|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रलंबित मागण्या पूर्ण करा अन्यथा होडी वाहतूक बंद ठेवणार!

प्रलंबित मागण्या पूर्ण करा अन्यथा होडी वाहतूक बंद ठेवणार! 

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक असो.चा इशारा

वार्ताहर / मालवण:

अनेक वर्षे पाठपुरावा करूनही प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, बंदर राज्यमंत्री यांना निवेदने पाठविली आहेत. प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत होडी वाहतूक बंद ठेवून निषेध नोंदविणार असल्याचा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमचा वडिलोपार्जित, किल्ला प्रवासी वाहतूक व्यवसाय आहे. सध्या येणाऱया पर्यटकांचा ओघ पाहता, मालवण धक्का येथील गैरसोयींमुळे पर्यटकांच्या नाराजीला व रोषाला सामोरे जावे लागते. बंदर जेटी येथील गेली अनेक वर्षे गाळ काढण्यात आलेला नाही. बंदर जेटी येथे आमावास्या व पौर्णिमा या दरम्यानच्या काळात बंदर जेटीला प्रवासी बोट लावता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना किल्ला न पाहता माघारी जावे लागते. तसेच दोन ते तीन बोटींची सांगड करून प्रवाशांना न्यावे लागते. त्याची नाराजी पर्यटक हे होडी वाहतूक सेवेवर दाखवितात. मंजूर जेटीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सर्व्हे प्रमाणपत्रांची वैधता 1 वर्षावरून 5 वर्षे करावी, उतारू परवान्यांची वैधता 1 वर्षावरून पावसाळी हंगाम वगळता सर्व्हे प्रमाणपत्राच्या आधारे पाच वर्षे करावी,  थर्ड पार्टी इन्शुरन्स हे पाच लाखावरून किमान एक लाखापर्यंत करावे, आयव्ही अंतर्गत प्रवासी संख्या किमान 20 पेक्षा अधिक प्रवासी निर्धारित करावेत. प्रवाशांसाठी बांधण्यात आलेला वाहनतळ त्वरित सुरू करावा. वेंगुर्ले येथे असलेले जिल्हा प्रादेशिक बंदर अधिकारी कार्यालय हे जिल्हय़ाच्या मध्यवर्ती असलेल्या ओरोस येथे असावे, नवीन फायबर बोटींना मालवण धक्का ते सिंधुदुर्ग किल्ला मार्गावर परवानगी देऊ नये. सिंधुदुर्ग किल्ला येथील नवीन जेटीवर प्रवासी शेड नाही. तसेच बांधण्यात आलेल्या जेटीला सुरक्षित बोट लावता येत नाही. तेथील चॅनेल मोकळा करून मिळावा, ऑनलाईन सेवांमुळे सर्व व्यावसायिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही सेवा सुरळीत होईपर्यंत पूर्वीची नोंदणी असलेल्या नौकांना आयव्ही अंतर्गत नोंदणी ऑफ लाईन सेवा पुरविण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, वेंगुर्ले व मालवण बंदर अधिकारी यांनाही देण्यात आले आहे.

 

Related posts: