|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळूण नगराध्यक्षांना सभागृहात कोंडले!

चिपळूण नगराध्यक्षांना सभागृहात कोंडले! 

प्रतिनिधी/ चिपळूण

मुख्याधिकारी सभेला उपस्थित राहिले नाहीत तर सभा चालवू देणार नाही, अशी भूमिका घेत विरोधी गटातील सेनेच्या नगरसेवकांसह अपक्ष नगरसेवकांनी सोमवारी आयोजित सभेत गदारोळ घातला. सभा संपल्यानंतर नगराध्यक्षांसह त्यांच्या सहकारी नगरसेविका सभागृहाबाहेर जात असताना सेनेच्या काही नगरसेवकांनी सभागृहाची कडी लावून त्यांना कोंडले. नगर परिषदेच्या इतिहासात अशापध्दतीची पहिल्यांदाच घटना घडली आहे. सभागृहातील गदारोळामुळे अवघ्या 10 मिनिटांत सभा आटोपती घेण्यात आली.

नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला सुरूवात होत असतानाच सेनेचे नगरसेवक मेहन मिरगल यांनी आक्षेप घेऊन सभेला मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील नसतील तर सभा रद्द करावी, अशी मागणी केली. यावर खेराडे यांनी मुख्याधिकारी जिल्हाधिकाऱयांच्या पत्राप्रमाणे लोकशाही दिनानिमित्तच्या कार्यक्रमासाठी गेले आहेत त्यांच्याकडे देवरूखचाही अधिभार आहे. तसेच सभेची विषयपत्रिका सात दिवस आधी जाहीर करण्यात आली होती असे स्पष्ट केले. मात्र मिरगल यांनी मुख्याधिकाऱयांना पाठीशी घालण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. त्यांना काम करायचे नसेल तर त्यांनी खुशाल जावे, कोटय़वधीची कामे मंजूर करताना त्यांचे मार्गदर्शन होत नसेल तर सभा रद्द करावी, अशी मागणी केली.

यावर खेराडे यांनी दोन महिन्यांनी सभा होतेय. याआधी मुख्याधिकारी नसताना अनेक सभा झाल्या आहेत. तुमचा विषयांना विरोध असेल किंवा उपसूचना असेल तर ते नोंदवा असे स्पष्ट केले. मात्र विरोधी गटनेते शशिकांत मोदींसह त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी जागा सोडून नगराध्यक्षांसमोर उभे राहून सुमारे 4 कोटीची कामे मंजुरीसाठी ठेवली जातात आणि मुख्याधिकारी नसतील तर सभा चालवू देणार नाही, असे सांगून सभेतच गोंधळ घातला. तसेच उपनराध्यक्ष निशिकांत भोजने, अपक्ष नगरसेवक राजेश केळसकर यांनी सेनेच्या सुरात सूर मिसळत सभा रद्द करण्याची मागणी केली. यावर खेराडे म्हणाल्या, सेनेच्या नगरसेवकांना आपण सर्व शिस्तभंग करताय. जाणिवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने हे केले जात असून ते खपवून घेतले जाणार नाही. तसेच चर्चा करायची नसेल तर ठराव मांडला जाईल असे स्पष्ट केले. मात्र यानंतरही गेंधळ सुरूच राहिल्याने अखेर नगराध्यक्षांच्या सूचनेप्रमाणे नगरसेवक आशिष खातू यांनी इतिवृत्त मंजुरीचा ठराव मांडला.

दहा मिनिटांतच सभा आटोपली!

यावेळी सेनेच्या सर्व नगरसेवकांनी खातू यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी नगरसेविका वर्षा जागुष्टे यांनी अनुमोदन देताच राष्ट्रगीताने अवघ्या दहा मिनिटांत सभा संपवण्यात आली. राष्ट्रगीत संपताच सेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात पुन्हा गोंधळ घातला आणि आम्ही काहीही झाले तरी सभागृह सोडणार नाही अशी भूमिका घेतली.

सभागृहाचा दरवाजा केला बंद

राष्ट्रगीत होताच सत्ताधारी गटातील काही नगरसेवक व कर्मचारी सभागृहाबाहेर निघून गेले. मात्र नगरध्यक्षा खेराडे, नगरसेविका जागुष्टे, रसिका देवळेकर व सफा गोटे या सभागृहातील नगराध्यक्षांच्या कक्षात थांबल्या होत्या. अशातच सभा संपल्यानंतर सेनेचे नगरसेवक उमेश सकपाळ सभागृहात आले आणि त्यांनी आणखी आक्रमक पवित्रा घेत कोणालाही सभागृहाबाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत नगरसेवक मनोज शिंदे यांना दरवाजाची कडी लावण्यास सांगितले. अशातच नगराध्यक्षा व त्यांच्या सहकारी नगरसेविका सभागृहाबाहेर येत असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही खेराडे यांनी स्वत:च कडी काढली व त्या बाहेर आल्या.

सेना नगरसेवकांचा कर्मचाऱयांना घेराव

सभा संपल्यानंतरही सेनेच्या नगरसेवकांचा उशिरापर्यंत गोंधळ सुरूच होता. यानंतर प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांना बोलावून घेत प्रोसिडिंग वहीची मागणी करून आपले म्हणणे लिहून घेण्याची सूचना केली. मात्र मोरे यांनी सभा संपली असल्याने आता त्यामध्ये काहीही लिहिता येत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सत्ताधारी गटाच्या मनमारी कारभाराचा निषेध करत सेनेच्या नगरसेवकांनीही सभागृह सोडले.

सेनेच्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करणार : खेराडे

सेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात जे काही केले ते चिपळूणच्या दृष्टीने काळिमा फासणारे आहे. सभा संपल्यानंतर सभागृहाची कडी लावण्याचा प्रकार म्हणजे महिला नगरसेविकांचा विनयभंग केल्यासारखाच प्रकार आहे. या विषयाचा भाजपसह राष्ट्रवादी व काँग्रेसतर्फे धिक्कार केला जात आहे. याविषयी सेनेच्या नगरसेवकांविरूध्द तक्रार केली जाणार आहे. तसेच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे नगराध्यक्षा खेराडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यावेळी सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

भाजपचा हाच पारदर्शक कारभार आहे काय?- मोदी

नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच नगरसेवकांचे म्हणणे ऐकून न घेता सभा सत्ताधारी गटाने गुंडाळली. केवळ मुख्याधिकाऱयांना वाचवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. या सभेत मुख्याधिकाऱयांच्या विरोधात ठराव, बाजारपुलाच्या कामातील 1 कोटीचा घोटाळा व अग्निशमन बंबाच्या ठरावातील बदल हे विषय इतिवृत्तात चर्चेला येणार होते. मात्र जाणीवपूर्वक सभा आटोपती घेण्यात आली. त्यामुळे भाजपचा हाच पारदर्शक कारभार आहे का? असा सवाल विरोधी गटनेते मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Related posts: