|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ओखीची दहशत

ओखीची दहशत 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या आणि गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकलेल्या ओखी चक्रीवादळाने देशात विशेषत: किनारपट्टीच्या भागात दहशत पसरवून आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले आहे. गोवा, महाराष्ट्रातही ओखीचा प्रभाव जाणवला असून, वादळी तडाख्याने काही भागात मोठे नुकसान झाल्याचे पहायला मिळते. या चक्रीवादळाने तब्बल 25 जणांचा बळी घेतला आहे. बुधवारपर्यंत हे वादळ शमण्याचा अंदाज असला, तरी ओखीच्या दणक्याने देशाच्या अर्ध्याअधिक किनारपट्टीला धक्का दिला आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. आजवर असंख्य वादळे देशाने अनुभवली आहेत. लैलापासून नैनापर्यंत आणि फायलीनपासून रिटापर्यंत अनेकविध वादळांचा सातत्याने आपण सामना केला आहे. साधारणपणे 1953 पासून या वादळांचे आगळय़ावेगळय़ा पद्धतीने नामकरण करण्याची प्रथा अमेरिकन हवामान खात्यामार्फत सुरू झाली. अर्थात या वादळाची विध्वंसकता त्याला नाव देताना लक्षात घेतली जाते. भारतात 2004 साली ही परंपरा सुरू झाली. ‘ओखी’ हा बंगाली भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ डोळा असा आहे. बंगालच्या उपासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या चक्रीवादळाची निर्मिती झाली. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील वादळांना उष्णकटिबंधीय वादळ म्हटले जाते. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार, थायलंडकडून नावे ठरविली जातात. वादळे आणि दहशत वा विध्वंस हे समीकरणच. जनजीवन विस्कळित होण्याबरोबरच त्यातून जीवित हानीचाही धोका संभवतो. ओखीही अशाच जीवघेण्या वादळापैकी एक म्हणावे लागेल. ताशी 90 ते 124 किमी वेगाने वाहणाऱया वादळांमुळे घर, पिके, झाडामाडांचे काहीप्रमाणात नुकसान होते. त्यावरील वादळाने जाणवण्याइतपत हानी होते. 165 ते 224 किमी वेगाच्या वादळाने छपरे उडून जाण्याबरोबरच वीजपुरवठय़ाला धोका निर्माण होतो. 225 ते 279 किमी वेगाच्या चक्रीवादळामुळे जबर नुकसान होते, तर यापेक्षा अधिक तीव्रतेची वादळे ही जीवितहानी, मालमत्तेच्या हानीसह मोठय़ा प्रमाणावरील नुकसानीस कारणीभूत ठरतात. हे पाहता ओखी मध्यम तीव्रतेचे म्हणता येईल. साधारणपणे ताशी 100 ते 150 हा त्याचा सरासरी वेग. तरी या वेगाने मोठा हाहाकार घडवला, असे म्हणता येईल. या वादळाने लक्षद्वीप, तामिळनाडू व केरळला आपला रुद्रावतार दाखवून देतानाच अनेकांचे बळीही घेतले आहेत. दक्षिणेतील रस्ते, झाडेमाडे भुईसपाट होण्याबरोबरच वीजपुरवठय़ालाही या तुफानाने धक्का दिला. मच्छीमार बेपत्ता होण्यापासून ते संपर्क सेवा तुटण्यापर्यंत साऱया गोष्टी या वादळाची तीव्रता अन् निसर्गाच्या रौद्रापुढची आपली हतबलताच दाखवून देतात. अद्यापही केरळात सुमारे 100 मच्छीमार बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरूच राहणार असल्याची ग्वाही संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. नौदलाची जहाजे, हेलिकॉप्टर, तटरक्षक दल, हवाई दलाची विमाने यांच्याकडून युद्धपातळीवर यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. किंबहुना, मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत. खरेतर दक्षिणेतील सांप्रत तुफानाबाबत वेळीच अधिक सजगता बाळगली असती, तर इतकी हानी होण्याचे काही कारण नव्हते. मात्र, तहान लागल्याशिवाय खोदायचे नाही, हा आपल्या येथील प्रकृतीधर्म असल्याने अपेक्षित उपाय योजले गेले नाहीत. दक्षिणेतील धडा घेऊन गोवा, कोकणसह राज्यातील प्रशासन काहीसे सावध झाले असेलही. किंबहुना, त्यांनी अधिक सावधानता बाळगण्याची आवश्यकता होती. तसे झाले असते, तर येथील हानी टाळण्यात आणखी यश आले असते. केवळ मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला म्हणजे आपले कर्तव्य संपले, हा दृष्टीकोन आता बदलणे गरजेचे आहे. त्यापलीकडे जावून काम करणे आवश्यक ठरते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपत्कालीन यंत्रणा सशक्त व्हायला पाहिजेत. या यंत्रणेकडून तुफानाची चाहूल असताना व तुफानानंतर अशा दोन्ही प्रसंगी ठोस उपाययोजना झाल्या, तर बऱयाच गोष्टी सुकर होऊ शकतात. या आघाडीवर वेळीच पावले उचलली गेली, तर होडय़ांना जलसमाधी मिळण्यापासून ते मच्छिमारांच्या जाळय़ा उद्ध्वस्त होण्यापर्यंत अनेक संकटे नक्कीच टळतील. या वादळाने अरबी समुद्र खवळल्याने मुंबईवरही त्याचे काळे सावट होते. मात्र, हे वादळ गुजरातकडे सरकल्याने मुंबईवरील धोक्याचे मळभ अखेर दूर झाले आहे. समुद्रकाठावरील या शहरावर या चक्रीवादळाचा नेमका काय परिणाम होणार, याची एकूणच धास्ती साऱयांना होती. मात्र, ओखीने दिशा बदलल्याने मुंबईची या संकटातून मुक्तता झाली आहे. तिकडे गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचे वादळ घोंघावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, हार्दिक पटेल यांच्या वादळी सभा, रॅलींनी या राज्याचे रण तापले आहे. अशा सगळय़ा वातावरणात या राज्यावर ओखीची छाया पडणे म्हणजे वादळात वादळ आल्यासारखे. गुजरातमध्येही हायअलर्ट जारी करण्यात आला असून, या राज्याकडूनही विशेष दक्षता घेतली जात आहे. कदाचित बुधवारपर्यंत ओखीचा वेग मंदावून ते गुजरात किनारपट्टीतून बाहेर पडेल, अशी शक्यता आहे. ओखीमुळे मागच्या दोन दिवसात कोकण-गोव्यासह, मध्य महाराष्ट्र व राज्याच्या अनेक भागात पावसाची नोंद झाली. ऐन हिवाळय़ात झालेल्या पावसामुळे वातावरण बदलल्याचे दिसत आहे. थंडीचा मोसम सुरू झाला असला, तरी अद्याप म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. अशातच अवकाळी पावसामुळे थंडीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार का, हा प्रश्न आहे. तिकडे दिल्लीसारख्या शहराचा श्वास प्रदूषणाने गुदमरतो आहे. त्यामुळे हवामान बदल हा कळीचा मुद्दा बनतो आहे. भविष्यातही हवामान, निसर्ग, त्याच्या तऱहा बदलत राहतील. वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, प्रदूषण या साऱयाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम निसर्गचक्रावर होत राहतील, यात शंका नाही. त्यामुळे माणसापुढची आव्हाने अधिक खडतर होत जाणार आहेत. हे पाहता आपल्या सभोवतीचे वातावरण शुद्ध ठेवतानाच आगामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सदैव तयार रहावे लागेल.

Related posts: