|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हँडलरचे पक्षांतर!

हँडलरचे पक्षांतर! 

एखादा विचार वारंवार सांगितला तर तो लोकांना पटायला लागतो. यालाच गोबेल्स नीती असेही म्हणतात. हिटलरच्या प्रचार प्रमुखाचे हे तंत्र सगळय़ा जगात प्रसिद्ध आहे. आजकालच्या सोशल वॉरमध्ये राजकीय पक्ष एकमेकाच्या विरोधात हे गोबेल्स तंत्र इतक्या सहजतेने वापरत आहेत की, त्याचा कोणाच्याही मनावर परिणाम व्हावा. पण, हा परिणाम जर त्या प्रचार यंत्रणेचाच भाग असणाऱया कोणावर झाला तर काय होईल, याची चुणूक रविवारी महाराष्ट्र भाजपच्या व्टिटर हँडलने दाखवून दिली. ‘भाजप फॉर ऑल’ नावाच्या या हँडलवरून असे म्हणण्यात आले की, राज्याच्या प्रशासनात दोन लाख कर्मचाऱयांची आवश्यकता असताना देवेंद्र फडणवीस सरकार 30 टक्के कर्मचारी कपात करायला निघाले आहे. हे मेक इन महाराष्ट्र आहे की फूल इन महाराष्ट्र आहे? मेक आणि फूल या शब्दांच्या आधी हॅशटॅग देऊन हे ट्विट पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, महाराष्ट्र काँग्रेस, संजय निरूपम, सचिन सावंत या सर्वांना टॅग करण्यत आले. हे अकौंट हँडल करणाऱया हँडलरने पक्षांतर केले की काय असे वाटावे अशीच ही घटना आहे. नेटकऱयांनी सकाळी सकाळी जेव्हा हे ट्वीट पाहिले असेल तेव्हा त्यांचा स्वतःवर विश्वास बसला नसेल. अलीकडच्या काळात लोक काँग्रेस सोडून भाजपमध्ये येत असताना ही उलटी गंगा कशी वाहायला लागली असा प्रश्न अनेकांना पडला असेल.  काँग्रेसच्या प्रचाराचा त्याच्यावर इतका प्रभाव पडला की काय, की ज्यामुळे त्याने भाजपच्या हँडलवरून मुख्यमंत्र्यांना धक्का द्यावा? गुजरातची निवडणूक जोरावर आहे. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष बनण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या विरोधात हे इलेक्शन नाही सिलेक्शन आहे अशी टीका करणाऱया कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भर प्रचारसभेतून त्याच्या वक्तव्याला उचलून धरत काँग्रेसवर टीका करत आहेत. मोठे मोठे नेते अशा ‘संधी’चे सोने करत असताना महाराष्ट्र भाजपच्या हँडलने अशी माती करावी, याला म्हणावे काय? शंका अनेक येत असल्या तरीही भाजपने त्याबद्दल अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. निमूटपणे  तासभराने हे ट्वीट हटवले गेले आहे. पण, तोपर्यंत महाराष्ट्र सरकारमधील तीस टक्पे कपातीच्या मुद्याला हवा मिळायची ती मिळालेलीच आहे. आता ही कपात येत्या काळात भाजपची डोकेदुखी बनल्याखेरीज राहणार नाही. कारण भाजपच्या फुलात लपलेल्या हँडलरूपी भुंग्याने आपल्याच पक्षाच्या मागे मोठीच भुण भुण लावून सोडली आहे. रोजगार निर्मिती हे भाजप सरकारचे मोठे उद्दीष्ट आहे. त्यासाठी मेक इन इंडियाचा छोटा भाऊ राज्य सरकारने जन्मास घातला, तो मेक इन महाराष्ट्र. या मेक इन महाराष्ट्रने अद्याप बाळसेही धरलेले नाही. मुळात देशातील नोकऱया कमी झाल्याची टीका जोरावर असताना महाराष्ट्रात 30 टक्के कर्मचारी कपात करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे असे पक्षाच्या अधिकृत अकौंटवरून जाहीर झाले आहे. हे खरे की खेटे याचा खुलासा सरकारला करावा लागणार आहे. महाराष्ट्र सरकारचे कपातीचे धोरण आहे हे तर निश्चित. पण, ते नोकरीच्या बाबतीत आहे किंवा नाही हे सरकारला अत्यंत स्पष्टपणे आणि पुरेशा आत्मविश्वासाने जाहीर करावे लागणार आहे. अर्थातच त्यासाठी कोणाही मंत्र्यावर लोक विश्वास ठेवतील असे नाही तर खुद्द मुख्यमंत्र्यांनाच यावर खुलासा करावा लागेल. म्हणजे पुन्हा ‘अध्यक्ष महोदय’अशा हॅशटॅगसह ट्रोल करणे आलेच. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून सत्तेवर आलेल्या भाजपच्या मागे लागलेल्या या सोशल उसाभरी हाताळताना पक्षाला अलीकडे मोठी कसरत करावी लागत आहे. आता या नव्या प्रकरणात गप्प बसून साधणार नाही हे तर निश्चितच. राज्यासमोर सर्वात मोठा पेच आहे तो आर्थिक प्रश्नाचा. कर्जमाफीच्या घोषणेनंतर त्याच्या जुळवाजुळवीत राज्याची दमछाक होते आहे. त्यासाठीचा विलंब आधीच लोकांच्या टीकेचे कारण बनलेले आहे. त्यामुळे सरळ तीस टक्के निधी कपातीची सूचना वित्त मंत्रालयाने पेलेली आहे. नोव्हेंबर महिन्यात आधीच्या सहामाहीचा आर्थिक आढावा घेऊन मागण्या सादर करताना प्रत्येक खात्याला 30 टक्के निधी कपातीचा विचार करूनच मागणी करावी लागत आहे. अनेक खात्यांचे कामकाज त्यामुळे ठप्प झालेले आहे. जिल्हा नियोजन मंडळांचीही गोची झालेली आहे. अशा स्थितीत आता ही 30 टक्के नेकर कपातीची बातमी पक्षाच्या हँडलवरून जाहीर झाली आहे. ती हटवली असली तरीही तिचे पडसाद बराच काळ उमटत राहणार आहेत. राज्याच्या विविध खात्यांमध्ये असणारी कर्मचाऱयांची कमतरता हा आधीच कर्मचारी संघटनांच्यासाठी दुखरी नस आहे. त्यावर भाजपने कपातीचा घाव घालण्यास सुरूवात केली आहे अशी भावना जर या वर्गाची झाली तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. राज्य सरकारने भरती केलेल्या विविध खात्यांमधील तात्पुरत्या कर्मचाऱयांना सरकारी सेवेत सामावून घ्या म्हणून आधीच मोठा दबाव आहे. सरकार पुढच्या वेळी बघू म्हणून वेळ मारून नेते आहे. अशावेळी पक्षाच्या हँडलरने केलेला खोडसाळपणा सहज घ्यावा का हा प्रश्नच आहे. करमणूक म्हणून याकडे पाहता येणार नाही आणि गांभिर्याने घ्यायचे तर ते काही सरकारचे नाही. सरकारी पक्षाचे अकौंट आहे. पक्षाची भावना काहीही असली तरी सरकारची भावना वेगळी असू शकते. आभासी जगातील भावनांच्या खेळात जन्माला आलेले हे  ट्वीट मात्र किती गोंधळ माजवेल हे आताच सांगता यायचे नाही. पण,  ट्विटरच्या पाखराची ही चुकीची टिवटिव नेटवर प्रभावी नसलेल्या काँगेसच्या चांगलीच पथ्यावर पडणार आहे. या विषयात अलीकडे काँग्रेसने गती घ्यायला सुरूवात केली तशी सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका असे अलीकडेच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना ओरडून सांगावे लागले आहे. पण, परक्यांच्या प्रचाराने व्यथित होणाऱया अमित शहांना ही स्वकियांची बेईमानी रूचणार नाही हे तर निश्चितच. त्याचे पडसाद नजीकच्या काळात उमटलेले दिसतील.

Related posts: