|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संस्कार सेतू प्रशिक्षण शिबिराला मुलांचा प्रतिसाद

संस्कार सेतू प्रशिक्षण शिबिराला मुलांचा प्रतिसाद 

भागीरथी महिला संस्थेचा उपक्रम

प्रतिनिधी / कोल्हापूर

बालवयात केलेले संस्कार आयुष्यभर जीवनाची शिदोरी बनून मार्गदर्शन करतात. त्यामुळे उत्तम संस्कारातून सूजाण नागरिक घडवण्यासाठी भागीरथी महिला संस्था प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून संस्कार सेतू प्रशिक्षण सुरू केले असल्याचे, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी सांगितले. त्या दोन दिवसीय संस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

भागीरथी महिला संस्था, नागाळा पार्क मधील योगा डान्स स्टुडिओ आणि रुकडीच्या विद्योदय मुक्तांगण परिवाराच्यावतीने संस्कार सेतू प्रशिक्षण शिबिर शनिवारपासुन सुरूवात झाली. हे शिबिर महिन्याच्या शनिवार आणि रविवार या दोन दिवशी ठेवण्यात आले आहे. शिबिरार्थींच्या हस्ते रोपाला पाणी घालून शिबिराची सुरूवात करण्यात आली.

महाडिक म्हणाल्या, बालवयात केलेले संस्कार आयुष्यभर स्मरणात राहतात. सध्याच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात मातापित्यांना मुलांवर संस्कार करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे संस्कार सेतू शिबिर मुलांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

या शिबिरात मेंदूचा समन्वय राखणे, हस्तकला, विज्ञान खेळणी, अभ्यास कौशल्य या विषयांवर शिल्पा देगावकर, सुहास प्रभावळे आणि स्टिफन शिंगे यांनी मार्गदर्शन केले. तर सुर्यनमस्कार, ओमकार मेडिटेशन, ब्रेन योगा, ब्रेथ टेक्नीक, पारंपारिक खेळ, क्षेत्र भेट हे विषय पुढच्या सत्रात शिकवले जाणार आहेत. हे शिबिर दर आठवडय़ाला शनिवार आणि रविवारी सुरू राहणार असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले. यावेळी किरण चव्हाण, प्रीती खोत यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होत.