|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शोध मोहिमेला गती, तरीही ऑपरेटरचा शोध लागेना

शोध मोहिमेला गती, तरीही ऑपरेटरचा शोध लागेना 

प्रतिनिधी/ धारबांदोडा

 कोडली-दाभाळ येथील सेसा वेदांत खाणीवरील दुर्घटनेला तीन दिवस उलटले तरी अद्याप बेपत्ता मशिन ऑपरेटर मनोज नाईक (42, रा. खांडेपार) व रिपर मनिशनचा शोध घेणे शक्य झालेले नाही. पहिले दोन दिवस एकाच यंत्राद्वारे मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु होते. मात्र काल सोमवारपासून शोध मोहिमेला गती देण्यात आली असून एकापेक्षा जाप्त यंत्राचा वापर केला जात आहे. 

 शनिवारी सायं. 5.30 वा. सुमारास रिजेक्टेड मालाचा ढिगारा खचल्याने रिपर मनिशसह ऑपरेटर मनोज नाईक हा उत्खनन पिठामध्ये गाढला गेला होता. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या उत्खनन पिठाची खोली साधारण 40 मिटर एवढी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एवढय़ा खोलवर जोऊन शोध घेणे तेवढेच जिकिरीचे व कठिण बनले आहे. शोध मोहिमेदरम्यान रविवारच्या दिवशी मातीच्या ढिगाऱयाखाली एक जीपगाडी सापडली होती. घटनेच्यावेळी साईटवर थांबून मशिन ऑपरेटर मनोज याला मार्गदर्शन करणाऱया एका कंपनी अधिकाऱयाची ती जीपगाडी आहे. प्रसंगावधान राखून त्याने बाजूला धाव घेतल्याने हा अधिकारी सुदैवाने बचावला होता.

दबाव वाढल्याने शोध मोहिमेला गती

 मनोजचे नातेवाईक व सरकारी अधिकाऱयांकडून शोध मोहिमेला गती देण्यासाठी कंपनीवर दबाव वाढू लागला आहे. मनोजचे मित्र व नातेवाईक गेले दोन दिवस घटनास्थळावरच ठाण मांडून आहेत. मात्र शोध पथक व सरकारी यंत्रणा सोडल्यास कुणालाच आंतमध्ये सोडले जात नाही. वाढत्या दबावामुळे कंपनीने सोमवारपासून एकाहून अधिक यंत्रे शोधमोहिमेत गुंतविली आहेत. शिवाय ज्याठिकाणी मशिनसह मनोज बेपत्ता झाला होता, तोच केंद्रबिंदू धरुन शोध पथक पुढे सरकत आहे. एवढय़ा प्रयत्नानंतरही सायंकाळी उशिरापर्यंत विशेष प्रगती दिसत नव्हती. शोधमोहिम रात्री 12 वा. पर्यंत कार्यान्वित ठेवण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱयांनी दिल्याची माहिती मिळाली आहे.

 दरम्यान कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन कंपनी अधिकारी व सरकारी अधिकाऱयांशी चर्चा केली. प्रसार माध्यमांना आंतमध्ये जाण्यास बंदी घातल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या मनोज नाईक याच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

धोक्याची कल्पना असतानाही जोखिम

ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेथील जमिन खचत असल्याची कल्पना शनिवारच्या दिवशी पहिल्या पाळीवरील काही कामगारांनी कंपनीच्या पर्यवेक्षकाला दिली होती. काही ठिकाणी जमिनीला पडलेल्या भेगा लक्षात घेऊन कामगारांनी त्याठिकाणी काम न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पर्यवेक्षकाने त्याकडे दुर्लक्ष करीत दुसऱया पाळीवरील कामगारांना याठिकाणी कामात गुंतविल्याचा आरोप मनोज याच्या नातेवाईकांनी केला आहे. तेथील परिस्थिती लक्षात घेऊन व संभाव्य धोका ओळखून त्याठिकाणी काम करण्याचा धोका पत्करला नसता तर कदाचित मनोज हा या दुर्घटनेपासून वाचला असता, असे त्याच्या नातेवाईकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या हलगर्जीपणाबद्दल कंपनीचे अधिकारी व त्या पर्यवेक्षकाची चौकशी करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे.

जडण घडण खाण क्षेत्रातच

मनोज नाईक याचे वडिल कष्टी काले येथील चौगुले खाण कंपनीत कामाला होते. त्यामुळे मनोज व त्याच्या इतर तीन भावडांचा जन्म व शिक्षण काले भागातच झाले. नाल्लकोंड-खांडेपार येथे त्यांचे मूळ घर असल्याने अधूमधून ते घरी यायचे. वडिल कामावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांचे कुटुंब खांडेपार येथे कायमचे स्थायिक झाले. त्याच्या आईचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर वडिल सध्या आजारी आहेत. मनोज हा गेल्या काही वर्षांपासून सेसा वेदांत कंपनीत कामाला लागला होता. त्याच्यापश्चात पत्नी,दोन मुलगे, भाऊ व दोन विवाहित बहिणी आहेत.

Related posts: