|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जयगड ते डिंगणी रेल्वे प्रकल्पांचे काम बंद पाडले

जयगड ते डिंगणी रेल्वे प्रकल्पांचे काम बंद पाडले 

देण येथे रेल्वेप्रकल्पग्रस्तांचे धरणे आंदोलन

15 तारखेपर्यंत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन

वार्ताहर /संगमेश्वर

जयगड ते डिंगणी रेल्वेमार्गातील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी देण येथे धरणे आंदोलन केले. 9 गावांतून आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय काम करु देणार नाही तसेच देण येथे रेल्वेने सुरु केलेले अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबवावे, यासाठी शनिवारी जोरदार घोषणाबाजी देत काम बंद पाडले. प्रकल्पग्रस्तांच्या आक्रमक पवित्र्यामुळे रेल्वे अधिकारी व प्रशासनाने रेल्वेप्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल, असे सांगितले. त्यामुळे 5 तासानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

जयगड ते डिंगणी रेल्वेमार्गामुळे 9 गावांमध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा, त्यांना नोकरीमध्ये सामावून घ्यावे तसेच बदलणारे पाण्यांचे प्रवाह आदी विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी देण येथे धरणे आंदोलन पुकारले होते. धरणे आंदोलनासाठी शनिवारी सकाळपासूनच 9 गावांतून मोठय़ा प्रमाणात प्रकल्पग्रस्त जमा होवू लागले होते. शनिवारी सकाळी 11.30 वा.च्या दरम्यान सुमारे 700 प्रकल्पग्रस्त घटनास्थळी जमा झाले होते. प्रकल्पग्रस्त मोठय़ा संख्येने आल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देण येथे 8 एकर जमिनीमध्ये रेल्वेच्या ठेकेदाराने सुरु केलेले अनधिकृत बांधकाम बंद करण्यात यावे, यासाठी पंचायत समिती सदस्य पर्शुराम वेल्ये यांनी पाठपुरावा केला होता. प्रकल्पग्रस्तांनी हे काम तत्काळ बंद करावे, याची मागणी करताच हे काम तत्काळ बंद करण्यात आले.

तसेच हे काम मागणी पूर्ण झाल्याशिवाय सुरु करणार नसल्याचे प्रकल्पग्रस्तांना आश्वासन देण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, उद्योजक अण्णा सामंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये विविध विषयांवर रेल्वेचे अधिकारी व प्रकल्पग्रस्तांशी चर्चा झाली. रेल्वेच्या अधिकाऱयांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय काम सुरु करणार नसल्याचे सांगितल्याने अखेर शनिवारी दुपारी 3.15 वा. हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामध्ये परचुरी गावचे सरपंच, कोंडय़े गावचे सरपंच व मोठय़ा प्रमाणात महिला समाविष्ट झाल्या होत्या.

Related posts: