|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दुसऱया दिवशीही पाणी पातळीत वाढ

दुसऱया दिवशीही पाणी पातळीत वाढ 

प्रतिनिधी/ मोरजी

पेडणे तालुक्यातील मोरजी, अश्वे, मांद्रे, हरमल व केरी किनारी भागात शनिवारी मध्यरात्री रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 10 पर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली होती. यामुळे शॅक रेस्टॉरंटचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असतानाच पुन्हा सोमवारी दुसऱया दिवशीही होडय़ा व इतर साहित्याचे तसेच शॅकमध्ये पाणी शिरल्याने आतील वस्तूंचे तसेच लाकडी सामानाचे नुकसान झाले. एवढी हानी होऊनही शासकीय आपत्कालीन यंत्रण किनारी भागात फिरकली नाही. मात्र स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांनी मोरजी तेंबवाडा व विठ्ठलदास वाडा किनारी भागात व्यावसायिकांची भेट घेऊन चर्चा केली. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही केरी येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

रविवार व सोमवार असे सलग दोन दिवस ओखी वादळाने किनारी भागात थैमान घातले. सलग दोन दिवस सुट्टी असल्याने देशी विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात गोव्यात दाखल झाले होते. परंतु ओखी वादळाने त्यांना समुद्र किनाऱयावर मौजमजा करता आली नाही. समुद्र किनाऱयावरील शॅक, रेस्टॉरंट बंद असल्याने तेथे जेवणही मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे समुद्र किनारी भाग सुना सुना दिसत होता. 

शनिवारी मध्यरात्रीनंतर समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती.  किनारी भागात असलेल्या शॅक व रेस्टॉरंटमध्ये पाणी शिरले होते. तसेच मासेमारी करणाऱया व्यावसायिकांच्या झोपडय़ांपर्यंत पाणी आल्याने त्यातील जाळी व लाकडी फर्निचर वाहून गेले होते. सोमवारी दुसऱया दिवशीही पाणी पातळीत वाढ होत होती. सरकारने या नुकसानग्रस्त व्यावसायिकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

आपत्कालीन यंत्रणेचे दुर्लक्ष

ऐवढी घटना घडूनही राज्याची आपत्कालीन यंत्रणा या किनारी भागात फिरकली नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांनी मोरजी तेंबवाडा व विठ्ठलदासवाडा किनारी भागात तसेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केरी येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

 

Related posts: