|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पाच जनावरे, 31 तोळे सोने, 5 लाखाची रोकड खाक

पाच जनावरे, 31 तोळे सोने, 5 लाखाची रोकड खाक 

प्रतिनिधी/ ढेबेवाडी

घोटील (ता. पाटण) येथे शॉर्टसर्किटने घराला लागलेल्या आगीत पाच जनावरांसह 31 तोळे सोने, पाच लाख 20 हजार रुपयांची रोकड व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 20 लाख 70 हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना सोमवारी रात्री एकच्या सुमारास घडली. सहा कुटुंबांनी आयुष्यभर काबाडकष्ट करत उभा केलेला संसार उद्ध्वस्त झाला. या दुर्घटनेमुळे या कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या.

वाल्मिक पठारावरील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत घोटील गाव आहे. येथील नवीन पिढी मुंबईला नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक असली तरी बहुतांश लोक गावातच राहून शेतीसह पशुपालन व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. येथील मारूती महादेव पवार यांचा दूध व शेती व्यवसाय आहे. कुटुंब मोठे असल्याने त्यांनी आपले बंधू श्रीरंग महादेव पवार, राजाराम महादेव पवार, तानाजी पवार यांना एकत्र घेऊन दहा खणी घर बांधले आहे. घर एक असले, तरी सहा कुटुंबाच्या चुली वेगवेगळ्या आहेत.

सोमवारी दिवसभर रानात राबून थकलेले कुटुंब गाढ झोपेत असताना रात्री एकच्या सुमारास अचानक मारूती पवार यांच्या घराला शॉर्टसर्किटने अचानक आग लागली.  आगीने बघताबघता रौद्ररुप धारण केले. घरात 25 लोक होते. आग लागल्याचे समजताच सर्व जण घराबाहेर पळाले. गोठय़ातील 15 जनावरे सोडून दिली. यातील 10 जनावरे गोठय़ातून बाहेर पळाली. मात्र 5 जनावरे उलटी आत घरात घुसल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यामध्ये दोन म्हशी, दोन वासरे व एका खोंडाचा समावेश आहे. यावेळी जमा झालेल्या ग्रामस्थांनी कूपनलिकेच्या पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुमारे पाच तासानंतर आग आटोक्यात आली.

ढेबेवाडीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. व्ही. डी. साळुंखे, उमरकांचनचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. सतीश पाटील, हणमंत कुष्ठे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीत जखमी झालेल्या दोन जनावरांवर उपचार सुरू केले.

 दरम्यान, महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार अंकुश राजाराम पवार यांचे जनावरांचे शेड जळून 45 हजाराचे नुकसान झाले आहे तर तानाजी पवार यांचे 4 तोळे सोने, 40 हजाराची रोकड व इत्तर साहित्य मिळून 2 लाख 95 हजाराचे नुकसान झाले. मारुती पवार यांचे 11 तोळे सोने, रोख दीड लाख, एक म्हैस व रेडी असे मिळून 7 लाख 90 हजाराचे नुकसान झाले. श्रीरंग पवार यांचे चार तोळे सोने व रोख 90 हजार रुपये व इत्तर साहित्य मिळून नुकसान 2 लाख चाळीस हजाराचे नुकसान झाले.  

  तर महादेव पवार यांचे 8 तोळे सोने, रोख 80 हजार व इत्तर मिळून 2 लाख चाळीस हजाराचे नुकसान झाले आहे. मंडल अधिकारी प्रवीण शिंदे व गावकामगार तलाठी अमोल चव्हाण यांनी पंचनामा केला.

Related posts: