|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अविश्वास ठरावावरून उपसरपंचाचे अपहरण

अविश्वास ठरावावरून उपसरपंचाचे अपहरण 

प्रतिनिधी/कराड

उपसरपंचांचे अपहरण करून तिघांनी सरपंचांवरील अविश्वास ठरावाला सहमत नसल्याच्या ठरावावर तसेच नोटरीवर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. करवडी (ता. कराड) येथील या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उपसरपंच अमोल भिकू माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

उपसरपंचांच्या फिर्यादीवरून आनंदा भिकोबा पिसाळ, नानासाहेब एकनाथ सूर्यवंशी व राजेंद्र अधिकराव पिसाळ (सर्व रा. करवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवडी ग्रामपंचायतीचे अमोल माळी हे उपसरपंच आहेत. ते करवडी ते कराड मार्गावर रिक्षातून प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतात. मंगळवार 28 नोव्हेंबर रोजी अमोल माळी रिक्षा घेऊन कराडला आले होते. कराडातून काही प्रवासी घेऊन सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा करवडीला गेले. त्या ठिकाणी आनंदा पिसाळ, नानासाहेब सूर्यवंशी व राजेंद्र पिसाळ या तिघांनी भाडेतत्त्वावर रिक्षा ठरवून अमोल यांना घेऊन कराडच्या तहसील कार्यालयात आले. त्या ठिकाणी नानासाहेब सूर्यवंशी याने काही कागदपत्रांची जुळवाजुळव केली. तसेच उंब्रजला जायचे आहे, असे अमोल यांना सांगितले. अमोल यांनी रिक्षा घेऊन उंब्रजला येण्यास नकार दिला. त्यावेळी आनंदा पिसाळ याने शिवीगाळ, धक्काबुक्की केली. त्यामुळे अमोल रिक्षा घेऊन त्या तिघांसमवेत उंब्रजला गेले. वाटेत आनंदा पिसाळ याने रिक्षा थांबवायला सांगून अमोल यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील एक हजार 800 रुपये काढून घेतले. 

अमोल यांना मारहाण केल्यानंतर पुन्हा ते तिघे रिक्षात बसले. अमोल यांना रिक्षा सातारला न्यायला सांगितली. साताऱयात जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गेल्यानंतर आनंदा पिसाळ याने अमोल यांना धमकावले. घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना काहीही सांगायचे नाही, असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वकिलासमोर नेऊन त्या तिघांनी नोटरी केली. त्यावर अमोल यांच्या सह्या घेतल्या. तसेच अविश्वास ठरावास संमती नसल्याच्या ठरावावरही सह्या घेतल्या. 

या प्रकारानंतर संबंधित तिघे जण पुन्हा अमोल यांना घेऊन रिक्षातून करवडी येथे आले. रात्री आठ वाजता त्यांनी अमोल यांना आनंदा पिसाळ याच्या शेडवर आणून सोडले. तसेच या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची नाही, असे धमकावले. अखेर शुक्रवारी अमोल माळी यांनी याबाबतची फिर्याद कराड तालुका पोलिसांत दिली. त्यानुसार तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Related posts: