|Saturday, October 20, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » असुर वेदान्त

असुर वेदान्त 

देवकीची समजूत काढण्यासाठी आणि आपल्या पाप कर्माचा बचाव करण्यासाठी कंस पुढे म्हणाला-हे ताई! मी जरी तुझ्या पुत्रांना मारले असले तरी तू त्यांच्यासाठी शोक करू नकोस; कारण सर्व प्राण्यांना पराधीनपणे कर्मांचे फळ भोगावेच लागते. आपले स्वरूप न जाणल्यामुळे जोपर्यंत जीव असे मानतो की-आपण मरणारा आहे किंवा मारणारा आहे, तोपर्यंत शरीराच्या जन्म मृत्यूचा अभिमान धरणारा हा
अज्ञानी जीव पीडा देणारा वा पीडा भोगणारा होतो. माझ्या या दुष्टतेला तुम्ही दोघांनी क्षमा करावी; कारण तुम्ही सज्जन असून दीनांचे रक्षण करणारे आहात. असे म्हणून कंसाने देवकी वसुदेवांचे पाय धरले. त्यावेळी त्याच्या डोळय़ांतून अश्रू वाहात होते.

यानंतर त्याने योगमायेच्या वचनावर विश्वास ठेवून स्वतःच्या सौजन्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून सोडून दिले. कंसाला पश्चात्ताप झालेला पाहून देवकीने त्याला क्षमा केली. तिचा राग मावळला. त्याचवेळी वसुदेव हसून त्याला म्हणाले – हे कंसा! तू म्हणतोस ते खरे आहे. अज्ञानामुळेच जीव, शरीर इत्यादींना मी असे समजतो. यामुळेच आपपर भाव निर्माण होतो. आणि अशी भेददृष्टी झाल्यानेच शोक, हर्ष, भय, द्वेष, लोभ, मोह आणि मदाने लोक आंधळे होतात. आणि सर्वांना प्रेरणा देणारे भगवंतच एका वस्तूने दुसऱया वस्तूचा परस्पर नाश करीत आहेत, याचे भान त्यांना राहात नाही.

अशा प्रकारे जेव्हा प्रसन्न होऊन निष्कपट भावाने वसुदेव आणि देवकी कंसाशी बोलले, तेव्हा त्यांची अनुमती घेऊन तो आपल्या महालाकडे निघून गेला.

कंसाच्या मुखातून हा जो वेदान्ताचा उपदेश देवकी वसुदेवाला केल्याचा प्रसंग आपण श्रीमद्भागवतात वाचतो, त्यावेळी आपल्याला आश्चर्य वाटते. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की रावण, हिरण्यकश्यपू, कंस हे सर्वजण वेद वेदान्त उत्तम प्रकारे जाणत होते. हिरण्यकश्यपूच्या कथेत असा प्रसंग आला आहे की त्याने हिरण्याक्षाच्या पत्नीला वेदान्ताचा सुंदर उपदेश केला की देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे. तू नश्वर देहासाठी रडते आहेस, परंतु सर्वांना शेवटी एका दिवशी मृत्यूकडे जायचेच आहे.

त्याचा उपदेश ऐकून श्रोत्यांचा शोक नष्ट झाला. पण प्रवचनकर्ता स्वतः मात्र विचारात पडला की माझाही देह एका दिवशी नष्ट होणार. मग हिरण्यकश्यपूने तपस्या करून अमरत्वाचा वर मागायचे ठरवले. तत्त्वज्ञानाची वचने आपल्याला मोहीत करतात. वाचताना किंवा ऐकताना वाटते की सर्व काही आपल्याला समजले. दुसऱयाला उपदेश करायला हे सगळे उपयोगालाही येते. कंस महाराजही आपल्यासारखेच ज्ञानी आहेत. देवकीला ज्ञानामृत पाजतात! पण आपल्याला तत्त्वज्ञानाची वचने केवळ पाठ म्हणून दाखवायची नाहीत, ती प्रत्यक्ष जीवनात उतरावयाची आहेत. दुसऱयांना उपदेश करण्यापूर्वी आपण स्वतःला तपासून पाहिले पाहिजे की आपण किती खोल पाण्यात आहोत. उपदेशाचे पहिले श्रोते आपण स्वतः आहोत. स्वतःवरच याचा परिणाम होत नसेल तर याला म्हणतात-असुर वेदान्त!

Related posts: