|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बिकट वाट …

बिकट वाट … 

देशातल्या राजकारणाने राहुल गांधी याना एका अवघड अशा वळणावर आणून ठेवले आहे. हे वळण बिकट असे तर आहेच. पण ते पार करून यशस्वीपणे पुढे जाणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यापुढे आहे. भविष्याच्या वाटेवरील त्यांचे पाऊल व्यक्तिगत जीवनामध्ये जसे महत्त्वाचे असेल. तसेच ते काँग्रेस आणि पर्यायाने देशाच्या भवितव्याशी निगडित असणार आहे. वेगळ्या अर्थाने काळाने किंवा नियतीने राहुल यांच्यावर  मोठी जबाबदारी सोपवली आहे. मात्र नेतृत्वाच्या कसोटीला ते उतरले नाहीत तर जनताच नव्हे तर इतिहासपुरुषही त्यांना क्षमा करणार नाही हे वास्तव आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचा अभिषेक त्यांच्यावर लवकरच होईल. तो दिवस राहुल, काँग्रेस आणि भारतीयांसाठीही किती  महत्त्वाचा आहे हे यावरून लक्षात यावे. सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश आणि सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष यांच्याशी राहुल यांचे नाते आहे. स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या पणजोबा, खापरपणजोबांनी योगदान दिले. पहिले पंतप्रधान म्हणून जवाहलाल नेहरू यानी देशासाठी पायाभूत असे काम केले. आजी इंदिरा, वडील राजीव गांधी याना प्राणांची आहुती द्यावी लागली. सत्तेची ताकद किती मोठी असते याचा अनुभव नेहरू-गांधी घराण्याइतका कुणालाच नसेल. हीच सत्ता प्रसंगी किती घातक,जीवघेणी ठरू शकते याचा अनुभवसुद्धा  याच घराण्याइतका कुणाला असू शकेल असे वाटत नाही.  तसे पाहिले तर काँग्रेसच नव्हे तर सगळ्याच पक्षांमध्ये कोणत्या ना कोणत्या नेत्याची घराणेशाही तयार झाली आहे. त्यामुळे भारतीय राजकारणाने हे एक स्वीकारलेले वास्तव आहे.  नेहरू-गांधी घराण्यात राहुल यांचा जन्म झाला. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा  मार्ग सोपा झाला हे मान्य करून आपण त्यापुढचा विचार केलेला बरा आणि तो तसा करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे  ज्या परिस्थितीत नेतृत्व राहुल यांच्याकडे येत आहे ती खूप वेगळी आणि अनिश्चिततेने भरलेली अशी आहे. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांचे पंतप्रधान होणे हे निश्चित होते. त्याची पार्श्वभूमी स्वातंत्र्य चळवळीच्या अंतिम पर्वातच तयार झाली होती. देशात लोकशाही मूल्ये रुजविण्याची जबाबदारी नेहरूंच्यावर होती. नेहरूंनी लोकशाही मूल्यांना धक्का लागू दिला नाही. त्यामुळेच लालबहाद्दूर शास्त्री यांच्यासारखा नेता पंतप्रधान होऊ शकला. शास्त्रीजींच्या अपघाती मृत्यूने इंदिरा गांधींना पंतप्रधान केले. काँग्रेसमधल्या बुढ्ढाचार्यांना बाजूला करून इंदिरा  गांधी यानी  पक्ष आणि नेतृत्वावर पकड तर निर्माण केलीच, त्याशिवाय सत्तेचे केंद्रीकरण त्यांच्या काळात झाले. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनतेने त्यांना पराभवाचा धक्का दिला. नंतर त्या पुन्हा सत्तेवर आल्या. संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूने राजीवना राजकारणात आणले. इंदिराजींच्या हत्येने ते अचानक पंतप्रधान झाले. सहानुभूतीच्या लाटेवर  प्रचंड बहुमताने राजीव पंतप्रधान झाले. मात्र पाच वर्षातच त्यांच्या पक्षाने बहुमत गमाविले. देशाच्या राजकारणात अस्थिर आणि आघाडीच्या राजकारणाचे पर्व सुरू होत असतानाच राजीव यांची हत्या झाली आणि पहिल्यांदाच दीर्घकाळ नेहरू-गांधी घराणे सत्तेपासून दूर राहिले. नरसिंह राव पाच वर्षे पंतप्रधान राहिले पण काँग्रेसला पूर्ण बहुमत कधीच मिळाले नाही. सोनिया गांधी यांच्या राजकारण प्रवेशामुळे आघाडी सरकारच्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. पण सोनियांनी आतल्या आवाजाला साक्षी मानून पंतप्रधान होण्यास नकार दिला आणि मनमोहनसिंग यांच्यासारख्या मवाळ पण अर्थतज्ञ  नेत्याला संधी मिळाली. त्यांची दुसरी टर्म सुरू असतानाच्या काळात राहुल यांचे नेतृत्व पुढे आले. संभाव्य पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. परंतु केंद्र सरकारमधील घोटाळे एकापाठोपाठ बाहेर येत गेले आणि मनमोहनसिंग सरकारची प्रतिमा मलिन होत गेली. त्याचा फायदा भाजपला झाला. नरेंद्र मोदी यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व पुढे आले. त्यातून निर्माण झालेल्या मोदी लाटेने सत्ता परिवर्तन तर केलेच. पण स्वातंत्र्यानंतर पहिल्यादाच काँग्रेसच्या वाटय़ाला दारूण पराभव आला. काँग्रेसच्या या पराभवाचे महत्त्वाचे वाटेकरी राहुलसुद्धा  होते. देश भ्रष्टाचारमुक्त आणि काँग्रेसमुक्त करण्याची प्रतिज्ञा भाजप आणि मोदी यानी निवडणुकीच्या दरम्यान केली होती. त्याला गेल्या काही वर्षात अपवाद वगळता यश आले. खरे म्हणजे लोकशाहीच्या हितासाठी प्रबळ विरोधी पक्ष असणे आवश्यक असते. तशी सक्षम भूमिका काँग्रेस आणि पर्यायाने राहुल घेऊ शकले नव्हते. राहुल यांच्या खात्यावर यशापेक्षा अपयशच जास्त नोंद होत गेले. त्यांच्या नेतृत्व क्षमतेविषयी शंका उपस्थित होत गेल्या.  पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचा अभिषेक होणे लांबत गेले. उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने समाजवादी पक्षाबरोबर आघाडी केली. त्यांचा हा डाव फसला. तिथे भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र  मोदी यांच्या गुजरातच्या भूमीत राहुल यांनी ज्या प्रकारे आव्हान निर्माण केले त्यातून त्यांची नेता म्हणून एक वेगळी  प्रतिमा तयार झाली आहे.  गुजरातमध्ये गेली 22 वर्षे भाजपची सत्ता आहे. त्या सत्तास्थानाला धक्का देण्याचा जोरदार प्रयत्न राहुल यानी केला आहे.  गुजरातमध्ये सत्तांतर होईल की नाही हा मुद्दा बाजुला ठेवला तरी ही विधानसभा निवडणूक राहुल  आणि काँग्रेस यांच्यासाठी जमेची असणार आहे. भाजपने खतपाणी घालून जोपासलेल्या पप्पू प्रतिमेतून स्वतःला बाहेर काढण्यात राहुल यशस्वी ठरले आहेत.  इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांना गुंगी गुडिया म्हटले गेले होते. राजीव पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नव्हता. सोनिया काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या तेव्हा त्यांना नीट भाषणही करता येत नव्हते. या तिन्ही नेत्यांनी  आपले नेतृत्व गुण परिस्थितीतून विकसित केले. राहुल गेली तेरा वर्षे राजकारणात आहेत. परिस्थिती प्रतिकुल वाटत असली तरी ती बदलून टाकण्याची संधी त्यांना आहे. वाट बिकट वाटा वळणांची आणि  पायतळी अंगार असला तरी समोर एकच ध्येय तारा निश्चित करून त्यांना जावे लागणार आहे.  भारतीय जनता त्यांना बळ देईल अशी अपेक्षा करूया !

Related posts: