|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महाबळेश्वर बनले टपरीचे नंदनवन

महाबळेश्वर बनले टपरीचे नंदनवन 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन प्रसिध्द असलेल्या महाबळेश्वरला लोकप्रतिनिधीच्या मताच्या राजकारणामुळे व अधिकारीच्या दुर्लक्षामुळे महाबळेश्वरला एक नवी ओळख प्राप्त झाली आहे. महाबळेश्वर हे केवळ नावालाच नंदनवन म्हणुन राहीले असुन आता या पर्यटन स्थळाला टपरींचे नंदनवन म्हणुन ओळखले जावू लागले आहे. शहरात पहावे तिकडे टपऱया दिसत आहेत. या टपऱया पासुन शहराचा एकही रस्ता शिल्ल्क राहीला नाही या टपरींमुळे शहराचे स्वरूप बकाल बनले आहे. परंतु याची खंत सत्ताधारी मंडळींना ना प्रशासनाला आहे. 

   राज्यातील सर्वांत उंचावरील थंड हवेचे ठिकाण म्हणुन महाबळेश्वर देशात प्रसिध्द आहे. या पर्यटन स्थळाला लाभलेला निसर्गदत्त खजिना पाहण्यासाठी येथे देशविदेशातुन सुमारे 20 लाख पर्यटक सहलीसाठी येतात. शालेय सहीलींचे प्रमाणही येथे मोठे आहे. काही वर्षांपर्यंत येथील पर्यटकांची संख्या वाढत होती परंतु आता पर्यटकांची संख्या वाढताना दिसत नाही. उलट पर्यटकांची संख्या घटल्या मुळे येथील बाजारपेठेतील व्यवसायिकांच्या धंद्याला 20 ते 30 टक्के कात्री लागली आहे. या बाबत कोणी आत्मपरीक्षण करीत नाही पर्यटकांची संख्या घटण्यामागे सतत होणारी वाहतुकीची कोंडी सर्वच रस्त्यांवर टपरींनी केलेले अतिक्रमण बाजार पेठेत बसणारे परप्रांतिय पथारी वाले ही कारणे प्रमुख मानली जात आहेत. 

    महाबळेश्वर पालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत भाग घेतला असून या स्पर्धेत बक्षिस मिळाविण्याचा पालिकेने चंग बांधला आहे. त्यासाठी पालिकेचे लोकप्रतिनिधींसह पालिकेचे अधिकारी कर्मचारी हे स्वच्छता अभियानात गुंतले आहेत. या संधीचा फायदा घेवुन गेल्या दोन महीन्यात सुमारे 50 ते 60 टपऱया शहराच्या विविध रस्त्यांवर लागलेल्या दिसत आहेत. दोन दिवसात आदर्जी मार्गावर बारा टपऱया लागल्या असुन या रस्त्यावर आता वाहतुकीची कोंडी होणार आहे. बस स्थानकापासुन ते माखरीया हायस्कुल पर्यंत सर्वत्र टपऱयांच टपऱया दिसत आहेत.  या अतिक्रमणावर काही प्रमाणात पोलिसांचा वचक हवा परंतु पोलिस ठाण्यालाच टपरींचा विळखा पडल्याने पोलिस या टपरी पुढे कीती हतबल आहे याची जाणीव  येते. एका मंडळाने मस्जीद रोडवर तर टपरीमध्ये गणेश मुर्ती ठेवून त्यांची पुजा सुरू केली आहे. आता लवकरच या टपरींच्या बाजुलाही टपरी लागतील व हा रस्ताही टपरींने भरून जाईल. तसेच सुभाष चौकात तर हातगाडय़ांची मक्तेदारी झाली आहे. या हातगाडय़ांमुळे चौकातील कारंजाही पर्यटकांना दिसत नाही. त्या मुळे चौकाच्या सुशोभिकरणावर केलेला खर्च पाण्यात गेला आहे. शहरात असलेल्या एकाही टपरीला व हातगाडीला परवाना नाही तरीही पालिका या सर्व हातगाडींना व टपरी धारकांना संरक्षण देत आहे. टपरी व हातगाडी वाल्यांची कमाल म्हणजे गरज नसली तरी जागा दिसेल तेथे हातगाडी किंवा टपरी लावायची व नंतर काही दिवसांनी ती भाडय़ाने द्यायची अशा टपरीमध्ये परप्रांतियांची आयतिच सोय होत असल्याने येथे मोठया प्रमाणावर परप्रातियांचे धंदे वाढले आहेत. शहरात रस्त्यांवर पथारी मांडुन व शहरात फिरून धंदा करणाऱयामध्ये परप्रातियांचे प्रमाण मोठे असून गेली दोन वर्षात त्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. पालिकेचे अधिकारी व पोलिस प्रशासन डोळयाला पट्टी बांधुन गांधारीची भूमिका बजावत असल्याने आता जिल्हा प्रशासनाने यामध्ये गांभिर्याने लक्ष घालावे. अशी मागणी नागरिकांच्यातुन केली जात आहे. 

Related posts: