|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शेती आणि विश्वसुंदरी

शेती आणि विश्वसुंदरी 

दरवषी अमुक सुंदरी तमुक सुंदरी वगैरेंची निवड होते. त्याचे निकष ठाऊक नाहीत. पण स्पर्धकांमधून अंतिम फेरीत निवडलेल्या सुंदरींची तोंडी परीक्षा घेतली जाते आणि त्यातून बहुधा सर्वाधिक हजरजवाबी मुलीच्या डोक्मयावर तो सुंदरीचा किरीट विराजमान होतो. या तोंडी परीक्षेत स्पर्धकसुंदरी जी उत्तरे देतात ती माझ्यासारख्या भाबडय़ा माणसाला गहिवरून टाकणारी असतात. म्हणजे त्यांना जगातल्या गरिबीविषयी, जातीय-धार्मिक कारणावरून होणाऱया अन्यायाविषयी तीव्र दुःख वाटत असते, त्या कोणाचे ना कोणाचे तरी अश्रू पुसण्यासाठी अतिशय उतावीळ झालेल्या असतात हे वाचून (किंवा टीव्हीवर पाहून) माझे हृदय भरून येते. पुढे तो किरीट प्राप्त झाल्यावर या सुंदरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात. रोजच्या संसारात लागणाऱया वस्तूंपैकी कोणत्या कंपनीच्या कोणत्या वस्तू आपण विकत घ्याव्यात हे देखील आपल्याला सांगतात.

नुकतीच मानुषी नावाची सुकन्या विश्वसुंदरी म्हणून निवडली गेली. पंतप्रधान, अमिताभ वगैरे मोठमोठय़ा लोकांनी तिचे अभिनंदन केले. हरियाणा सरकारने तर तिची ऍनिमियामुक्त राज्याची ब्रांड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली. ही नियुक्ती मला पामराला अंमळ खटकली ते सोडा. जगातल्या तमाम कथित आणि वास्तविक सुंदरी स्वतःला झिरो फिगर कृश ठेवण्यात धन्यता मानतात. त्यामुळे कोणत्याही सुंदरीने ऍनिमियामुक्त राज्याची ब्रांड ऍम्बेसिडर होणे उमगत नाही. ते असो.

आपण मत दिल्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकाला देखील आपण सल्ला देऊ धजत नाही की बाबा रे, तू निवडून आल्यावर अमुक काम कर किंवा करू नकोस. तेव्हा ज्या महिलांच्या विश्वसुंदरी, राष्ट्रसुंदरी, ग्रामसुंदरी होण्यात आपला यत्किंचितही वाटा नाही त्यांना सल्ला देणे चुकीचे आहे हे पटते. पण सल्ला दिल्यावाचून राहवत नाही. यातल्या एखाद्या सुंदरीने देशातल्या तमाम शेतमालाची ब्रांड ऍम्बेसिडर क्हावे आणि शेतमालाच्या भावांना स्थैर्य मिळवून द्यावे.

पीक कमी आले तर आयात करावे, जास्त आले तर निर्यातीला परवानगी द्यावी एवढे देखील काम वेळेवर न करणाऱया आणि शेतकऱयांना हमीभाव न देणाऱया राजकीय नेत्यांवर आपला भरवसा उरला नाही. कितीही पीक आले तरी विश्वसुंदरीने टीव्हीवर जनतेला आवाहन करावे, स्वतःचे ग्लॅमर वापरावे आणि कांदा, फळभाज्या, डाळी, कशाचेच भाव पडू देऊ नयेत.

असे झाले तर या कृशसुंदरीना आपण कृषीसुंदरीचा देखील किताब देऊ.

Related posts: