|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तरुणांना राजकारणापेक्षा करीअरचा सल्ला देण्याची गरज : प्रतिकदादा पाटील

तरुणांना राजकारणापेक्षा करीअरचा सल्ला देण्याची गरज : प्रतिकदादा पाटील 

वार्ताहर/ आष्टा

सध्याचा युवक नोकरीच्या शोधात आहे. त्यामुळे युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आत्ताच्या काळात तरुणांना राजकारणापेक्षा करिअरचा सल्ला देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन युवक नेते प्रतीकदादा जयंतराव पाटील यांनी केले.

वाळवा तालुक्यातील कोरेगाव येथे युवक नेते संग्रामसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतीकदादा पाटील बोलत होते. यावेळी युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील, माजी अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बी.के.पाटील, सौ. मानसी पाटील, बहादूरवाडीचे विलासराव देसावळे, महेश घोरपडे, अजित बेनाडे, कणेगावचे किशोर पाटील, आष्टय़ाचे संग्राम जाधव, कुंडलवाडीचे असिफ पटेल, डॉ.प्रसन्नकुमार पुदाले, राजेंद्र पाटील यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी नूतन ग्रामपंचायत सदस्य डॉ. अमोल मगदूम, विक्रम पाटील, सौ.सुजाता पाटील,सौ. सोनाली मगदूम, सौ. मनिषा गावडे, सौ. साधना गावडे यांचा सत्कार सौ. मानसी पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी संग्रामसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना वह्यावाटपही करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रतीकदादा पाटील पुढे म्हणाले, कोरेगावचे पुर्नवसन राजारामबापूंनी केले. आ.जयंतराव पाटील यांनी इरिगेशनचा प्रोजेक्ट केला. तसेच गावोगावी इलेक्ट्रीसीटी पोहचविण्याचा प्रयत्न केला. संग्रामसिंह पाटील यांनी 65 महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. आजच्या काळात रोजगार मिळणे अडचणीचे बनले आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. समस्या सोडविण्यासाठी तरुणांनी संघटीत व्हावे.

युवकचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील म्हणाले, राजारामबापूंच्या कल्पकतेने कोरेगाव हे आदर्श गाव बनले आहे. स्मार्ट वर्क व हार्ड वर्क म्हणजेच जयंतराव पाटील होय. आ. जयंतराव पाटील हे सामान्य माणसाच्या विकासासाठी प्रचंड कष्ट घेत आहेत. त्यामुळेच आ. पाटील हे सामान्य माणसाचे हवेहवेसे नेतृत्व बनले आहे.

संजय पाटील म्हणाले, विजय पराभवापेक्षा खेळामध्ये सहभाग घेणे महत्वाचे आहे. ही लढाई एकच नाही की खेळही एकच नाही. कोरेगावला विधायक दिशा देण्याचे काम आ. जयंतराव पाटील यांनी केले आहे.

बी.के. पाटील म्हणाले, कोरेगावच्या जडणघडणीत राजारामबापूंचा मोठा सहभाग आहे. 1984 पासून गावात संपूर्ण दारुबंदी आहे. राज्यातील अतिशय प्रगतीशील हे गाव आहे. ग्रामस्वच्छता अभियानात गावाने राज्यात पहिला नंबर मिळविला आहे. तसेच निर्मलग्राम म्हणून डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याहस्ते गावाचा गौरव झाला आहे. आ. जयंतराव पाटील यांच्यामुळे या गावास वेगळी दिशा मिळाली आहे. विरोधक आमचा कधीच पराभव करु शकत नाहीत, आमच्याच माणसांनी आमचा पराभव केला आहे. अशी खंतही शेवटी त्यांनी व्यक्त केली. 

सत्काराला उत्तर देताना संग्रामबापू पाटील म्हणाले, राजकारण करीत असताना समाजकारणाचा जो वसा बी.के.सरांनी घालून दिला आहे. तो प्रामाणिकपणे पुढे चालवू. अपयशाने मी खचलेलो नाही, आणि तुम्हालाही खचू देणार नाही. अनियतीने आपणास अपयश  आले आहे. भविष्यात नियतीने यश मिळवू. विक्रम पाटील यांनी आभार मानले.

Related posts: