|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विधवा महिलेच्या विहिरीसाठी अजितदादा, जयंतरावांचा पाठपुरावा

विधवा महिलेच्या विहिरीसाठी अजितदादा, जयंतरावांचा पाठपुरावा 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

‘आम्ही मागेल, त्या शेतकऱयास शेततळे, विहीर देवून राज्यातील शेतकऱयांना मोठा आधार देत आहे’ या राज्य शासनाच्या दाव्याचा फोलपणा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यवतमाळ ते नागपूर ‘हल्लाबोल दिंडी’त पुढे आला. यवतमाळ जिह्यातील कलंम येथील एक विधवा शेतकरी महिला गेल्या 3-4 वर्षापासून विहिर मिळण्यासाठी धडपडत असून तीची कोणी दखल घेतलेली नाही. या महिलेने दिंडीस सामोरे येत आपली ‘कर्म कहाणी’ ऐकविताच, माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार, माजी ग्रामविकास मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी लगेच यवतमाळच्या जिल्हाधिकाऱयांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून या महिलेस न्याय देण्याच्या सूचना केल्या…याप्रसंगी खा.सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेही प्रामुख्याने उपस्थित होते.

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱयास सरसकट कर्ज माफी मिळायला हवी, कापसासह शेतकऱयांच्या शेतीमालास हमीभाव मिळायला हवा, आदी विविध मागण्यांसाठी यवतमाळ या राज्यात सर्वाधिक शेतकऱयांनी आत्महत्या केलेल्या जिह्यातून राज्य शासनाच्या विरोधी ‘हल्लाबोल दिंडी’ सुरू केली आहे. या दिंडीचा मडकोणा येथे पहिला, तर कळंम येथे दुसरा मुक्काम झाला. आज तिसऱया दिवशी सकाळी दिंडीने मार्गक्रमण सुरू केले. दिंडी काहीसे 3-4 किलोमीटर पुढे आली असेल, तोच संगीता सुमंतराव काळे या पन्नाशी गाठलेली विधवा शेतकरी महिला दिंडीस सामोरे आल्या. त्यांनी आपल्या रस्त्या लगतच्या कापसाच्या शेताकडे हात करीत ‘हे माझे शेत आहे. सरकार कापसाला दर देत नाही. नवरा मरून 14 वर्षे झाली. तीन मुले आहेत. गेली 3-4 वर्षे विहीर मागते. मात्र कोण दखल घेत नाही. सांगा आम्ही जगायचे कसे? असा सवाल केला. यावेळी या महिलेने शेत पाहण्याची विनंती केली असता नेत्यांनी या महिलेच्या शेतात जावून तिची कर्म कहाणी ऐकली…या महिलेचा दिर घनश्याम याने आमच्या कापसाला चांगला दर द्या. आमचे जीणे अवघड झाले आहे, असे कळकळ व्यक्त केली.

   या महिलेने गेल्या वर्षी सोसायटीचे कर्ज काढून कसे तरी चालविले असू यावर्षी नवे कर्ज काढले आहे. कापसाचे पीक चांगले मिळत नाही, सरकार दर देत नाही, मग कर्ज कसे फेडायचे? असा सवाल केला. विहिरी साठी धडपडणारा मुलगा काल रडत घरी आल्याचेही सांगितले. यावेळी अजितदादांनी तातडीने यवतमाळच्या जिल्हाधिकाऱयांना फोन करून या महिलेस विहीर का दिली नसल्याचा जाब विचारला. यावर जिल्हाधिकरीसाहेब काहीतरी खुलासा करीत असताना आ.जयंतराव पाटील यांनी मागेल त्याला विहीर या योजनेतून या महिलेस लाभ द्यायला पाहिजे, अशी सूचना केली. जिल्हाधिकारीसाहेबांनी ती मान्य केली. आ.पवार यांनी फोन बंद झाल्यावर ‘मी जिल्हाधिकारीसाहेबांशी बोललो. आता तुम्हाला निश्चितपणे विहीर मिळेल,’ असे सांगितले. तर आ.पाटील यांनी तुमच्या कापसाला चांगला भाव मिळावा, अडचणीत आलेल्या शेतकऱयांचे कर्ज सरसकट माफ करावे, या मागण्या घेवूनच आम्ही ही दिंडी काढली आहे, असे सांगताच गेल्या कित्येक वर्षांनी न्याय मिळालेल्या या मायमाऊलीने कृतार्थपणे हात जोडत नेत्यांना व दिंडीस जणू आशीर्वादच दिला. 

Related posts: