|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंगणेवाडी भराडी देवीचा यात्रोत्सव 27 जानेवारीला

आंगणेवाडी भराडी देवीचा यात्रोत्सव 27 जानेवारीला 

प्रतिनिधी/ मसुरे

मसुरे आंगणेवाडी येथील दक्षिण कोकणची काशी, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान, नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या जागृत देवस्थान श्री भराडी देवीचा वार्षिक यात्रोत्सव 27 जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी सलग तीन दिवस सुट्टी असल्याने भक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून सुमारे 15 लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आंगणेवाडी मंडळाचे ग्रामीण अध्यक्ष नरेश आंगणे व मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी व्यक्त केला आहे.

यात्रोत्सवाची तारीख निश्चित करण्यापूर्वी सुमारे महिन्यापूर्वी देवीच्या आदेशाने धार्मिक विधी सुरू झाले होते. काही दिवसांपूर्वी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी ‘प्रसाद’ लावण्यात आला आणि शुक्रवारी सकाळी देवीने दिलेल्या आदेशानुसार यात्रोत्सवाची 27 जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. भराडी देवीच्या यात्रेच्या तारखेकडे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया व मुंबईस्थित आणि परदेशातील चाकरमानी भाविकांचे लक्ष असते. यात्रेची तारीख निश्चित झाली, की कोकणात जाणाऱया रेल्वे, बस तिकीट बूकींग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. यात्रोत्सवात जाण्यासाठी गाडय़ांचे बूकिंग अवघ्या काही मिनिटांत फूल होते. महाराष्ट्रातले अनेक राजकीय नेते, मराठी सिने-नाटय़ अभिनेते, अभिनेत्री या यात्रोत्सवासाठी आवर्जून हजेरी लावतात. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस व होमगार्डचे जवान तैनात असणार आहेत. दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठणाऱया यात्रोत्सवात यावर्षीही सुमारे 15 लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

40 वर्षांनी यात्रा जानेवारी महिन्यात

दरवर्षी यात्रेची तारीख ही फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असते. या वर्षी प्रथमच सुमारे 40 वर्षानंतर ही यात्रा जानेवारी महिन्यात होत आहे, अशी माहिती नरेश आंगणे यांनी दिली. लाखो भाविकांना यात्रेदिवशी कमी वेळेत मातेचे दर्शन व ओटय़ा भरण्यास मिळाव्यात, यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आंगणेवाडी मंडळ, ग्रामस्थ, मसुरे ग्रामपंचायत, जिल्हा, तालुका प्रशासन, महसूल, पोलीस प्रशासन लवकरच सुयोग्य नियोजन करणार आहेत. रविवारी सायंकाळी मोड यात्रेने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. यावर्षी प्रथमच यात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन असल्याने वृत्तपत्रे 27 रोजी बंद असणार आहेत.

Related posts: