|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सासष्टी किनारपट्टीत समुद्राला उधाण कायम

सासष्टी किनारपट्टीत समुद्राला उधाण कायम 

प्रतिनिधी/ मडगाव

ओखी वादळाचा गोव्याच्या किनारपट्टीला फटका बसलेला असून त्यात सासष्टीतील किनारपट्टीचाही समावेश आहे. रविवारी पाणी वाढल्यामुळे पर्यटक व पर्यटन व्यावसायिकांची स्थिती बिकट झाली होती. ही परिस्थिती सोमवारी कायम राहून सासष्टी तालुक्याच्या मोबोर, केळशी, बेताळभाटी, माजोर्डा, उतोर्डा या किनाऱयांवर समुदाचे पाणी वाढलेले दिसून आले.

सोमवारी केळशी येथे तटरक्षक दलाचे विमान परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी फिरत होते. समुद्राचे पाणी वाढल्यामुळे कोलवा, बाणावली, माजोर्डा, केळशी तसेच अन्य किनाऱयांवरील जलक्रीडा रविवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. आपली हानी झाली असल्याचा तसेच व्यवसाय गमवावा लागल्यामुळे बरेच नुकसान सहन करावे लागले असल्याचा दावा जलक्रीडाचालक आणि शॅकचालकांनी केला आहे. हा प्रकार पर्यटन खात्याच्या अधिकाऱयांच्या कानी घातला असून त्यांनी हानीचा अंदाज घेऊन भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती केळशी येथील एका शॅक व्यावसायिकाने दिली.

तसेच या नैसर्गिक संकटामुळे गोव्यात मौजमजा करण्यासाठी आलेल्या देशी व विदेशी पर्यटकांच्या बेतांवर पाणी पडले आहे. दिल्लीतील एक जोडपे बाणावलीतील हॉटेलांत उतरलेले असून वादळामुळे आपल्याला समुद्रस्नानाचा आनंद घेता आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही गोवा भेट स्मरणीय झाली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. केळशी किनाऱयावर अनेक देशी व विदेशी पर्यटक समुद्रस्नान घेण्याच्या तयारीत होते. पण पाण्याची पातळी वाढल्याने त्यांची निराशा झाली.

रविवारी रात्री पाण्याची पातळी भरपूर वाढल्याने तसेच मोठय़ा लाटा उठल्याने किनाऱयावरील शॅक्सची तसेच त्यातील साहित्याची हानी झाली आहे. परिस्थिती पाहून शॅकचालकांनी तातडीने साहित्य हटविले. मात्र शॅक्सची फेरउभारणी करण्यास बराच खर्च येणार असल्याचे एका शॅकचालकाने नजरेस आणून दिले.

Related posts: