|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नवा प्रकाश अंधकारमय का?

नवा प्रकाश अंधकारमय का? 

डॉ. बाबा आढाव यांचा सध्याच्या परिस्थितीवर सवाल

बेळगाव / प्रतिनिधी

महात्मा फुले, आंबेडकर, शाहूंचा इतिहास हा समाजाला पुढे नेणारा आहे. तो जाती-धर्मात न अडकता बहुजन समाजाची उन्नती करणारा असा इतिहास आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता मताच्या पेटीसाठी धार्मिक वादातच आपण अडकत चाललो आहोत. आजची पिढी विज्ञानामुळे प्रगत झाली. परंतु सांस्कृतिक संस्कार, दैनंदिन जगण्याच्या प्रश्नांचे काय, हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे नवा येणारा प्रकाश अंधकारमय आहे का? असा सवाल ज्ये÷ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पुरस्कार वितरण सोहळय़ात पुरस्कार स्वीकारल्यानंतर आढाव बोलत होते. गुरुवर्य शामराव देसाई यांच्या नावाने देण्यात येणारा पहिलाच पुरस्कार पुणे येथील ज्ये÷ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना देण्यात आला. कॉ. कृष्णा मेणसे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

 आढाव पुढे म्हणाले, सत्यशोधक चळवळ ही आता फक्त हिंदूंपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती मुस्लीम बांधवांनीही अंगीकारली आहे. त्यामुळेच तिहेरी तलाक विरोधात समाज एकत्र झाला. एकीकडे आपण जय जवान जय किसान असे म्हणतो. परंतु दुसरीकडे जवान सीमेवर मारला जातोय तर शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकऱयांच्या मूळ प्रश्नांकडे पहायला कोणालाही वेळ नाही. चैनीसाठी वापरल्या जाणाऱया घडय़ाळाला निश्चित किंमत आहे. परंतु शेतकऱयाच्या शेतीमालाला हमीभाव नसल्याबद्दल त्यांनी नाराजी क्यक्त केली.

मंजुश्री पवार म्हणाल्या, निर्भिड पत्रकारितेतून बहुजनांच्या समस्या मांडण्याचे काम शामराव देसाई यांनी आपल्या लेखणीतून केले. सत्यशोधक विचारांची पेरणा मार्गी लावली. सीमाप्रश्न असो वा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, त्यांनी आपल्या लेखणीतून घणाघाती आघात केले. परंतु त्यांचा हा इतिहास फक्त इतिहास राहू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

कॉ. कृष्णा मेणसे म्हणाले, सुधारणावादी विचारांमुळे शहरात 1936 पासून लक्ष्मीची जत्रा होऊ दिली नाही. परंतु ग्रामीण भागात सुरू असणाऱया जत्रांचे स्तोम पुन्हा एकदा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर प्राचार्य आनंद मेणसे, राष्ट्रवीरचे ऍड. राजाभाऊ पाटील, मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, अनंत देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मायाप्पा पाटील यांनी केले. प्रा. विक्रम पाटील यांनी आभार मानले.

चौकट करणे

सीमाप्रश्नासाठी नेहमी सोबत

सीमाभागातील मराठी भाषिक फक्त आपल्या भाषेसाठी नाही तर संस्कृती व समाज जीवनासाठी लढत आहेत. त्यामुळे सदैव त्यांच्या सोबत राहण्याचे आश्वासन डॉ. आढाव यांनी दिले. त्यांनी निपाणी येथील तंबाखू कामगारांचे आंदोलन व मुले सोडण्याविरोधात सौंदत्ती यल्लम्मा येथे करण्यात आलेल्या यशस्वी आंदोलनाची आठवण करून दिली.

Related posts: