|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अभिषेकीबुवांचा शिष्य म्हणून घेण्यात धन्यता वाटते

अभिषेकीबुवांचा शिष्य म्हणून घेण्यात धन्यता वाटते 

प्रतिनिधी/ पणजी

राजकारण्यांना खुर्चीवर असेपर्यंत मान असतो त्या राज्यापुरते ओळखले जाते, परंतु कलाकारांचा आदर जगभरातील लोक करतात म्हणून मला मंत्री म्हणून ओळखण्यापेक्षा पं. जितेंद्र अभिषेकीबुवांचा शिष्य म्हणून घेण्यात धन्यता वाटते, असे सांगून जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी बाळकृष्ण आमोणकर यांच्यासारख्या ऋषीतुल्य तबलावादकाला नादश्री पुरस्कार दिल्याबद्दल ‘स्वरधारा’ संस्थेला दुवा दिला.

‘स्वरधारा’ पणजी या संस्थेतर्फे येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात शनिवारी आयोजित केलेल्या विशेष सोहळय़ात ज्येष्ठ तबलावादक पं. बाळकृष्ण आमोणकर यांना संस्थेचा आठवा ‘नादश्री’ पुरस्कार जलस्रोतमंत्री पालयेकर यांच्याहस्ते गौरविले त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून इन्स्टिटय़ूट ब्रागांझाचे सदस्यसचिव गोरख मांद्रेकर तसेच व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष निलम फातर्पेकर, सचिव रजनी ठाकुर व माजी अध्यक्ष ज्योती बांदेकर उपस्थित होत्या.

गोमंतकीयांना पं. आमोणकर यांचा अभिमान आहे. त्यांनी निरपेक्ष भावनेने संगीताची सेवा पेलेली आहे, असे सांगून पालयेकर यांनी तबला या वाद्याला अनन्य साधारण महत्व असल्याचे नमूद केले व स्वरधारा संस्थेला सहकार्य देण्याचे अभिवचन दिले.

गोरख मांद्रेकर म्हणाले, स्वरधारा संस्थेने एका योग्य कलाकाराला हा पुरस्कार दिला आहे. त्याबद्दल संस्था अभिनंदनास पात्र आहे. आमोणकर यांनी तब्बल साठ वर्षे संगीताची केलेली सेवा अपूर्व आहे. मोठमोठय़ा कीर्तनकारांना त्यांची तबलासाथ आवडायची यात त्यांचे मोठेपण आले.

समई प्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. निलम फातर्पेकर यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली व पं. आमोणकर हे ज्या परिस्थितीत जीवन कंठत आहेत त्यांना गोवा सरकारच्या कला संस्कृती खात्यातर्फे कलाकार कृतज्ञता निधी योजनेतून मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेतर्फेही त्यांच्यासाठी काही करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. रजनी ठाकुर यांनी आभार मानले. या सोहळय़ाला अनेक मान्यवर व रसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यात संस्थेचे हितचिंतक रवींद्र गायतोंडे, ला ग्रॉण्ड चे वागळे, नूतन खंवटे, उद्योजक गंगाराम मोरजकर, कवी प्रकाश तळवडेकर आदींचा समावेश होता.

Related posts: