|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘ओखी’ची नुकसानी कोटीच्या घरात

‘ओखी’ची नुकसानी कोटीच्या घरात 

प्राथमिक अंदाजात उत्तरेत 60 तर दक्षिणेत 30 लाखांची हानी

प्रतिनिधी/ पणजी, मडगाव

ओखी वादळाचा गोव्यातील समुद्रकिनाऱयाला जोरदार तडाखा बसला असून त्यात किनाऱयांवरील शॅकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा अंदाजे आकडा एक कोटीच्या आसपास आहे. शनिवारी उत्तर गोव्यातील मोरजी, हरमल, केरी व अन्य किनाऱयांवरील मिळून 60 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज होता. रविवारी आणखी शॅकांचे नुकसान झाले आहे. दक्षिण गोव्यात सासष्टीच्या किनारपट्टीला सुमारे 30 लाख रूपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांनी घेतलेल्या आढाव्यातून पुढे आला आहे. वास्कोत सरंक्षक भिंत कोसल्याबरोबरच तरंगत्या जेटीलाही फटका बसला आहे.

 

ओखी वादळाच्या तडाख्यात सासष्टीच्या किनारपट्टीला सुमारे 30 लाख रूपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांनी घेतलेल्या आढाव्यातून पुढे आला आहे. काणकोण व मुरगांव तालुक्यांना या वादळाचा विशेष फटका बसला नसल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे. होंळात येथे 60 मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळली असून बायणा समुद्रकिनाऱयावर उभारण्यात आलेली जेटी जोरदार लाटामुळे वाहून केली आहे. दक्षिण गोव्यातील संपूर्ण किनारपट्टीला सतर्कतेचा आदेश देण्यात आहे. पर्यटकांनी व मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे कळविण्यात आले आहे.

सासष्टीतील वार्का समुद्र किनाऱयावरील पाच, केळशी येथील सहा शॅक नष्ट झाले तर सात मध्यम आकारातील शॅक नष्ट झाले आहेत. उतोर्डा येथील 2, बाणावली येथील 5, बेतालभाटी येथील 9 शॅक खराब झाल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले. करमणे, माजोर्डा, कोलवा व सेरनाभाटी समुद्रकिनाऱयावर काही हानी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती अंजली शेरावत यांनी दिली आहे.

सतर्कतेचा इशारा

ओकी वादळामुळे समुद्र खवळलेला असल्याने पर्यटक तसेच मच्छीमारांना समुदात जाण्यास मनाई करणारा आदेश जिल्हाधिकाऱयांनी जारी केला आहे. दरम्यान, शनिवारी रात्री 9 वाजल्यापासून समुद्राच्या पाण्यात वाढ होत गेली. काल रविवारी पहाटे तसेच नंतर सकाळी 9 ते 11 च्या दरम्यान, समुद्राच्या भयानक लाटा समुद्रकिनाऱयावर येऊन धडकू लागल्या. त्यामुळे अनेक शॅकमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार घडले.

शॅकमधील खुर्च्या, टेबले, पलंग तसेच इतर सामान जोरदार लाटांबरोबर वाहून गेल्याने शॅकमालकांना सुमारे 30 लाख रूपयांचा फटका बसल्याचा अंदाज आहे. सामान वाहून गेले असले तरी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागताच पर्यटकांनी समुद्र किनाऱयावरून काढता पाय घेतला. त्याच बरोबर दृष्टीचे जीवनरक्षक देखील त्वरित सतर्क झाले व समुद्र किनाऱयावरून सर्वांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आदेश देण्यात आला.

राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणाr

ओकी वादळामुळे शॅकमालकांना मोठय़ा प्रमाणात फटका बसल्याने सरकारने राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी शॅकमालकांनी केली असून सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील केली आहे. पर्यटन हंगाम आत्ताच कुठे सुरू होत असतानाच ही आपत्ती आल्याने, शॅकमालकांना जबरदस्त फटका बसला आहे.

आज मंगळवारी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होणार असून त्यात उत्तर व दक्षिण गोव्यातील परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. नुकसान भरपाई देणे शक्य आहे का? याचा देखील विचार होणार आहे. ही बैठक राज्याच्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

वादळाची भीती अजूनही कायम

रविवारी सुपरमून होता. त्यामुळे रात्री साडेदहाच्या सुमारास समुद्राला आलेल्या भरतीमुळे भल्या मोठय़ा लाटा किनाऱयावर येऊन धडकत होत्या. त्यामुळे किनाऱयावरील शॅक्स आणि मच्छीमारांच्या बोटींचे बरेच नुकसान झाले. दक्षिण गोव्यातील पाळोळे किनाऱयावर समुद्रात वाहून जात असलेल्या दोन आयरिश महिला पर्यटकांना स्थानिकांनी वाचविले आहे. समुद्रात उतरु नये, असा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने मच्छीमार समुद्रात गेले नाहीत, मात्र किनाऱयावर असलेल्या होडय़ा वाचविण्यासाठी त्यांना रात्र जागून काढावी लागली.

सरकार नुकसानीचा आढावा घेणार : पर्यटनमंत्री

समुद्रकिनारपट्टीच्या भागात झालेल्या नुकसानीचा सरकार आढावा घेणार, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले. त्यासाठी सक्षम अधिकारी नेमण्यात येईल. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी बोलणी केली असून गोव्याच्या शॅकचालकांच्या हितार्थ आवश्यक ती पूर्ण मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. गेल्या दोन दिवसात ओखी चक्रीवादळमुळे पाण्याची पातळी वाढून नुकसान सोसावे लागलेल्या शॅक चालकांविषयी सरकराला सहानुभूती वाटते. पर्यटन खाते, गोवा सरकार परिस्थितीची देखरेख करत असून पर्यटकांना समुद्रात जाण्यासापासून सावधागिरीचा इशारा देण्यात आलेला आहे. पर्यटन खात्याने दृष्टी जीवरक्षक सेवेला सज्ज राहण्यास सांगितले आहे.

Related posts: