|Thursday, July 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » स्त्रीकर्तृत्व फुलणे हे देशाच्याच फायद्याचे

स्त्रीकर्तृत्व फुलणे हे देशाच्याच फायद्याचे 

ट्रम्पकन्या इव्हान्काची भारतभेट अलीकडेच गाजली, गाजवली गेली. तिचं आतिथ्यही उत्तमप्रकारे झालं. अमेरिकन अध्यक्षांच्या सल्लागार असलेल्या इव्हान्काचं हैदराबादेत झालेल्या, ग्लोबल आंत्रप्रिन्युरशिप समिट (जीईएस) 2017 या व्यवसायविषयक परिषदेत जोरात भाषण झालं आणि त्यात तिने महिला सक्षमीकरण, भारतीय महिलांना उद्योगजगतात अधिक वाव मिळण्याची गरज इ. विषयांवर आपली बहुमूल्य मतं व्यक्त केली. वडीलच अमेरिकेचे अध्यक्ष असल्यामुळे आपण इथवर पोहोचू शकलो, हे सांगायला मात्र त्या विसरल्या…तसंच, जगभरात स्त्रियांची संख्या निम्मी असल्याने, त्यांच्या प्रश्नांकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे, असं इव्हान्काने आग्रहाने सांगितलं. तंत्रज्ञानामुळे महिला उद्योजकांना प्रगतीची संधी मिळू शकते, यावरही तिने यावेळी बोलताना भर दिला.

ज्या स्त्रिया आपलं व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवन चांगल्याप्रकारे हाताळू शकतात, त्यांचं त्यांनी कौतुक केलं. मात्र सतत प्रगतीपथावर राहण्यासाठी स्त्रियांनी स्वतःमध्ये मूलगामी असा बदल करणं आवश्यक आहे, असं मतही मांडलं… जीईएस-2017 मध्ये इव्हान्काने मीडियावर बरीच छाप पाडली असल्याचं वृत्त आहे. विदेशी वृत्तपत्रांनीही इव्हान्काच्या भाषणाची व तिच्या झालेल्या जोरदार स्वागताची दखल घेतलेली दिसली. तिच्या या भाषणाचा फायदा भारतीय उद्योजक महिलांना होवो, अगर न होवो तिची स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याच्या दृष्टीने मात्र तो नक्कीच झाला आहे. हैदराबादेत झालेली ही जागतिक व्यवसायविषयक वार्षिक परिषद प्रथमच भारतात भरवली गेली. इव्हान्का ट्रम्पभोवती ग्लॅमरचं वलय उभारलं गेलं असलं, तरी यावेळी जगभरातील इतरही अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. त्यात ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या बॅरिस्टर पत्नी तसंच समाजहितैषी व दानशूर म्हणून ख्याती असलेल्या चेरी ब्लेअर, डेल या विख्यात कंपनीच्या सीसीओ कॅरेन क्विंटोज आणि आयसीआयसीआय बँकेच्या एमडी व सीईओ चंदा कोचर अशा अनेकांचा त्यात समावेश होता. जगभरातील उद्योजकतेला चालना मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा खल या परिषदेत झाला आणि अर्थातच महिला उद्योजकांना चालना मिळण्याकरिता करावयाच्या प्रयत्नांची चर्चाही झाली. कामगारांचा विकास व त्यांना दिलं जाणारं कौशल्यविषयक प्रशिक्षण या विषयावरील चर्चा जोरदार झाली आणि उद्योजकता व महिलांना पार करावे लागणारे अडथळे अशा अनेक मुद्यांचा ऊहापोह यावेळी झाला.  चेरी ब्लेअर यांनी तर हसतखेळत जाहीरच करून टाकलं की, ‘या जगात काही करायचंच झालं, तर पुरुषांच्या संदर्भातच आपण काही करायला हवं…’ तिथे उपस्थित असलेले माहिती तंत्रज्ञान मंत्री केटी रामा राव यांच्याकडे वळून त्यांनी टिप्पणी केली की, ‘तुमचाही समावेश होतो बरं का यात…पुरुषांनी कामातला आपला वाटा उचलला पाहिजे, हे त्यांनी आता तरी समजून घ्यायला हवंय..’ आपल्या मांडणीसाठी त्यांनी जगभरातील वेगवेगळय़ा सर्वेक्षणांचा आधार घेऊन सांगितलं की, स्त्रिया आपल्या मिळकतीचा 90 टक्के वाटा आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी खर्च करतात. तर पुरुष मात्र यावर फक्त 30-40 टक्केच खर्च करतात. चंदा कोचर यांनी महिला उद्योजकतेकरिता शिक्षण, सक्षमीकरण आणि उत्तेजन यावर भर देण्याची गरज प्रतिपादन केली. डेलच्या कॅरेन यांनी स्त्री-पुरुषांचं प्रमाण कार्यक्षेत्रात वैविध्य राखतं व ते टिकवण्यासाठी त्यांची कंपनी प्रयत्नशील कशी असते, याबद्दल सांगितलं.

एकूणच महिला व उद्योजकता या भोवतीच्या प्रश्नांची चर्चा या परिषदेत झाली. भारतासारख्या देशात महिला उद्योगांमध्ये आघाडीवर असल्या, तरी दुसरीकडे साधी नोकरी करायची तरी स्त्रीला अनेक दिव्यं पार करावी लागतात, हे आपण नेहमीच पाहतो, विशेषतः लग्न व त्यानंतर मुलंबाळं झाल्यावर…संसार वाढल्यावर स्त्री बरेचदा काम वा व्यवसाय सोडून देण्याचा निर्णय घेते. पण तिने जर जिद्दीने तोंड दिलं, तर ती नक्कीच यशस्वी होऊ शकते.

आर्थिक सहभाग व संधी आणि राजकीय सक्षमता या दोन निकषांबाबतही स्त्री-पुरुषांमधल्या फरकाची दरी रुंदावली आहे. आर्थिक सहभागाचा विचार केला, तर वेतनाबाबत स्त्री व पुरुष यांच्यात असणारी तफावत वाढली आहे. तसंच राजकीय आघाडीवरही स्त्रिया मागे ढकलल्या गेल्या आहेत. विधिमंडळ व संसद सदस्य, तसंच वरि÷ अधिकारी व व्यवस्थापक याबाबतचं स्त्री-पुरुष प्रमाण हेही कमी झालं आहे. याचा अर्थ, राजकीय निर्णयक्षमतेपासून जास्त स्त्रिया वंचित रहिल्या आहेत. या अहवालात मंत्रीपदं, विधिमंडळ व संसद सदस्य किंवा पंतप्रधान वा राष्ट्रपती यासारख्या पदांचा गेल्या 50 वर्षांचा आढावाही घेण्यात आला आहे. एकूणच दक्षिण आशियाई देशांमध्येच स्त्री व पुरुष यांच्यातील बऱयाच आघाडय़ांवरील भेद ठळक झाला आहे. स्त्रीपुरुष असमानतेच्या संदर्भात भारत दक्षिण आशियातील पहिल्या चार देशांमध्ये आहे. प्राथमिक शिक्षणाबाबत मुलगा व मुलगी यातला फरक फारसा राहिलेला नाही. मात्र आरोग्याच्या संदर्भात मुलींची अधिक हेळसांड होते.

अनेकदा अशा तऱहेच्या आकडेवारीला गंभीरपणे घेतलं जात नाही. त्यांचा व्यवसाय व विकास यांच्याशी काय संबंध, असा प्रश्न विचारला जातो. मात्र या गोष्टींचा एकूण प्रगतीशी नक्कीच संबंध आहे. स्त्री-पुरुष समानतेचं सूत्र पाळताना, ते व्यवसाय वा उद्योगाच्या प्रगतीला खीळ घालणारं ठरू शकेल असं ज्यांना वाटतं, त्यांनीही हे समजून घ्यायला हवं. कारण स्त्रिया जर व्यवसाय, उद्योग, राजकारण, मुत्सद्देगिरी अशा क्षेत्रांपासून दूरच राहिल्या, तर त्यांच्या अंगचे गुण व कौशल्ये ही वाया जाणार आहेत. त्यांच्या कल्पनाशक्तीचा, दृष्टिकोनाचा वापरच कधी होणार नाही. स्त्रियांना बाजूला ठेवण्याची आर्थिक किंमतही मोजावी लागते, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. स्त्रीपुरुषांमधला भेद कमी झाला, तर त्यामुळे जीडीपीचा दर वाढू शकतो, हे ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’ या संस्थेने आपल्या संशोधनातून सिद्ध केलं आहे.

 नुकतंच भारताच्या मानुषी छिल्लरची मिस वर्ल्ड म्हणून निवड झाली. हरियाणासारख्या मुलींकडे प्रतिगामी दृष्टीने पाहणाऱया राज्याने मानुषी छिल्लरचं भरभरून कौतुक केलं. तिथल्या सरकारने तिचा गौरव केला. ऍनिमियामुक्त हरियाणासाठीची ब्रँड अँबेसेडर म्हणून तिची नेमणूक केल्याची घोषण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली. चांगली गोष्ट आहे. पण स्त्रिया केवळ ग्लॅमरच्याच नव्हे, तर इतरही क्षेत्रांमध्ये पुढे जाऊ शकतात आणि देशाची मान व जीडीपी उंचावू शकतात, हे लक्षात घेणं महत्त्वाचं ठरेल.

Related posts: