|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अयोध्या प्रकरणी सुनावणी टाळण्याची धडपड

अयोध्या प्रकरणी सुनावणी टाळण्याची धडपड 

मुस्लीम बाजूच्या वकीलांच्या मागण्या फेटाळल्या, न्यायालयाकडून तीव्र ताशेरे, पुढील सुनावणी 8 फेब्रुवारीला 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सुन्नी वक्फ मंडळाचे वकील कपील सिबल यांनी अयोध्या प्रकरणी सुनावणी टाळण्याची केलेली धडपड व्यर्थ गेली आहे. ही सुनावणी जुलै 2019 मध्ये घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. तथापि, न्यायालयाने ती फेटाळली. आता 8 फेब्रुवारी 2018 पासून या प्रकरणी नियमित सुनावणी होणार आहे.

मंगळवारच्या सुनावणी प्रसंगी मुस्लीम बाजूचे वकील आणि सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील 3 सदस्यीय खंडपीठ यांच्यात मोठा वाद झाला. या प्रकरणात अंतभूर्त असणारी संवेदनशीलता पाहता याची सुनावणी करण्याची घाई करू नये. तसेच ही सुनावणी जुलै 2019 पर्यंत पुढे ढकलावी, अशी मागणी सुरवातीलाच कपील सिबल यांनी केली. पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर ही सुनावणी सुरू व्हावी, असा सिबल यांचा गर्भित हेतू होता, अशी टीका आता होत आहे.

यावर, न्यायालयाने कोणत्या दिवसापासून सुनावणी सुरू करावी, याचा आदेश आपण देऊ नका, असा टोला खंडपीठाने लगावला. या न्यायालयात आमच्या अधिकारानुसार दिनांक आणि कार्यक्रम ठरविले जातील. आपण त्यात ढवळाढवळ करू नये. आम्ही ठरविलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच सुनावणी घेऊ असे खंडपीठाने ठणकावले.

मंगळवारी दुपारी 2 वाजता सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा, न्या. अशोक भूषण आणि न्या. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. तथापि, तिचा बहुतेक सर्व वेळ वादातच गेला. मुस्लीम बाजूचे वकील कपिल सिबल, राजीव धवन, दुष्यंत दवे इत्यादींनी सुनावणी टाळण्यासाठी अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण संवेदनशील आहे, त्यामुळे निकालाचे परिणाम काय होतील हे लक्षात घेऊन सुनावणी घाईगडबडीने करू नये, असे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अलाहाबाद न्यायालयाने 2010 मध्ये निकाल दिला आहे. यापूर्वीच 7 वर्षे गेली आहेत. आता अधिक विलंब केला जाणार नाही, अशी तंबी खंडपीठाने दिली.

घटनापीठाकडे सोपवा

हे प्रकरण 7 किंवा 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवा, अशी मागणी सिबल यांनी करून पाहिली. मात्र ती प्रथमदर्शनी फेटाळण्यात आली. हा न्यायालयाचा अधिकार असून त्यात वकीलांनी लक्ष घालू नये, असे खंडपीठाने सुनावले.

भाषांतरे पूर्ण नाहीत

न्यायालयाच्या कार्यालयाकडून अद्याप कागदपत्रांचा पूर्ण संच मिळालेला नाही. एकंदर 19 हजार कागदपत्रे आहेत. त्यांची भाषांतरे करण्यास वेळ लागणार आहे, अशा अनेक सबबी सांगण्याचा प्रयत्न सिबल व धवन यांनी केला. मात्र न्यायालयाने त्यांना तुमची कागपदत्रे त्वरित कार्यालयाकडे सुपूर्द करा असा आदेश दिला.

हिंदू बाजूच्या वकीलांचा आक्षेप

हिंदू बाजूचे वकील हरिष साळवे, उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडणारे तुषार मेहता आणि ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी या वेळकाढूपणाला ठाम विरोध केला. न्यायालयाने 5 डिसेंबरला सुनावणी सुरू होईल असा शब्द दिला आहे, याची जाणीव यांनी करून दिली. यावर न्यायालयाने हिंदू बाजूला त्यांचा युक्तीवाद सुरू करण्याचा आदेश दिला.

न्यायालय सोडण्याची धमकी

सुनावणी लवकर घेण्याचा आग्रह धरल्यास आम्ही न्यायालय सोडून जाऊ अशी धमकी देण्यापर्यंत मुस्लीम बाजूच्या वकीलांची मजल गेली. त्यालाही खंडपीठाने दाद दिली नाही. त्यानंतर खंडपीठाने पुढील सुनावणीसाठी 8 फेब्रुवारी हा दिवस दिला. त्या दिवसापासून नियमित सुनावणी सुरू होण्याची अपेक्षा आहे. पुढील एक वर्षभरात निकाल दिला जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

गोंधळ आणि वादावादी…

ड मुस्लीम बाजूच्या वकीलांचा न्यायालयात गोंधळ व वादावादी

ड सुनावणी टाळण्यासाठी अनेक सबबी, कारणे आणि निमित्ते

ड खंडपीठाने स्पष्टपणे करून दिली त्यांच्या मर्यादांची जाणीव

ड सुनावणी टाळण्याच्या प्रयत्नांना हिंदू बाजूच्या वकीलांचा विरोध

Related posts: