|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावमधील कलाकारांमध्ये मोठा उत्साह

बेळगावमधील कलाकारांमध्ये मोठा उत्साह 

बेळगाव / प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा जाज्वल्य इतिहास सतत प्रेरणादायी ठरतो. बेळगाववासियांना हे शिवचरित्र पुन्हा एकदा जवळून पाहता यावे, यासाठी ‘तरुण भारत ट्रस्ट’तर्फे दि. 9 डिसेंबरपासून सीपीएड् मैदानावर ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. हे महानाटय़ पाहण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून यामध्ये काम करणारे स्थानिक कलाकार रात्री जागवून सराव करत आहेत.

जाणता राजा हे एक जगातले सर्वात मोठे फिरते महानाटय़ म्हणून ओळखले जाते. या महानाटय़ाचे देशाबरोबरच परदेशातही 1 हजार 51 प्रयोग सादर करण्यात आले आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात येथे जाणता राजाचे हिंदी भाषेतून यशस्वी प्रयोग सादर करण्यात आले. घराघरात शिवचरित्र पोहोचविण्याचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा हा एक प्रयत्न आहे.

जाणता राजा महानाटय़ाचे दिग्दर्शक योगेश शिरोळे यांनी कलाकारांचा मंगळवारी सराव घेतला. या नाटय़ामध्ये 125 स्थानिक कलाकार काम करत आहेत. बेळगावमधील कलाकार शिवजयंतीमध्ये विविध प्रसंग सादर करत असल्याने ते हे प्रसंग लिलया सादर करत आहेत. यामध्ये 8 वर्षाच्या मुलांपासून 52 वर्षाच्या वयस्कर व्यक्ती सहभागी करून घेण्यात आल्या आहेत. बुधवारपासून प्रसंगारुप सराव करण्यास सुरुवात होणार आहे.

कलाकारांचा उत्साह वाखाणण्याजोगा-योगेश शिरोळे

ज्या भागात जाणता राजा सादर केला जातो. त्या ठिकाणच्या स्थानिक कलाकारांना संधी मिळावी यासाठी स्थानिक कलाकारांची निवड करण्यात येते. त्यामुळे त्या कलाकारांमध्ये जाणता राजा महानाटय़ाची नाळ जुळून राहते. बेळगावमधील कलाकारांमध्ये मोठा उत्साह असून तो वाखाणण्याजोगा असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

Related posts: