|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ओक्खीच्या तडाख्यातून 357 मच्छिमारांची सुटका

ओक्खीच्या तडाख्यातून 357 मच्छिमारांची सुटका 

वृत्तसंस्था/ चेन्नई

गेल्या आठवडाभरापासून दक्षिण भारतावर घोंगावत असलेले ओक्खी चक्रीवादळाचे संकट काहीप्रमाणात निवळले आहे. या वादळातून सुमारे 357 मच्छिमारांची नौदल व तटरक्षक दलाने सुटका केल्याची माहिती संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. यामध्ये तमीळनाडूचे 71 तर केरळमधील 248 जणांचा समावेश आहे. याशिवाय लक्षद्विप येथील 38 जणांची हवाई दलाच्या मदतीने सुटका केली आहे. या बचाव मोहिमेत नौदल, तटरक्षकदल आणि हवाई दलाने संयुक्त कामगिरी केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या वादळामुळे भरकटलेल्या 66 बोटी महाराष्ट्रामध्ये सिंधुदूर्गच्या किनारपट्टीवर आल्या आहेत. या बोटीमधील 952 जणांना तात्पुरता आसरा देण्यात आला असून ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. तर हे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याने मच्छिमारांसह किनारपट्टीवरील लोकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः सिंधुदूर्ग, रत्नागिरी भागातील नागरिक, मच्छिमारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सागरी महामंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱयांच्यावतीने करण्यात आले आहे.

ओक्खी वादळाचा तडाखा बसलेल्या केरळ आणि तमीळनाडूमधील भागाची पाहणी संरक्षण मंत्री सितारामन यांनी केली. रविवारी कन्याकुमारी येथे जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मदत कार्य वेगाने करण्याबाबत सूचनाही केल्या आहेत. सितारामन या सोमवारी तिरुअनंतपुरम येथे जाणार आहेत, असेही संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. या कालावधीमध्ये तटरक्षक दलाने तातडीने दोन जहाजे संरक्षण आणि बचाव कार्यासाठी नियुक्त केली होती. याशिवाय दोन एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टरही शोध मोहिमेसाठी लावण्यात आली आहे. तर केरळमध्ये सात जहाजांची तर लक्षद्वीप परिसरात एक जहाजाची नियुक्ती केली आहे. नौदलाची सहा जहाजे व दोन एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टरही तैनात केली आहेत, अशी माहिती ट्विट्द्वारे संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, ओक्खी वादळाचा रोख महाराष्ट्राच्या दिशेने वळला आहे. यातील जोर कमी झाला असला तरीही महाराष्ट्रातील मच्छिमार आणि समुद्राकाठच्या नागरिकांनी योग्य दक्षता घ्यावी. विशेषतः मुंबई तसेच सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्हय़ातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सागरी महामंडळाने केले आहे. तर या वादळामुळे भरकटलेल्या केरळ व तमीळनाडूतील 66 बोटी महाराष्ट्रातील सिंधूदुर्ग जिल्हय़ाच्या किनारपट्टीवर आल्या आहेत. त्यातील 952 मच्छिमारांना महाराष्ट्र सरकारच्यावतीने आसरा देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या सर्वांना सुरक्षा व अन्य बाबी देण्यात आल्या असून योग्यवेळी त्यांना परत पाठवले जाईल, असेही प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

Related posts: