|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » औरंगजेबी राजवट काँगेसलाच लखलाभ

औरंगजेबी राजवट काँगेसलाच लखलाभ 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघातः मणिशंकर अय्यर यांचे वक्तव्य काँग्रेसवरच उलटविले

सुरत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी धरमपूर येथे राहुल गांधी यांना काँग्रेसचा अध्यक्ष करण्याच्या प्रक्रियेवर मोठा हल्ला चढविला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा त्यांनी उल्लेख केला. बादशहाचा पुत्र बादशहा होतो असे अय्यर यांनी म्हटले होते. या वक्तव्याचा वापर करत मोदींनी काँग्रेसला त्याची औरंगजेबी राजवट लखलाभ होवो असे उपहासात्मक वक्तव्य केले. काँग्रेस लोकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण करते. फूट पाडा आणि राज्य करा याची शिकवण काँग्रेसने इंग्रजांकडून घेतल्याचा शाब्दिक हल्ला मोदींनी चढविला.

राहुल जामिनावर

राहुल गांधी जामिनावर आहेत, तरीही त्यांना अध्यक्ष केले जात आहे. मणिशंकर अय्यर यांनी आज मुगलकाळात निवडणुका झाल्या होत्या का असे विचारले. जहांगीरच्या जागी शाहजहां आला. शाहजहांनंतर औरंगजेबच राज्य करणार असे अय्यर यांचे म्हणणे होते. काँग्रेस नेत्यांना त्यांचा बादशहा कोण होणार हे अगोदरच माहिती होते. यामुळेच काँग्रेस हा पक्ष नसून कळप आहे. ही औरंगजेबी राजवट त्यांनाच लखलाभ होवो. आमच्यासाठी मात्र देश मोठा आहे. 125 कोटी जनताच आमची पक्षशेष्ठी असल्याचे मोदी म्हणाले.

काँग्रेसकडून दुष्प्रचार

भाजप मुस्लिमविरोधी असल्याचा दुष्प्रचार केला जातोय. घराणेशाही असलेल्या काँग्रेसचे मुख्य धोरण भाजपच्या विरोधात जनतेत दुष्प्रचार करणे हाच आहे. परंतु गुजरातची जनता हुशार असून अफवांवर ती विश्वास ठेवत नाही. लुटारूंना गुजरात सहन करणार नाही असे उद्गार मोदींनी
काढले.

काँग्रेसचे सत्य मुस्लिमांना उमगलंय

अगोदर काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा मार्ग पकडला, आता या निवडणुकीत ते कोणत्या दिशेने जात आहेत हे सर्वजण पाहत आहेत. मुस्लिमांना काँग्रेसचे सत्य समजले आहे. इंदिरा गांधींनी गुजरातचे नेते मोरारजी देसाई यांना तुरुंगात टाकले होते. काँग्रेस कधीच गुजरातच्या कोणत्याही नेत्याला सहन करू शकत नाही. काँग्रेसने नेहमीच गुजरातला बाजूला टाकले. काँग्रेसला गुजरातची बदनामी करण्यापासून रोखावेच लागेल असे वक्तव्य मोदींनी
केले.

काँग्रेसकडून खोटी आश्वासने

गुजरातच्या जनतेला निवडणुकीच्या काळात काँग्रेसकडून मिळणारी खोटी आश्वासने आवडत नाहीत. काँग्रेस समर्थकांची चित्रफिती पाहिल्या, त्यात ते 9 आणि 14 डिसेंबर रोजी मतदान करा आणि आम्ही 5 वर्षांपर्यंत दादागिरी करू असे सांगताना दिसून येतात. हा त्यांच्या अपेक्षेतील गुजरात नाही. काँग्रेस निवडणुकीचा हंगाम सुरू होताच अनेक खोटी आश्वासने देण्यास प्रारंभ करतो. लोक याप्रकारचे लॉलिपॉप पसंत करत नाहीत असे म्हणत मोदींनी पाटीदारांना आरक्षण देण्याच्या कथित सूत्रावरून काँग्रेस तसेच हार्दिक पटेलला लक्ष्य
केले.

Related posts: