गेलेल्या शेतकऱयांच्या प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला रोजगार उपलब्ध करुन देणे अशा प्रमुख मागण्या आहेत. आंबुवाडी घाटमाथ्यावरील ऍश पाँडमधील ऍश उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात कंपनीकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुन सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही. पावसामध्ये सदरची ऍश पाँडमधील राख वाहत येऊन बागवाडी येथील विहीरीमध्ये व शेतामध्ये जाते त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे तेथील राख अन्य ठिकाणी उचलून न्यावी, नांदीवडे ग्रा.पं. कार्यक्षेत्रातील विहिरीचे पाणी कंपनीच्या प्रदुषणामुळे दुषीत झाल्यामुळे कंपनीने या कार्यक्षेत्रातील तळ्यावर नळपाणी पुरवठा योजना करुन ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेली आहे. मात्र कंपनीमुळे विहिर दुषीत झाल्यामुळे तळ्यावरील नळ पाणीपुरवठा योजनेचा सर्व खर्च कंपनीने करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे.

याप्रमाणे नांदिवडे गावात येणाऱया मुख्य रस्त्यालगत तसेच माध्यमिक विद्यामंदिर जयगड हायस्कूलसमोर कंपनीच्या लेबर कॉलनी आहेत त्या कॉलनीमधील कामगारांमुळे तेथे दोन घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून लेबर कॉलनीला बंदिस्त कंपाऊंड वॉल बांधणेबाबत कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला होता परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली नाही. तसेच स्थानिक कामगारांना पगारवाढ करणेबाबत विजय वाघमारे यांनी सुमारे तीन महिन्यापूर्वी आश्वासन दिलेले होते. परंतु अद्यापही पगारवाढ दिलेली नाही ती देण्यात यावी अशा मागण्या नांदिवडे ग्रामस्थांच्या असून यासाठी ग्रुप ग्रामपंचायत नांदिवडे सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह सुमारे 23 ग्रामस्थ उपोषणाला 5 डिसेंबर 2017 रोजी बसणार आहेत.

सदरच्या अर्जाची नक्कल माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक जयगड यांना देण्यात आल्याचे यावेळी पत्रकारांना सांगण्यात आले.

Related posts: