|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आगाशिवनगरमध्ये कचरा टाकणारास रोखले

आगाशिवनगरमध्ये कचरा टाकणारास रोखले 

प्रतिनिधी/ कराड

मलकापूर नगरपंचायतीने ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात आघाडी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असतानाच आगाशिवनगर येथील त्रिमूर्ती कॉलनीत बाहेरून ट्रक्टर भरून आणली जाणारी दुर्गंधीयुक्त घाण टाकणाऱयांना नागरिकांसह नगरपंचायत कर्मचाऱयांनी शुक्रवारी दुपारी अटकाव केला. नागरी वस्तीत स्वमालकीच्या जागेत दुर्गंधीयुक्त घाणीचा साठा केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा नगरपंचायत कर्मचाऱयांनी दिला आहे.

दरम्यान, त्रिमूर्ती कॉलनीत स्वमालकीच्याच मोकळय़ा जागेत बाहेरून घाण आणून टाकला जाणार असल्याचे लक्षात आल्यावर महिलांनी स्वच्छता ऍपवर तक्रार केली. या तक्रारीची मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी तात्काळ दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त झाले.

मलकापूर नगरपंचायतीने सध्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत अनेक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत नगरपंचायतीने प्रत्येक मिळकतदारास ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी मोफत बकेट वाटप केले आहे. दिवसभरातील कचरा बकेटमध्ये वर्गीकरण करून तो नगरपंचायतीच्या कचरा गाडीत टाकण्याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक विभागातील नागरिकांकडून वर्गीकरण करून कचरा साठवला जात आहे आणि तो इतरत्र न टाकता थेट नगरपंचायतीच्या घंटागाडीत टाकला जातो.

एका बाजूला हे चित्र असताना आगाशिवनगर भागात सुशिक्षित नागरिकांकडूनच या अभियानाला हरताळ फासण्याचे काम सुरू असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. त्रिमूर्ती कॉलनीत एका मोकळ्या प्लॉटमध्ये बाहेरून ट्रक्टरने दुर्गंधीयुक्त घाण व माती आणून टाकण्याचा प्रयत्न शुक्रवारी सुरू होता. माती टाकण्यास नागरिकांचा विरोध नव्हता. मात्र दुर्गंधीयुक्त घाणीमुळे आसपास राहणाऱयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार, हे लक्षात आले. हा प्रकार महिलांनी नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून देत मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्याशी संपर्क साधला. दळवी यांनी तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यानुसार आरोग्य विभागाचे संपत हुलवान, रामभाऊ गायकवाड यांच्यासह कर्मचारी त्रिमूर्ती कॉलनीत दाखल झाले. त्यांनी दुर्गंधीयुक्त घाण असलेला ट्रॅक्टर त्रिमूर्ती कॉलनीत मोकळा करण्यास विरोध केला. तसेच यापुढे जर असा प्रकार केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपंचायतीकडून देण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत नगरपंचायतीच्या स्वच्छता ऍपवरही तक्रारी देण्यात आल्या आहेत.

Related posts: