|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यातील वीज विषयक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध

राज्यातील वीज विषयक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध 

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांचे आश्वासन 

प्रतिनिधी/ सांखळी

संपूर्ण गोव्यातच वीज विषयक अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सहकार्याने राज्यात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. भूमिगत वीज वाहिनीची कामे अनेक ठिकाणी सुरू असून ती वेळेत पूर्ण होण्याची दक्षता घेतली जात आहे. पाणी आणि वीज यापासून कोणीही वंचित राहणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे. सांखळी मतदारसंघातही विशेष लक्ष देऊन विज विषयक समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सांखळी येथे दिले.

सांखळीतील रवींद्र भवनात विज विषयक समस्या जाणून घेण्यासाठी सभापती प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मतदारसंघातील सरपंच, पंचसदस्य, नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. भाजप मंडळ पदाधिकारीही या बैठकीस उपस्थित होते. विविध गावातून आलेल्या सरपंच व पंचसदस्यांनी या बैठकीत आपापल्या भागातील समस्या मांडल्या. सुर्ल सरपंच भोडा खोडगिणकर, हरवळे सरपंच सागर मळीक, न्हावेली सरपंच मनाली गावस, आमोणा सरपंच संदेश नाईक, भाजप मंडळ अध्यक्ष प्रदीप गावडे, सांखळीचे नगरसेवक उपेंद्र कर्पे, दयानंद बोर्येकर, सुर्ल उपसरपंच विनिता घाडी, वेळगे सरपंच केदार घाडी. पंचसदस्य उन्नती सहस्त्रबुद्धे, सुभाष फोंडेकर, आनंद काणेकर, सुरेश नाईक यांच्यासह संबंधित सरकारी अधिकारी व अनेकजण या बैठकीस उपस्थित होते.

प्रत्येक मतदारसंघाला मिळणार 50 विद्युत खांब

गोव्यात अनेक विद्युत खांब जीर्ण झाल्याने मोडकळीस आले आहेत. ते बदलण्याची मागणी पंचायत मंडळ व नगरपालिकांकडून होत असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50 विद्युत खांब देण्याचा प्रस्ताव आहे. अत्यावश्यक ठिकाणचे विद्युत खांब प्रथम बदलण्यात येतील. राज्यात सर्वत्र विजदिवे बसविण्याचे काम सुरू असून अनेक ठिकाणी ते पूर्ण झाले आहे. सुमारे 20 हजार विजदिवे लवकरच प्रकाशमान होतील. नादुरूस्त असलेले विद्युत दिवे बदलण्याचे कामही सुरू आहे, असेही वीजमंत्री म्हणाले.

धोकादायक विजवाहिन्या बदलणार

सांखळी मतदारसंघात व शहरात अनेक ठिकाणी विजवाहिन्या धोकादायक स्थितीत आहेत. वारंवार त्या तुटून वीजपुरवठा खंडित होतो. अशा विजवाहिन्यांची संबंधित अधिकाऱयांकडून पाहणी होणार आहे. त्यानंतर या विजवाहिन्या तात्काळ बदलण्यात येतील. शाळा, बागायती व घरांवरून जाणाऱया जीर्ण विजवाहिन्या प्राधान्याने बदलण्यात येतील, असेही विजमंत्री म्हणाले.

पाळी, सूर्ल, वेळगे, आमोणा, न्हावेली, हरवळे, कुडणे आणि सांखळीमधील लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील विजसमस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. सुर्ल पंचायत क्षेत्रातील भामईकर वाडा येथे नवीन ट्रान्सफॉर्मरची गरज असल्याची मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या तीन वर्षापासून होत असलेली ही मागणी केवळ अपूर्ण प्रस्तावामुळे अपूर्ण राहिली असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करून प्रस्ताव पाठविण्याची सूचना बैठकीत सूर्ल पंचायतीला करण्यात आली.

सांखळीत वीज समस्या गंभीर नाही : सभापती

वीज विषयक समस्या मांडण्यासाठी खास बोलाविण्यात आलेल्या या बैठकीत सांखळी मतदारसंघाच्या प्रत्येक गावातील व शहरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी त्यांनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या. या समस्या फार गंभीर नसून त्या तात्काळ सोडविण्यात येतील. वीजमंत्री मडकईकर आपल्या खात्याला योग्य न्याय देत असून राज्यातील सर्व वीज विषयक समस्या लवकरच संपुष्टात येतील, असा विश्वास अध्यक्षस्थानावरून बोलताना सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

सांखळी पालिकेला आमंत्रण का
नाही : नगराध्यक्षांचा सवाल

मतदारसंघातील वीज विषय समस्या जाणून घेण्यासाठी सांखळी शहरात घेतलेल्या या बैठकीचे सांखळी पालिकेला आमंत्रण का देण्यात आले नाही? असा सवाल नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी केला आहे. सभापती असलेले या भागाचे आमदार डॉ. प्रमोद सावंत राजकीय आकसापोटी वारंवार सांखळी पालिकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. सांखळीतच झालेल्या या खास बैठकीपासून पालिकेला दूर ठेवण्यात आल्याने शहरातील वीज समस्या कोण जाणून घेणार? ही बैठक केवॐ भाजप समर्थकांसाठीच होती का? असा सवालही सगलानी यांनी वीजमंत्र्यांना केला आहे.

Related posts: