|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कार अपघातात दोघे गंभीर जखमी

कार अपघातात दोघे गंभीर जखमी 

प्रतिनिधी/ निपाणी

कोगनोळी आरटीओ चेकपोस्टनजीक राष्ट्रीय महामार्गावर कार अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजता घडली. दीपक धारगळकर (वय 58) व तन्वी दीपक धारगळकर (वय 25 दोघेही रा. गोवा) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, गोव्याहून दीपक व त्यांचे कुटुंबिय कार क्र. (जीए 03 पी 0217) यातून मुंबई येथे एका विवाह समारंभास जात होते. दरम्यान मध्यरात्री 1 वाजता कोगनोळी आरटीओ चेकपोस्टनजीक आल्यानंतर अचानक कारचा पुढील टायर फुटल्याने दीपक यांचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कारची दुभाजकाला जाऊन जोराची धडक बसली. त्यानंतर कार पलटी झाली. यात दीपक, तन्वी यांना जोराचा मार बसला. तर अक्षय दीपक  धारगळकर (वय 20), उषा दीपक धारगळकर (वय 55) हे दोघेजण किरकोळ जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच पुंजलॉईडचे अधिकारी एम. आर. घाटगे, मल्लाप्पा रेवण्णावर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी त्वरित निपाणी ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी निपाणी ग्रामीणचे फौजदार निंगनगौडा पाटील व हवालदार कंठी यांनी भेट दिली. जखमींना त्वरित 108 रुग्णवाहिकेतून सिटी हॉस्पीटल कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.