|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नाते सासू-सुनेचे

नाते सासू-सुनेचे 

मॅडम, आम्हा दोघांनाही थोडंसं बोलायचं होतं हो.. बोला ना… आमच्या मुलाचं लग्न ठरलं. लव्ह मॅरेज… आम्ही आढेवेढे न घेता संमती दिली. दोघंही उच्चशिक्षित आहेत. परंतु माझ्या मिस्टरना टेन्शन आलंय. आता सूनबाई येणार… तिचा स्वभाव कसा असेल. ती कितपत समजून घेईल? मला म्हणतात कसे, तिच्या समोर हाफ पॅण्टवर फिरायलाही मला ऑकवर्ड वाटेल. मी म्हटलं माझ्या मिस्टरना…,  अहो, ती मॉडर्न मुलगी.. आमच्यासारख्या साडय़ा का नेसणारेय? तीच थ्री फोर्थवर हिंडेल घरात. तुम्हाला कसली नको ती टेन्शन्स (भेटायला आलेल्या दाम्पत्यापैकी काका मध्येच कांकूना थांबवत) ए…. ए… थांब. माझं गाऱहाणं सांगतेस, आता मी बोलतो. मॅडम, हिच्या मैत्रिणींच्या सुनांचे अनुभव ऐकून हिलाच टेन्शन आलंय जास्त. सुनेशी पटेल का? ती स्वयंपाक करेल का… तिला स्वयंपाक येत असेल का? आपल्याला किती महत्त्व उरेल. मुलगा आता कसा वागेल. आपल्या जबाबदाऱया कमी होणार की दुप्पट… थोडा तरी रिलॅक्सपणा मिळणार का? की नऊ वाजले तरी उठायचा पत्ता नाही, केसाला फणी नाही नि अंगाला पाणी नाही.’’ असं झालं तर… रोज डोकं खातेय माझं. तुम्हीच समजवा हिला. अहो… तुम्ही गप्प बसा हो जरा, मी बोलते मॅडमजवळ. अगं ए, आता असं भांडताही येणार नाही आपल्याला सुनेसमोर, असं म्हणत काका एकदम गंभीर झाले.

आपल्या त्रिकोणी कुटुंबात सुनेचा होणारा प्रवेश एकीकडे आनंददायी पण दुसरीकडे या सिनिअर दाम्पत्याला भलताच अस्वस्थ करून गेला होता. ‘सुने’ संदर्भातले मैत्रिणींचे अनुभव, आणि ‘शेवटी सून ती सूनच’, स्वतःची मुलगी असणं हे वेगळंच हो’ अशा प्रकारचे शेरे मनात घर करून बसले होते.

मुळातच काही नात्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वर्षानुवर्षांच्या बऱया- वाईट अनुभवांवरून आणि काही गोष्टींच्या पगडय़ामुळे अनेकदा वेगळाच असतो. काही नात्यांना नकारात्मक लेबलं चिकटवली जातात. उदा. सासू-खाष्ट, नणंद -दुष्ट, जावा जावा-उभा दावा, सासू-सारख्या सूचना, सून-सtचना नको म्हणते ती. वगैरे वगैरे… वास्तविक पाहता कोणतेही नाते फुलणे वा कोमेजणे हे तुमची त्या नात्यामधली कमिटमेंट, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, प्राप्त परिस्थितीतील तुमची वाटचाल समोरच्याचा प्रतिसाद, समंजस स्वीकार अशा अनेक गोष्टीवर अवलंबून असते.

सुरुवातीच्या उदाहरणातील त्या दाम्पत्याप्रमाणे मुलाच्या लग्नाचा आनंद परंतु  ‘सून’ येणार म्हणून मनात असलेले अनेक प्रश्न, अनेक विचार यामुळे मनावर येणारा ताण, दडपण अनेकांना येऊ शकते. परंतु ‘सासू’प्रमाणेच सर्वस्वी नवीन घर आणि माणसांमध्ये प्रवेश करणाऱया ‘नववधू’लाही ‘सून’ हे नातं कसं असेल वा ते कितपत निभावता येईल या मानसिक ताणाला सामोरं जावं लागतं. विवाहपूर्व समुपदेशनाच्या वेळी अनेकदा याचा अनुभव येत असतो. वेगवेगळय़ा माणसांनी त्यांच्या अनुभवांवरून सांगितलेले किंवा काही पाहिलेले ‘सासू-सुनांचे’ किस्से, सीरियल्स-चित्रपट यामध्ये रंगविण्यात येणाऱया या नात्यासंदर्भातल्या नकारात्मक भूमिका अशा अनेक गोष्टींमुळे आपण या नात्याकडे वेगळय़ाच नजरेने पाहू लागतो. परंतु एखाद्या व्यक्तीला एखाद्या नात्याकडून आलेला अनुभव हा तिच्या मर्यादित चौकटीपुरता तसा असेल तरी ते सार्वत्रिक वा सार्वकालिक सत्य ठरत नसते.

मुलाच्या विवाहानंतर सुनेचे घरात आगमन झाल्यावर प्रत्येक लहानसहान गोष्टींवर अवलंबून असलेला आणि जीवापलीकडे जपलेला तुमचा ‘लाडला’ ‘तिच्या’
मनाप्रमाणे वागू लागतो. लग्नापूर्वी आईने सांगितलेली कामे न ऐकणारा ‘तो’ तिच्या एका हाकेवर एखादे काम विनातक्रार करतो. एरवी जेवणाच्या आवडी निवडी सांगणारा, तक्रारी करणारा ‘तो’ सुरुवातीच्या काळात त्याला न आवडणारा परंतु तिने बनविलेला एखादा पदार्थ बिनबोभाटपणे खातो. त्याचा बराचसा वेळ तिच्या सोबतच जाऊ  लागतो, त्यावेळी मग ‘आता तो अगदी तिच्या तंत्राने वागतो नाही?!’…. आपलं महत्त्व कमी होत चाललंय. आता त्याला आपली गरज भासणार नाही बहुदा असं कुणीतरी नाकारल्याची वा कमी लेखल्याची भावना मुलाच्या आईला येऊ लागते. यातून मग अनेकदा तुलना, चिडचिड, कौतुकाची शाबासकी न देणं अशा गोष्टी घडू लागतात. घडू शकतात. परंतु अगदी सुरुवातीपासूनच एकेकाळची ‘सून ते सासू’ असा स्थित्यंतराचा प्रवास अनुभवलेल्या सासुबाईंनी सुनेला समजून घेत प्रोत्साहन, कौतुक, पाठिंबा दिला तर ते त्या दोघींच्या नात्यातील दीर्घकालीन प्रवासासाठी फार मोलाचं आणि सकारात्मक ठरेल. याउलट ‘आमच्यावेळी नव्हतं हो असलं काही, आम्ही इतकी कामं, जबाबदाऱया सांभाळल्यात, आम्ही नाही कधी वागलो सासूजवळ अशा…’ किंवा ‘हल्ली कुणाला काही करायला नको. रेडिमेडचा जमाना हो..’ असे उद्गार बदलत्या पिढीच्या पचनी पडतही नाहीत आणि त्यातून केवळ ‘तणाव’ आणि धुसफुस निर्माण होण्यापलीकडे काहीच साध्य होत नाही, हे ही काळजीपूर्वक लक्षात ठेवायला हवं. सून म्हणून नवीन घरात प्रवेश केल्यानंतर त्या कुटुंबातील माणसं माझी कशी होतील, आपल्या क्षमतांच्या आधारे मी या ‘माझ्या कुटुंबा’साठी काय करू शकेन यासाठी नववधूनेही सुरुवातीपासून प्रयत्नशील राहायला हवे. शिवाय आपले सासू-सासरे वयाने, अनुभवाने मोठे आहेत याचे भान ठेवत काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. सतत स्वतःच्या माहेरचा उल्लेख, ‘आमच्याकडे अशी सवय नाही हो.’ वगैरे पद्धतीचे उद्गार टाळलेलेच बरे. आतापर्यंत संसारगाडा चालविलेल्या सासुबाईंकडून काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या तर त्यात कमीपणा न मानता ते आत्मसात करणं कधीही ‘नातं’ फुलवणारंच ठरेल! दोघंही पतीपत्नी दिवसभर नोकरी-व्यवसायात व्यग्र असतील तर साऱयाच जबाबदाऱया ज्ये÷ांवर सोपविण्यापेक्षा कामासाठी कुणीतरी मदतनीस ठेवून तसे नियोजन करणे हितावह ठरेल.

अनेकदा ‘सासू आई व्हावी’ आणि ‘सून मुलगीसारखी वागावी’ असा अट्टहास अनेकजण करतात. परंतु ‘असणं’ आणि ‘होणं’ यातील नैसर्गिक वास्तविकता प्रामाणिकपणे स्वीकारून आई-मुलीच्या नात्याच्या अट्टहासापेक्षा ‘सासू-सुना’ मैत्रिणी कशा होतील हे पाहिलं तरी ते नातं अधिक फुलेल आणि मग कॉमन फॅक्टर असलेला ‘तो’ (हिचा मुलगा-तिचा नवरा) हे तणावाचं कारण न बनता घरात हास्य फुलेल. सासू-सुनेच्या नात्यामध्ये सारख्या कुरबुरी वा एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या सवयीतून निर्माण होणारा तणाव सारे कौटुंबिक वातावरण बिघडवून टाकतो. या वादविवादाच्या कात्रीमध्ये ‘नवरा’ अडकतो आणि कुणाला ‘हो’ म्हणावं की ‘नाही’ यामध्ये त्याची अवस्था दयनीय होते. एकमेकांना सातत्याने विरोध करणे टाळले, सुसंवादातून काही गोष्टीतून मार्ग काढला तर कौटुंबिक जीवन ही आनंदाची यात्रा राहील. सध्याच्या संघर्षमय गतिमान जीवनामध्ये जीवनाचा वेग आणि भावनांचा आवेग याचा सुवर्णमध्य साधण्यासाठी कौतुक, प्रोत्साहन, पाठिंबा या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. दुसऱयाजवळची तुलना टाळत नकाराऐवजी होकार आणि झिडकारण्याऐवजी एकमेकींचा केलेला समंजस स्वीकार’ सासू-सूनेचे नाते नक्कीच फुलवेल! संभाषण आणि सुसंवाद सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनाची मशागत करतो. अमेरिकन मानसतज्ञ व्हर्जिनिया सॅटीर म्हणतात, Feelings of worth can flourish only in an atmosphere where individual differences are appreciated, mistakes are tolerated, communication is open and rules are flexible-the kind of atmosphere is found in a nuturing family.”!

Related posts: