|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रस्त्याशेजारी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा निर्णय

रस्त्याशेजारी कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा निर्णय 

प्रतिनिधी/ बेळगाव

घरोघरी जाऊन कचरा घेतला जात आहे, तरी देखील कचरा रस्त्याशेजारी टाकला जातो. तसेच कचरा जाळण्याचा प्रकारही सुरू आहे. यापुढे असे प्रकार निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत घेण्यात आला. पंधरा दिवसांचा अवधी देऊन त्यानंतर दंड वसूल करण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

  कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण बैठक ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. यावेळी विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. स्वच्छतेबाबत चर्चा करताना वरील निर्णय घेण्यात आला. कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलचे डॉक्टर रुग्णांना व्यवस्थित वागणूक देत नाहीत, तसेच क्वॉर्टर्समध्ये न राहता खासगी घरात रहात असल्याने रुग्णांना व्यवस्थित सेवा मिळत नाही. यामुळे नोटीस बजाविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गाळेधारकांना एक वर्षाची मुदत देण्यात येत असल्याने मुदतवाढीसाठी भाडेकरू न्यायालयात धाव घेतात. यामुळे पाच वर्षांची मुदत देण्याची सूचना साजिद शेख यांनी केली. पण सरकारी जागेवर काहीही करताना याबाबत कायद्यानुसार सरकारकडे प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी लागणार असल्याची माहिती अध्यक्ष गोविंद कलवाड यांनी दिली. गाळे भाडेतत्त्वावर देण्याबाबत चर्चा करण्यात आली. रेल्वे स्टेशन बसस्थानक परिसरात इंदिरा कॅन्टीनकरिता भाडेतत्त्वावर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. बेऊर रोड येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच इमारत बांधकाम नियमावलीला मंजुरी देऊन शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला.

रस्त्याचे दुपदरीकरण करण्याची गरज

?   महादेव मंदिर ते सीईओ बंगल्यापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक जास्त असल्यामुळे रस्त्याचे दुपदरीकरण करण्याची गरज आहे. यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्यादृष्टीने विचार होणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव गोविंद कलवाड यांनी बैठकीत मांडला. हा रस्ता महत्त्वाचा असल्याने विकास करण्याची गरज असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. तसेच नागरिकांसाठी पाच ते सहा ठिकाणी खुल्या व्यायाम शाळा तसेच परेड रोड येथे संगीत गार्डन, सायकलिंग पार्क निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. थिमय्या रोडसह विविध परिसरात जागा निश्चित करण्याची सूचना कलवाड यांनी केली. समुदाय भवन बांधण्यास काही नागरिक विरोध करत आहेत. पण बहुतांश नागरिकांना समुदाय भवन गरजेचे असल्याने निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. मदन डोंगरे यांनी मांडले. याबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन काम सुरू करण्याचे ठरविण्यात आले.

?  यावेळी उपाध्यक्ष साजिद शेख, डॉ. मदन डोंगरे, निरंजना अष्टेकर, विक्रम पुरोहित, अरेबिया धारवाडकर, अल्लादिन किल्लेदार, रिझवान बेपारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्या शिवराम, आमदार फिरोज सेठ, कॅन्टोन्मेंट  बोर्डचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

Related posts: