|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सरला हेरेकर यांच्या बेताल वर्तनामुळे सभागृहात गदारोळ

सरला हेरेकर यांच्या बेताल वर्तनामुळे सभागृहात गदारोळ 

प्रतिनिधी / बेळगाव

मनपा सभागृहात बैठकीवेळी असभ्य वर्तन करुन नगरसेविका सरला हेरेकर यांनी चांगलाच गदारोळ माजविला. त्यांच्या वर्तनामुळे नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीच्या पूर्वार्धात त्यांनी असंसदीय शब्दांचा भडीमार करुन सभागृह डोक्मयावर घेतले तर दुसऱया सत्रात नगरसेवकांशी हुज्जत घालत चक्क व्हरांडय़ातच लोळण घेतली.

चंदीगड दौऱयाच्या पार्श्वभूमीवर माहिती जाणून घेण्यासाठी आयोजित केलेली ही बैठक नगरसेविका सरला हेरेकर यांच्या वर्तनामुळेच चर्चेची ठरली. चंदीगडमधील विविध सुविधांचा मुद्दा चर्चेला घेण्यात आला असताना त्यांनी आक्षेपार्ह शब्दांचा भडीमार करुन थयथयाट केला. त्यांच्या या बेताल वर्तनाची दखल घेवून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली. मात्र महापौरांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न करुनही त्यांनी आपली वटवट सुरुच ठेवल्याने सर्वच नगरसेवकांना त्यांची समजूत काढण्याची वेळ आली.

नगरसेवकांनी नुकताच चंदीगडचा दौरा केला. तेथील विविध नागरी सुविधांच्या संदर्भात माहिती देण्याची सुरुवात सत्ताधारी गटाचे गटनेते पंढरी परब यांनी केली. चंदीगड येथील घनकचरा निर्मूलन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाविषयी त्यांनी विवेचन केले. चंदीगड शहरात बायोगॅस निर्मितीपासून उपलब्ध झालेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. बेळगाव शहरामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्याविषयी त्यांनी सूचना केली.

चंदीगड शहरात होर्डिंग्ज नाहीत

माजी महापौर किरण सायनाक यांनी चंदीगड शहरात होर्डिंग्ज आणि जाहिरात फलक लावण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले. बेळगावमध्ये जाहिरात फलक आणि होर्डिंग्जमधून मोठा महसूल उपलब्ध होवूनही त्याचा विनीयोग योग्य रितीने होत नसल्याचे सांगितले. ओला आणि सुका कचरा असे विघटन योग्यरितीने करुन त्यामधून वीज आणि गॅस निर्मितीचे प्रयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. चंदीगडप्रमाणेच बेळगावात रॉक गार्डनची निर्मिती व्हावी, अशी मागणी त्यांनी मांडली.

चंदीगड दौरा हा पैशाचा अपव्यय

यानंतर सरला हेरेकर यांनी चंदीगड दौरा हा पैशाचा अपव्यय ठरल्याचे म्हणणे मांडून जोरदार टीका केली. सदर दौऱयामध्ये काही नगरसेविकांच्या पतीराजांचा सहभाग होता. हे कोणत्या कायद्याच्या चौकटीत बसते? मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांना दौऱयावर का नेले नाही, अशी सरबत्ती केली. त्यांच्या या वक्तव्याच्या वेळीच त्यांनी नगरसेवक ऍड. रतन मासेकर यांना उद्देशून काही अपशब्द वापरले. त्याला आक्षेप घेऊन नगरसेवक राजू बिर्जे, मनोहर हलगेकर, यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

सरला हेरेकर यांचे वर्तन रुचले नसल्याने उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच महापौरांकडे पाठ फिरवून त्यांचा अवमान केल्याची जाणिव त्यांना करुन दिली. यामुळे संतप्त झालेल्या सरला हेरेकर यांनी अक्षरशः थयथयाट सुरु केला. त्यांची समजूत काढून त्यांना आवर घालताना त्यांच्याच सहकारी वर्गाच्या नाकीनऊ आले. त्यांचे हे वर्तन पाहून सभागृहात उपस्थित सर्वांनीच खेद व्यक्त केला.

Related posts: