|Thursday, December 14, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » एक्सरे केंद्राला सील ठोकले, 8 जणांना नोटीसा

एक्सरे केंद्राला सील ठोकले, 8 जणांना नोटीसा 

सुरक्षा मानकांची पूर्तता नसल्याने कारवाई -अणुऊर्जा नियामक मंडळाची तपासणी

कामथे उपजिल्हा रुग्णालयालाही नोटीस

एका केंद्राकडे परवानाच नाही

जिह्यातील मोठी कारवाई

प्रतिनिध  /चिपळूण

एक्सरे मशीन बसवण्यासाठी घालून देण्यात आलेल्या मानकांचे पालन न केल्यामुळे रत्नागिरी जिह्यातील एका एक्सरे केंद्राला सील ठोकण्यात आले असून अन्य 8 केंद्रांना सील का ठोकण्यात येऊ नये? अशी नोटीस अणुऊर्जा नियामक मंडळाने जारी केली आहे. यामध्ये कामथे-चिपळूण येथील उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे, असे अणुऊर्जा नियामक मंडळाचे अधिकारी डी. एम. राणे यांनी सांगितले.

ते म्हणाले, रत्नागिरी जिह्यातील खेड येथील रतनबाई घरडा हॉस्पिटल, चिपळूणचे एसएमएस हॉस्पिटल चिपळूण, एसव्ही डायग्नोस्टीक सेंटर, आदित्य आर्थोपेडीक ऍण्ड आय केअर सेंटर, मोडक हॉस्पिटल, स्कीन केअर क्लिनिक, चिपळूण-कामथे येथील उपजिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथील निष्कर्ष डायग्नोस्टीक सेंटर या 8 केंद्रांनी मानकांची पूर्तता न केल्याचा ठपका ठेवून अणुऊर्जा नियामक मंडळाने सील का ठोकू नये, अशी नोटीस जारी केली आहे.

चिपळूणच्या डॉ. पुजारी यांच्या कोकण डायग्नोस्टीक सेंटरने परवाना न घेता व्यवसाय सुरु केल्याचा आक्षेप घेऊन ताबडतोब सील करण्यात आले, अशी माहिती मंडळाच्या अधिकाऱयांनी दिली. रत्नागिरी जिह्यात विविध ठिकाणी एक्सरे केंद्रांची तपासणी अणुऊर्जा नियामक मंडळाकडून सुरु आहे.

अधिकाऱयांनी सांगितले की, प्रत्येक केंद्राने परवाना घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय आमचे तपासणी पथक तज्ञ ऑपरेटरची तपासणी करते. खोलीची जागा, टीएलडी म्हणजे विकिरण मापन साधन, विशिष्ट स्वरुपाचा ऍप्रन, विशिष्ट दरवाजे, खोलीच्या भिंती यांची तपासणी होते. एक्सरे यंत्रणा उभारलेल्या खोलीच्या भिंती किमान 9 इंच रुंदीच्या असणे आवश्यक ठरवण्यात आले आहे.

केवळ एक्सरे केंद्रांनाच नव्हे तर सीटीस्पॅन, पॅथलॅब यांचीही तपासणी मंडळाकडून होत असते. रुग्ण, हाताळणारे लोक अन्य कर्मचारी वर्ग आणि रुग्णासोबतचे नातेवाईक यांच्या सुरक्षेचा विचार करुन मानके ठरवण्यात आली आहेत. विकिरणामुळे कोणत्याही व्यक्तीला कर्करोग, मोतीबिंदू, केस गळणे, यासारखे विकार होऊ नयेत म्हणून आवश्यक काळजी घेणारी मानके अत्यंत गांभिर्याने तपासण्यात येत आहेत. एका ठिकाणच्या एक्सरे खोलीच्या खिडक्या उघडय़ा दिसून आल्या म्हणून अधिकाऱयांनी त्यावर कारवाई केली होती, असे मंडळाच्या अधिकाऱयांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Related posts: