|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचाच अर्ज दाखल

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचाच अर्ज दाखल 

निवडीची घोषणा केवळ औपचारिकताच : भाजपकडून टिकास्त्र तर काँग्रेसने केले समर्थन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि युवराज अशी बिरुदावली मिळालेल्या राहुल गांधी यांनी सोमवारी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी केवळ त्यांचाच अर्ज आल्याने राहुल यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच बाकी आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या अर्जावर प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली आहे. काँग्रेसच्यावतीने पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. गेल्या 19 वर्षांपासून सोनिया गांधी अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. यापूर्वी राहुल यांनी दोनवेळा अध्यक्षपद स्वीकारण्यात असमर्थता व्यक्त केली  होती.

अर्ज दाखल करताना राहुल यांच्यासमवेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्येष्ठ नेते कमलनाथ, शीला दीक्षित आदी मान्यवर नेते उपस्थित होते. तथापि विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी या मात्र अनुपस्थित होत्या.

दरम्यान, भाजपने मात्र काँग्रेसवर जोरदार टीका केली असून घराणेशाहीचाही आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर बादशहाचा मुलगा बादशहा होतो, असे असेल तर औरंगजेबाचे राज्य त्यांनाच लखलाभ होऊ असे म्हटले आहे. तर राहुल सध्या देशावर ओझे बनलेत. मात्र अध्यक्ष झाल्यावर ते कमी होईल, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

तथापि काँग्रेसने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना राहुल हे पक्षात सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वांचे लाडके असल्याचे म्हटले आहे. सोनिया यांनी 19 वर्षे देशाची सेवा केली आहे. त्यानंतर आता राहुल तीच परंपरा सांभाळण्यासाठी सज्ज झाले आहेत, असे म्हटले आहे.

11 वाजता अर्ज दाखल

सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास काँग्रेस मुख्यालयामध्ये दाखल झालेल्या 47 वर्षीय राहुल गांधी यांनी 11 वाजता आपला अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल केला. त्यांनी एकूण पाच प्रती सादर केल्या आहेत. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद, वरिष्ठ नेते आनंद शर्मा, अंबिका सोनी तसेच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, नारायण सामी यांच्यासह अन्य मान्यवर नेते, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उपस्थित होते. काँग्रेस मुख्यालयामध्ये येण्यापूर्वी राहुल यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले.

राहुल काँग्रेसची महान परंपरा चालवतील

अर्ज दाखल केल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देताना मनमोहन सिंग म्हणाले, राहुल हे काँग्रेसजनांचे पहिल्या पसंतीचे नेते आहेत. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या माध्यमातून गेली 19 वर्षे देशाची सेवा केली आहे. आणि त्याच महान परंपरेवर राहुल गांधी मार्गक्रमण करणार आहेत.

दिग्गजांची प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी

राहुल यांच्या पहिल्या अर्जावर सोनिया गांधी, मोतीलाल व्होरा, अहमद पटेल, मोहसिना किडवाई, कमलनाथ, अशोक गेहलोत, मुकुल वासनिक, शीला दीक्षित, तरुण गोगाई आणि पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी हे प्रस्तावक आहेत. तर दुसऱया अर्जासाठी मनमोहन सिंग, ऑस्कर फर्नांडिस, पी. चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे, आनंद शर्मा, जोतिरादित्य शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली आहे.

2004 पासून आहे नावाची चर्चा

2004 रोजी पहिल्यांदा राहुल यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. मात्र तेव्हा त्यांनी नकार दिला होता. तर 2006 सालीही त्यांनी नकार कायम ठेवला होता. लोकांमध्ये राहून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर 2009 आणि 2014 साली त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याचीही मागणी केली होती. परंतु काँग्रेसजनांची ही मागणीही राहुल यांनी धुडकावली होती. सरकारमध्ये नाहीतर जनतेत राहून कायम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

आव्हानांचे डोंगर

दरम्यान, राहुल यांनी अध्यक्ष म्हणून अर्ज दाखल केला असला आणि त्यांची निवड निश्चित असली तरी त्यांच्यासमोर आव्हानांचे मोठे डोंगर असल्याचे राजकीय तज्ञ मानतात. गुजरात विधानसभेतील प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. येथे त्यांच्या सभेला प्रतिसाद मिळत असला तरी 22 वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसला सत्तेत आणण्याचेच मोठे शिवधनुष्य त्यांना उचलावे लागणार आहे. याशिवाय 2018 साली कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेशसारख्या मोठय़ा राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. तर लगेचच लोकसभेचेही बिगुल वाजू शकते. त्यामुळे राहुल यांच्यासमोर आगामी दोन वर्षांचा कालखंड परीक्षा घेणाराच ठरणार असल्याचे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.

Related posts: